Friday, 29 April 2016

आयुष्य सुरू राहे


आयुष्य सुरू राहे


जन्म झाला । माणूस आला ।
आनंद झाला । आयुष्य सुरू राहे ।।१।।

लहान ओंजळ । दिवस प्रांजळ ।
स्वप्नांचे मृगजळ । आयुष्य सुरू राहे ।।२।।

तरुण काया । जीवनाचा पाया ।
गेले जरी वाया । आयुष्य सुरू राहे ।।३।।

जगायला पैसा । लागतो जैसा ।
खिशातून नाहीसा । आयुष्य सुरू राहे ।।४।।

चाळीशीचा टप्पा । अनुभवी गप्पा ।
कुणी आई कुणी पप्पा । आयुष्य सुरू राहे ।।५।।

वय वर्ष साठ । आजारांशी गाठ ।
निराधार वाट । आयुष्य सुरु राहे ।।६।।

मंदावते वात । टाकली कात ।
जीवनाचा आघात । आयुष्य सुरु राहे ।।७।।

माणूस मेला । शोक केला ।
काळ गेला । आयुष्य सुरु राहे ।।८।।


- निनाद वाघ



Friday, 22 April 2016

राहून गेलेली गोष्ट



नेहमी प्रमाणे आज देखील मी ८:१६ च्या बस साठी धावलो. गरमीचे दिवस. घामाच्या धारा वाहत होत्या.

“अहो ३७ नंबर गेली का? " मी शेजारच्या माणसाला विचारलं.“नाही अजून”
एखाद्या खेळाडूला मेडल मिळाले की जितका आनंद होतो, त्याहून अधिक आनंद मला, आपली बस चूकली नाही, हे ऐकून झाला.
बस आली. मी त्यात चढलो. आज बसायला जागा मिळाली. माझ्या बाजूला एक आजोबा बसले होते. अगदी साधी वेषभूषा.डोळ्यांवर चष्मा. खांद्यावर कापडी पिशवी आणि हातात काही सुंदर चित्र होती.
मला राहावले नाही म्हणून मी सहज त्यांना म्हटले, “आजोबा ही चित्र कुठून आणली ? अप्रतिम आहेत!”
हे ऐकून त्यांना खूप आनंद झाला. मला म्हणाले, " बाळा ही मी स्वतः काढली आहेत."
मला आश्चर्याचा धक्का बसला.
"वाह ! तुम्ही चित्रकार आहात ? "
"नाही रे. हौस म्हणून काढतो."
हे सांगत असताना त्यांच्या चेहऱ्यावर एक खंत दिसली.
"काय झाले आजोबा ? "

"काही नाही रे! लहानपणापासून आवड होती. जगातील प्रसिद्ध चित्रकार व्हायचे स्वप्नं पाहिले होते. परंतु चित्रकाराचे उत्पन्न फार कमी. घरच्या लोकांना ते पसंत नव्हते. त्यांचा विरोध होता. म्हणून इच्छा नसताना देखील इंजिनियर झालो. चांगली नोकरी मिळाली. पुढे लग्न झाले. संसार सुरू झाला. आयुष्याच्या चित्रात रंग भरताना माझी आवड मात्र मागे राहिली.
पैसे आले. चांगले आयुष्य मिळाले परंतु आनंद नाही मिळाला. आज मुलं परदेशी आहेत. सुखी आहेत. पत्नी चे निधन झाले. आज आयुष्याच्या ह्या टप्प्यावर काय मिळालं ह्या पेक्षा माझं स्वप्न अपूर्ण राहिले ह्या गोष्टीचे दुःख जास्त आहे. मनात खंत उरते रे. तुझे काही स्वप्न आहे का? जर असेल तर एक गोष्ट लक्षात ठेव बाळा, स्वतःचे स्वप्न पूर्ण कर. जे आहे ते ह्या जन्मात. एखादी राहून गेलेली गोष्ट पुढच्या जन्मी करीन हे आपल्या अपयशाचे केलेले समर्थन आहे . लक्षात ठेव! "
त्यांच्या डोळ्यात पाणी होते. चष्म्या मागून येणारा तो अश्रू चा थेंब हृदयाला चटका लावणारा होता.
बस थांबली. ते उतरले . मी थक्क होऊन पाहत राहिलो…


 - निनाद वाघ




Friday, 15 April 2016

शर्यत



शर्यत

आयुष्याच्या शर्यतीत धावताना
जेव्हा अचानक मागे वळून पाहिलं
तेव्हा मी खूप पुढे आलो होतो
पण आयुष्य मागेच राहिलं.

धडपड केली पैश्यांसाठी
न संपणाऱ्या इच्छांसाठी
जगता जगता मरत राहिलो
अन् मरता मरता जगत राहिलो
जेव्हा अफाट पैसा हाती आला
तेव्हा पुन्हा मागे वळून पाहिलं
मी खूप पुढे आलो होतो
पण आयुष्य मागेच राहिलं

स्वतःला सिद्ध करता करता
जगणं काय तेच विसरून गेलो
कृत्रिम स्वप्नं पूर्ण करता करता
स्वतःमधेच हरवून गेलो
स्वप्न पूर्ण होताना
मी पुन्हा मागे वळून पाहिलं
पण मी खूप पुढे आलो होतो
आणि आयुष्य मागेच राहिलं

पैसा संपत्ती गोळा करण्यात
आयुष्य माझे पूर्ण वाहिले
निरोप घेताना जगाचा
हात मात्र रिकामेच राहिले

मिटले डोळे थांबले ठोके
स्तब्ध झाले हृदयाचे झोके
आयुष्य जगण्याचे तेव्हा
समजू लागले धडे
पण देह गेला सोडून
अनंतातल्या देवाकडे
जाता जाता मात्र
जेव्हा शेवटचं मागे वळून पाहिलं
तेव्हा मी खूप पुढे आलो होतो
पण आयुष्य मागेच राहिलं..



- निनाद वाघ



Friday, 8 April 2016

जुनंच आयुष्य नव्यानं जगणं


आज गुढीपाडवा. आपलं नवं वर्ष. सर्वप्रथम तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. हे वर्ष तुम्हा सर्वांना सुखाचे व समाधानाचे होवो.
ह्याच शुभ मुहूर्तावर एक नवी सुरूवात करूया असा संकल्प आहे. आपलं जुनंच आयुष्य नव्यानं जगूया असा विचार मांडणारी माझी ही नवी कविता सादर करतोय.


जुनंच आयुष्य नव्यानं जगणं.


जुने रस्ते नव्या वाटा
जुनेच किनारे नव्या लाटा
जुन्या जखमा नवं दुखणं
जुनेच डोळे नवी स्वप्न
जुनी ठेच नव्यानं लागणं
जुनंच आयुष्य नव्यानं जगणं


जुनी वस्तू नवी किंमत
जुनाच खेळ नवी गंमत
जुना झोपाळा नवे झोके
जुनंच घड्याळ नवे ठोके
जुना आशीर्वाद नव्यानं मागणं
जुनंच आयुष्य नव्यानं जगणं


जुनी माणसं नवे छत्र
जुनीच अक्षरं नवी पत्र
जुने पेच नवे प्रसंग
जुन्याच अपेक्षा नवे भंग
जुना स्वभाव नव्यानं वागणं
जुनंच आयुष्य नव्यानं जगणं..



- निनाद वाघ



Friday, 1 April 2016

एक गुपीत आयुष्यचं..


नुकत्याच SSC परिक्षा संपल्या. आता दहावी नंतर पुढं काय ह्या पेचात अनेक मुलं असतात. काही वर्षांपूर्वी हाच प्रश्न मलाही पडला होता. निर्णय घेताना पार गोंधळ उडाला होता. त्या नंतर आयुष्यात असे अनेक क्षण आले. अनेक निर्णय घेतले. काही फसले तर काही अगदी अचूक ठरले. ह्या वरून मी एक गोष्ट शिकलो आणि नेमका हाच विचार मी माझ्या ह्या कवितेत मांडतो आहे. 


एक गुपीत आयुष्यचं..

समोर रस्ते चार होते
मार्ग कुठला निवडू कळेना..
निवडला एक मार्ग शेवटी
पण पावलं तिथे वळेना..

निवडताना तो रस्ता
सल्ले घेतले इतरांचे..
ऐकले नाही तेव्हा
आतून येणाऱ्या स्वरांचे..

प्रवास खडतर वाटू लागला
कायम संकटानी ग्रासलेला..
चहू बाजूने अंधार पसरला
कायम दुःखाने त्रासलेला..

एके दिवशी मग मी
एक दृढ निश्चय केला..
चार पावलं मागे वळत
प्रवास नव्यानं सुरू केला..

आता प्रवास सुकर झाला
जीवनात माझ्या आनंद आला..
दुःख सारे विरुन गेले
आयुष्य नव्याने उदयास आले..

आनंदी आयुष्याचं तुम्हाला गुपीत
सांगतो नीट ऐका जरा..
सल्ला देणारे भेटतील खूप
पण मनाला आवडेल तेच करा..

- निनाद वाघ




Friday, 25 March 2016

अशी झाली फजिती


आज सकाळी एक गमतीदार किस्सा घडला. म्हणजे झालं असं की सकाळी मी काही कामा निमित्तानं बाहेर दुकानात गेलो होतो. मी दिलेल्या सामानाच्या यादीत काही गोष्टी गोदामात होत्या म्हणून दुकानवाल्यानं मला जरा अर्धा तास थांबायला सांगितलं. थांबण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता म्हणून दाराजवळ असलेल्या सोफ्यावर मी बसलो. पेपर चाळायला घेतला. इतक्यात माझ्या शेजारी एक मुलगा येऊन बसला. तोही पेपर वाचत होता. वाचताना तो अचानक म्हणाला “ काय सॉलिड मँच झाली काल..”

क्रिकेट हा माझा आवडता विषय असल्या कारणाने मी ही बोलू लागलो आणि आमच्यात गप्पा सुरू झाल्या. मग गल्लीपासून दिल्ली पर्यंत तर क्रिकेट पासून सिनेमा असे सगळे विषय आमच्या चर्चेत आले. गप्पा सुरू राहिल्या. बोलता बोलता आमच्या संभाषणात मनोहर पालवेंचा उल्लेख झाला.
मनोहर पालवें बद्दल माझं मत काही फार चांगलं नव्हतं. मी भेटलो होतो त्यांना अनेकदा किंबहुना नाइलाज म्हणून भेटावं लागायचं. दादरला त्यांचं अॉफिस होतं. खरं सांगतो फार विक्षिप्त माणूस. सारखी निराशेची भाषा. असा इतका नकारात्मक माणूस मी आजवर पाहिला नव्हता.

मी त्या मुलाला लगेच म्हटलं “अरे तो मनोहर पालवे म्हणजे एक नंबरचा विचित्र माणूस. सारखी कटकट आणि बोलण्यात सारखा नाराजीचा सूर. त्यांचं बोलणं ऐकून एखादा आशावादी माणूस सुद्धा प्रचंड निराशावादी होऊन बसेल. तुझा कधी संबंध आलाच तरी त्यांच्या पासून दूर रहा. सुखात रहाशील”
तो मुलगा मिश्कील हसला. बहुधा त्याला ही माझं म्हणणं पटलं असावं. पालवेंच्या अशा वागण्याचा त्यांनेही प्रत्यय घेतला असावा.

दुकानदाराने मला बोलावले. माझं सामान घेतलं आणि निघताना त्या मुलाला मी म्हटलं, “भेटू पुन्हा कधीतरी ..तुझा नंबर दे”
नंबर घेतला. बाय द वे नाव काय तुझं?
“आकाश मनोहर पालवे”

माझी बोलतीच बंद झाली ना राव. मला अगदी तोंडावर मारल्या सारखं झालं. एक शब्द ही न बोलता मी तिथून पळ काढला. बोलणार तरी काय होतो..ज्यांच्या बद्दल त्या मुलाला सांगत होतो.तक्रार करत होतो. दूर राहण्याचा सल्ला दिला. तो इसम त्याचाच बाप निघाला. माफ करा ते त्याचे पूज्य पिताश्री निघाले.
थेट घर गाठलं. आणि मग मात्र झालेल्या प्रकारावर जाम हसू आलं. स्वतः स्वतःवरच.



- निनाद वाघ




Friday, 18 March 2016

द्वंद्व : स्वतःचं स्वतःशीच..!!


आजच्या कवितेचा जो आशय आहे हा खरंतर प्रत्येकाला लागू होतो. आपण अनेकदा एखाद्या प्रसंगात फसतो आणि तेव्हा निर्णय घेणं कठीण होऊन बसतं. ह्याचं कारण म्हणजे, आपलं मन आपल्याला एक सांगत असतं पण हृदयाला ते पटत नसतं आणि ह्यात आपलं सारं आयुष्य फसतं. निर्णय चुकतात आणि आपण नंतर नुसताच पश्चात्ताप करत बसतो. नेमका हाच विचार मांडणारी माझी ही कविता.


द्वंद्व


द्वंद्व स्वतःचं स्वतःशीच असतं
विचारांचं वैर विचारांशीच असतं
चूक कुणाचीही नसते तरीही
हृदयाचं मनाशी कधीच पटत नसतं


मन आपुले वास्तववादी
हृदय प्रचंड आशावादी
निर्णय घेणं कायम कठीण असतं 
कारण हृदयाचं मनाशी कधीच पटत नसतं


हृदयाला सगळंच चांगलं दिसतं
मनाला मात्र ते चुकीचं वाटतं
ह्यात आपलं अख्ख आयुष्य फसतं
कारण हृदयाचं मनाशी कधीच पटत नसतं


हृदयाला पटकन ठेच लागते
मन तसं घट्ट असतं
कितीही प्रयत्न करा तरी
हृदयाचं मनाशी कधीच पटत नसतं..



- निनाद वाघ




Friday, 11 March 2016

स्त्री जन्मा..तुला सलाम….!!!


             नुकताच ०८ मार्चला जागतिक महिला दिन साजरा झाला. ह्याच पार्श्वभूमीवर माझी एक कविता शेयर करतोय. आजही आपल्या समाजात महिलांना दुय्यम स्थान दिलं जातं. एकीकडे ही पुरुषप्रधान मानसिकता आणि दुसरीकडे महिला दिन साजरा करायचा. हे समाजाचं विसंगत वागणं मनाला पटत नाही.
घर संसार आणि नोकरी सांभाळत आयुष्य उत्कृष्ट रित्या जगणाऱ्या ह्या स्त्री समाजाचा खरंच मनापासून आदर वाटतो. ह्यांचा खरा सन्मान तेव्हाच होईल जेव्हा अत्याचार, बलात्कार, स्त्री भ्रृणहत्या सारख्या असंख्य घटना समाजातून नाहीशा होतील आणि एक सुरक्षित वातावरण तयार होईल. हा स्त्री समाजाचा खरा गौरव असेल.

स्त्री जन्मा..तुला सलाम….!!!

शब्दात कसा सांगू 
तू आहेस किती थोर..
स्त्री तुझा जन्म 
खरंच आहे खूप कठोर..

त्याग करतेस तू
आयुष्याच्या प्रत्येक पावली..
तरीही खंभीरपणे असतेस उभी
जणू मायेची सावली..

करतेस संस्कार चांगले 
शिकवतेस चांगली तत्त्व..
प्रसंगी कधी रागवतेस
तरी ऊरी कायम ममत्व..

समाजात जगताना
तू कधीच सुरक्षित नसतेस..
तुझ्या सान्निध्यात मात्र
तुझ्या परिवाराला सुरक्षित ठेवतेस..

येणारा प्रत्येक दिवस
तुझ्यासाठी एक नवं आव्हान असतं..
बाईचा जन्म जगणं
हे काही सोपं काम नसतं..

थकवा तुला ठाव नाही 
काय अफाट तुझ्यात असते ऊर्जा..
पण पुरुष प्रधान समाजात 
तुला मात्र नेहमी दुय्यम दर्जा..

अशा परिस्थितीत जगताना
तुला काळजी सर्वांची..
स्वतःचे दुखणे लपवून 
सुश्रुषा करते इतरांची..

दाखवत नाहीस कधीही 
परी तुझ्या ही अंतरी तरळते पाणी..
सलाम तुझ्या कर्तृत्वाला
स्त्री जन्मा.. थोर तुझी कहाणी..!



- निनाद वाघ



Friday, 4 March 2016

एक नोट नशीबाची



रस्त्यावर चालत असताना अनेकदा आपल्याला तो गरीब मदत मागताना दिसतो. आपण सहज त्याकडे दुर्लक्ष करत पुढं चालत राहतो. काही जण तर मदत करत नाहीत तर त्यांचा अपमान करतात. तो बिचारा निमूटपणे जगत असतो त्याच्या माथी लागलेलं प्रारब्ध, त्याचा काय दोष असतो? मदत नाही केली तरी चालेल निदान अपमान तरी करू नका.

एक नोट नशीबाची..


रस्त्यावरून जाताना, स्वतःच्या धुंदीत चालताना
गाडीमध्ये बसताना, नाक्यावर खाताना..
कापऱ्या स्वरात अचानक एक आवाज येतो:
“ साहेब.. ओ साहेब.. काहीतरी द्या "
आपण क्षणभर थांबतो, मागे वळून बघतो
तेव्हा एक कासावीस मुलगा समोर दिसतो
कळकट मळकट जुनी वस्त्रे
जेमतेम चिंद्या खिसे फाटके
तहानलेला चेहरा अन् पोटातली भूक
जन्म असा मिळणे ह्यात त्याची काय चूक?
त्याची बिकट प्रतिमा आपण डोळ्यांनी पाहतो
तेव्हा नकळत हात आपुला खिश्याकडे जातो..
रूपया देऊ की नोट, असा विचार मनी येतो
ठरवताना आपण, तो रुपया त्याच्या हाती ठेवतो..
पुन्हा खिशात जाते मग, बाहेर निघालेली नोट
रूपयात त्या पोराचे भरेल तरी का हो पोट?
तिच नोट घेऊन मग मंदिराची पायरी चढतो
हात जोडत देवासमोर दुःख आपले सांगतो..
ठेवत ती नोट देवा चरणी जातो त्याला शरण
जर दिली असती तीच नोट त्या पोराला
कदाचित आज टळले असते त्याचे मरण..




- निनाद वाघ



Friday, 26 February 2016

मन हे आपुले



                  नेहमीच मी तुमच्याशी माझ्या मनातलं मांडतो मनातलं बोलतो पण आज मी तुमच्याशी जरा वेगळं बोलणार कारण आज माझ्या मनातलं नाही तर मना विषयी बोलणार आहे. आपल्या नाजूक मनाविषयी. कधी भावूक होणारं मन तर कधी आनंदी मन. कधी हताश झालेलं मन तर कधी उत्साही मन. अनेक आठवणी जपणारं मन. अनेक विचार निर्माण करणारं मन. क्षणात इकडे तर क्षणात तिकडे असं निसर्गात सहजतेनं वावरणारं आपलं मन. ह्या आपल्या मनावर व्यक्त होताना मी माझी ही कविता शेयर करतोय:

मन हे आपुले..

मन हे आपुले मन हे आपुले
जाई कधी कुठे हे ना कळे..

हे मन आपुले चंचल 
नसे त्याला क्षणभर थारा
सोसाट्यानं वाहत राही
जसा निसर्गात हा वारा
स्तब्ध राहते कधीकधी 
तर कधी झपाट्याने पळे
मन हे आपुले मन हे आपुले
जाई कधी कुठे हे ना कळे..

लावूनी पंख स्वतःला
ते आसमंतात उडे 
झाडां सोबत झुलताना
कधी सागरात बुडे
जाई सरळ कधीकधी 
तर कधी अचानक वळे
मन हे आपुले मन हे आपुले
जाई कधी कुठे हे ना कळे..

अशा ह्या मनाला जपणं फार गरजेचं असतं कारण मन नाराज असेल तर आयुष्याचं सारं गणित चुकतं. सर्वत्र नैराश्य पसरतं. कायम मनावर ताण असतो. आपलं स्वास्थ्य बिघडतं आणि मग हळूहळू तो येऊ लागतो.

तो येतो तेव्हा ...

          आयुष्यात हरलो होतो.थकलो होतो.नैराश्य पदरी पडले होते.पार खचून गेलो होतो.अन् अखेर तो आलाच..
अगोदर कधीकधी यायचा मग हळूहळू रोज येऊ लागला आणि आता तर कायमचा मुक्कामाला आला.कायम माझ्या सोबत असायचा. मी लोकांच्या गर्दीत असायचो तरीही तो काही माझी पाठ सोडायचा नाही.मी कामात असायचो तर तो तिथेही असायचा. सगळी कडे तो डोकावू लागला. मग मात्र लोकं ही विचारू लागली पण माझ्याकडे उत्तर नसायचे. तो मला लोकां पासून तोडायचा. त्याच्या मुळे मित्र दुरावले पण त्याचं स्थान मात्र अधिक भक्कम झालं.
         तो जितका नको नकोसा वाटायचा तितकाच तो माझ्या जवळ यायचा.सगळं खूप विलक्षण होतं.
मला वाटायचे की तो फक्त माझ्याच सोबत आहे मग हळूहळू समजत गेलं की तो तर अनेकांसोबत आहे. सगळेच त्याच्या मुळे त्रासलेले.
खरंतर आपलं आयुष्यच असं झालं आहे की तो कोणाच्याही जीवनात डोकावू शकतो.तो सर्वां सोबत वावरत असतो. आपल्या लक्षात येईस तोवर खूप उशीर झालेला असतो.आपण खचून जातो. आपण काही करायचे ठरवले की तो आपल्याला मागे खेचत राहतो. त्याच्यामुळेच नैराश्य येते आणि ते चक्र सुरू होतं. एक भरारी घेऊ पाहणाऱ्या आयुष्याचा अस्त होतो. सगळं त्याच्या मुळेच.
        असा असतो हा प्रत्येकाच्या आयुष्यात कधी टप्प्या टप्प्याने तर कधी कायमचाच येणारा 'एकटेपणा'
हा एकटेपणा जर टाळायचा असेल तर मानसिक स्वास्थ्य जपणं फार महत्त्वाचं. मन प्रसन्न असलं की सगळं काही सुरळीत होतं.

मन करा रे प्रसन्न..!

पुरे झाहले दुःख आता
वेदना कुरवाळू तरी किती..?
नको आसवे डोळ्यांत आता
कशाला उद्याची भीती..?

कशाला चिंता कालची..?
गेला दिवस जुना झाला..
घेऊन आता नवी चेतना
नवा दिवस पुन्हा आला..

हे कटू विचार सारे
मनास आपुल्या करती सुन्न..
झटकून सारी दुःख आता
मन करा रे प्रसन्न..!



- निनाद वाघ





Friday, 19 February 2016

जरा माणसांसारखं वागूया



आज तुमच्या समोर माझी एक कविता सादर करतोय. ह्या कवितेचं शीर्षक आहे “जरा माणसांसारखं वागूया”
ह्या कवितेचा संदर्भ असा आहे की बदलणाऱ्या काळा सोबत माणूस इतका बदलत गेला की तो माणसांशी माणसांसारखं वागणं विसरून गेला.
खरंतर माणूस हा शिक्षण, नोकरी, पैसा ह्यात असा काही गुंतला गेला आहे की त्याच्याकडे नेहमीच वेळेचा अभाव असतो. ना परिवारासाठी तो वेळ देऊ शकतो, ना मित्र मैत्रीणींसाठी आणि ना स्वतःसाठी. शिवाय फेसबूक, वॉट्सॲप सारख्या माध्यमातून जग अगदी जवळ आलंय. जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात आपण कुणाशीही बोलू शकतो, त्याला पाहू शकतो पण ह्या सगळ्यात माणसांमधे दुरावा निर्माण होत आहे हे आपल्या लक्षात येत नाही. आजकाल आपल्या घरच्या लोकांशी बोलणं तर होतं पण संवाद हरवलाय. तुम्हाला तरी आठवतं का कट्ट्यावर मित्रांशी शेवटच्या गप्पा कधी मारल्या? हे सगळं आता ऑनलाइन होतं. नात्यांमधली ती गंमत हरवलीय.
एखाद्या यंत्रासारखं आपल्या कामाचं चक्र नुसतं सुरू असतं. काहीजण तर आपल्या स्वतःच्या घरी लॉजींग बोर्डींगला आल्या सारखे येतात. रात्री चेक इन करतात अन् सकाळी चेक आऊट.
जगण्यासाठी माणसाला काम करून पैसे कमवणं नक्कीच गरजेचं आहे पण हे करत असताना थोडा वेळ आपल्या माणसांना देणंही तितकंच गरजेचं आहे. आपण कितीही बिझी असलो, कामाचा कितीही लोड असला तरीही थोडा वेळ हे सारं बाजूला सारून माणसांशी मनमोकळेपणाने वागता आलं पाहिजे म्हणजे जगणं नक्कीच सुकर होईल. नाही का?



जरा माणसांसारखं वागूया..

सारून सारं बाजूला
मनमोकळं जगूया म्हणतोय..
तुटलेली नाती सारी
पुन्हा नव्याने जोडूया म्हणतोय
आज जरा माणसांशी
माणसांसारखा वागूया म्हणतोय..


आजी सोबत जरा निवांत
गप्पा मारूया म्हणतोय..
आजोबांसोबत फिरायला जरा
पार्कात जाऊया म्हणतोय..
आज जरा माणसांशी
माणसांसारखा वागूया म्हणतोय..


आईच्या हातचा गरम भात
तिच्या सोबत जेवूया म्हणतोय..
सोडून नुसते बोलणे
बाबांशी संवाद साधूया म्हणतोय..
आज जरा माणसांशी
माणसांसारखा वागूया म्हणतोय..


ताईची गंमत करताना
दादाची ही खोड काढूया म्हणतोय..
सोनेरी बालपण आठवताना
सारं जग विसरूया म्हणतोय..
आज जरा माणसांशी
माणसांसारखा वागूया म्हणतोय..


मित्रांना आता पुन्हा
जुन्याच कट्ट्यावर भेटूया म्हणतोय..
तुटलेली नाती सारी
पुन्हा नव्याने जोडूया म्हणतोय..
आज जरा माणसांशी
माणसांसारखा वागूया म्हणतोय..


- निनाद वाघ



Friday, 12 February 2016

वडा पाव


मी शाळेत असतानाची गोष्ट. आमच्या शाळेच्या आवारात एक माणूस रोज यायचा. वयाने तसा वृद्ध होता. कमरेतून जरासा वाकलेला. डोक्यावर वेताची टोपली अन् त्यात लाल रंगाच्या गोळ्या आणि वडा पाव विकायचा. त्या काळी शाळेत जाताना खिशात मोबाईल किंवा मनगटावर घड्याळ नसायचे आणि म्हणूनच वर्गाच्या खिडकीतून त्या माणसाला आवारात शिरताना पाहिले की समजायचे आता लवकरच मधली सुट्टी होणार अन् आनंद व्हायचा.
मधल्या सुट्टीत मुलांचा घोळका नेहमी त्याच्या अवती भोवती असायचा.सर्व मुलांचा तो लाडका ‘वडा पाव चाचा’ होता.कोणी वडा पाव घ्यायचं तर कोणी छोट्या लाल गोळ्या. ते चिमुकले हात जेव्हा त्या थरथरणाऱ्या हातावर दोन पाच रूपये ठेवायचे तेव्हा सूरकुत्या पडलेल्या त्याच्या चेहऱ्यावर समाधानाची रेष अगदी स्पष्ट दिसायची.
मलाही कधीकधी मोह व्हायचा वडा पाव खाण्याचा परंतु घरातून परवानगी नव्हती. आईनं दिलेला डबा खायचा अशी सक्त ताकीद होती. गुपचूप खायचं म्हटलं तर खिशात पाच रूपये ही नसायचे. मग एके दिवशी आईकडे खूप हट्ट करून परवानगी मिळवली. शाळेत जाताना आईनं हातात पाच रूपये ठेवले अन् सांभाळून घेऊन जा म्हणून सांगितलं. खिशात पाच रूपये ठेवल्यावर खिसा अगदी भरल्या सारखा वाटला.खूप आनंद झाला. 
शाळेत अगदी उत्साहात गेलो. वर्गात काही लक्ष लागेना. माझी नजर शोधत होती ती फक्त आणि फक्त चाचांना. तास संपत होते तसे मन आणखीनच आतूर होत होते पण चाचा काही दिसेना. इतक्यात मधल्या सुट्टीची बेल झाली. अजूनही चाचांचा काही पत्ता नव्हता. कदाचित चाचा अगोदरच आवारात शिरले असतील ही आशा मनात बाळगून मी अक्षरशः पटांगणात धावलो. ते तिथेही नव्हते. आता मात्र मन उदास झाले होते. रागही खूप येत होता. मी तिथेच जोर जोरात रडू लागलो आणि पुन्हा वर्गात जाण्यासाठी निघालो. तेव्हा अचानक चाचांना पटांगणात शिरताना पाहिले. क्षणात डोळ्यांतून आसवे गायब झाली आणि चेहऱ्यावर प्रसन्नता उमटली. लगेच हात खिशात गेला. आईनं दिलेल्या पाच रूपयांत तीन रूपयांचा वडा पाव आणि दोनच्या लाल गोळ्या घेतल्या. वडा पाव खाण्यापेक्षाही तो स्वतः विकत घेतल्याचा आनंद जास्त होता.मन अगदी तृप्त झालं. 
शाळा सोडून आता अनेक वर्ष लोटली पण आजही कधी शाळेच्या परिसरात गेलो तर माझी नजर त्या चाचांना शोधत असते. आज खिशात पाच चे पाचशे झाले.पोटातली भूकही वाढली.अनेकदा अनेक ठिकाणी वडा पाव खाल्ले पण कधीच चाचांच्या हातची सर त्याला नव्हती. शाळेत असताना खाल्लेल्या त्या पहिल्या वडापावाची चव आजही जिभेवर आहे आणि आयुष्यभर राहील.. 



- निनाद वाघ






Friday, 5 February 2016

माणुसकी दुर्मिळ झाली हो !


आज सकाळीच रमेश भाऊंचा फोन आला. फोनवरून एक दुःखद बातमी समजली आणि मन अगदी हळवं झालं. बातमी होती कविता ताईंच्या निधनाची. सगळं कसं अचानक घडलं. काही आजार नव्हता. वयाने सुद्धा तशा लहानच होत्या. जेव्हा निधनाचं कारण समजलं तेव्हा मात्र मनाला झालेली वेदना अधिक तीव्र झाली. आतून पूर्णतः कोसळलो होतो. स्वतःला जेमतेम सावरत मी त्यांच्या घराकडे निघालो.
मी कविता ताईंच्या घरी पोहोचलो तेव्हा तिथलं वातावरण अगदी शोकाकुळ झालं होतं. प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू तरळत होते आणि हृदयात वेदना जी प्रकर्षाने त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होती. कविता ताईंच्या जाण्यानं निर्माण झालेली पोकळी आता आयुष्यभर जाणवेल ह्याची हळहळ इथं उपस्थित प्रत्येकाला वाटत होती कारण इथं आलेला प्रत्येक माणूस हा कविता ताईंचा ऋणी होता. असे ऋण ज्याची परतफेड कधीच होऊ शकत नाही. निदान ह्या जन्मी तरी नाही.
कविता देशपांडे म्हणजेच माझ्या लाडक्या कविता ताई. हे रसायनच मुळी वेगळं होतं. गेली जवळपास २० वर्षे त्या निस्वार्थ मनाने समाजसेवा करत होत्या. कित्येकांना त्यांनी रोजगार मिळवून दिला तर अनेकांच्या विसकटलेल्या संसाराची घडी पुन्हा व्यवस्थित बसविण्यात त्यांनी मदत केली. ज्यांची घरं उध्वस्त झाली त्यांना पुन्हा खंबीरपणे उभे राहण्याचे बळ दिले तेही ह्यांनीच. त्यांना त्यांच्या कामात मदत करायची संधी मला अनेकदा लाभली. त्यांच्या सोबत काम करायची मज्जा काही और होती.
रमेश भाऊ हे त्यांचे अगदी जुने सहकारी. त्यांना ही अश्रू अनावर झाले होते. ते गहीवरले. बोलताना त्यांचा आवाज कापत होता. "ताई गेल्या रे..ताई गेल्या..आपल्याला सोडून..कायमच्या.."
अंगावर काटा आला.माझ्या पायाखालची जमीन सरखली होती तरीही भाऊंना धीर देत मी म्हणालो,"कसं झालं ?"
तेव्हा हुंदका गिळून ते म्हणाले, "ताई काही आश्रमांना मदत करून घरी परत येत होत्या. रस्ता क्रॉस करत असताना सिग्नल तोडून येणाऱ्या एका भरधाव मोटर सायकलीने त्यांना धडक दिली. रक्ताच्या थारोळ्यात ताई पडल्या होत्या. मदतीसाठी हाका मारत होत्या. बघ्यांची गर्दी जमली पण मदतीसाठी एकही हाथ पुढं सरसावला नाही आणि त्यांनी तिथेच आपले प्राण सोडले.." हे सांगताना भाऊ कोसळले. मीही दोन पावलं मागे गेलो. मनात विचार आला की ज्या बाईने आपले संपूर्ण आयुष्य लोकांच्या मदतीसाठी खर्ची केले त्या बाईला असं मरण यावं? एखाद्या बेवारश्या सारखं?
ही घटना म्हणजे माणूसकीला काळीमा. खरंच विचार करायला लावणारी. ह्या घटनेने एक गोष्ट मात्र माझ्या लक्षात आली की समाजात माणसं तर खूप आहेत पण माणूसकी नाही. या गोष्टीची खरंच खंत वाटते.
कविता ताई तर गेल्या पण माझ्या सारख्या अनेकांना हा वारसा पुढे नेण्यासाठी प्रेरित करून.त्या नेहमी म्हणायच्या समाज सुधारणेसाठी प्रयत्न करत राहवा कारण बदल नक्कीच होणार. त्यांचं म्हणणं बरोबर आहे कारण कुठल्याही अपेक्षा न बाळगता केलेल्या कार्यात अपेक्षा भंग होण्याची भीती नसते. असतो तो फक्त उच्च कोटीचा आनंद. आमचं मार्गदर्शन करायला आमच्या कविता ताई आहेतच. त्याही आहेत ह्या अथांग आसमंतात आम्हाला आशीर्वाद द्यायला..


- निनाद वाघ

Friday, 29 January 2016

हरवले आहे !!


अहो आता तुम्हाला म्हणून सांगतो, असं म्हणतात शोधलं की सापडतं पण मी तर अगदी मनापासून प्रयत्न केला त्याला शोधण्याचा तरीही मला काही ते सापडले नाही. खरं सांगायचं तर ते हरवलं आहे हे समजायलाच खूप उशीर झाला. आयुष्याच्या ह्या प्रवासात ओघाने पुढं जात असताना अचानक एके दिवशी ते नसल्याचे जाणवले. मी मागे वळून पाहण्याचा खूप प्रयत्न केला पण ते काही दृष्टिस पडले नाही. वाईट वाटतं!
ही कहाणी आहे माझ्या हरवलेल्या बालपणाची. आयुष्यातलं हे एक सुंदर निरागस असं पर्व. ह्या सुंदर पर्वाच्या सुखद आठवणी मनात कायमच्या घर करून राहिल्या आणि साठवलेल्या ह्या आठवणींना उजाळा देताना डोळ्यांची कड अलगद ओलावते तेव्हा नकळत हिरावून घेतलेल्या त्या बालपणाची उणीव अगदी प्रकर्षाने भासते.

बसुनी एकटाच तटावरी
येते त्याची आठवण..
आता पुन्हा येणे नाही
किती रम्य ते बालपण..

माझ्या ह्या बालपणाला जबाबदारी म्हणजे काय हेच माहीत नव्हतं. मनाला हवं तेव्हा हवं तसं वागायचं. अगदी मनमोकळं बोलायचं. वागण्यात किंवा बोलण्यात कुठलाही कृत्रिमपणा नाही. बोले तो एकदम बिंधास्त..!
बालपणी मन सुद्धा अगदी लहान लहान गोष्टीत रमायचं. खेळायचं बागडायचं आणि भरपूर धमाल. थोडं खोडकर थोडं हट्टी. त्याची गंमत वेगळीच होती. पैसा श्रीमंतीची ओढ नव्हती. ना कसली तडजोड ना धावपळ आणि म्हणूनच टेंशन म्हणजे काय हेही माहित नव्हतं. स्वतःचं असं एक वेगळं विश्व होतं.
काळाच्या ओघात आयुष्य पुढे सरकत राहिलं आणि माझं बालपण त्यात निसटून गेलं. जबाबदाऱ्या वाढत गेल्या. आयुष्य एका विशिष्ट चक्रात फिरू लागलं. वागण्या बोलण्यात कृत्रिमपणा आला. आता माझं माझ्या बालपणाशी भेट होणे शक्य नाही कारण मी खूप पुढे आलो आणि ते मात्र तिथेच राहिलं. अगदी कायमचं!


किनारा :

किनाऱ्यावर होतो उभा
ओढ लागली समुद्राची..
पोहताना त्या खवळलेल्या सागरात
जीव अडकला किनाऱ्यापाशी..

किनाऱ्यासंगे बालपण माझे
अथांग आयुष्य समुद्रासारखे..
सुख दुःखाच्या लाटा वाहे
जीव किनाऱ्यात अडकून राहे..


- निनाद वाघ

Friday, 22 January 2016

जरा ‘त्या' बद्दल बोलूया


मान्यवरहो,

सर्वप्रथम मी तुमची क्षमा मागतो कारण गेल्या काही दिवसात मी काही ब्लॉग पोस्ट केलं नाही. बरेच दिवस नवीन पोस्ट नाही म्हटल्यावर मला अनेकांचे मेसेज आले तर काहींनी मला प्रत्यक्ष विचारलं. ह्यावरून माझ्या एक गोष्ट लक्षात आली की तुम्ही माझा ब्लॉग आवर्जून तर वाचता पण पोस्ट नाही म्हटल्यावर तुम्ही ते मिस केलं आणि म्हणूनच मी एका नव्या विषयासह तुमच्या समोर यायचं ठरवलं.

आज जो विषय निवडला आहे तो विषय तसा सोपा आहे पण तरीही न समजणारा. अगदी सरळ साधं वाटणारा पण तरीही एक न सुटणारं कोडं. हो मला जरा ‘त्या’ बद्दल बोलायचं होतं. ‘त्या' बद्दलच!

त्या बद्दल म्हणजे नेमकं कशा बद्दल हा प्रश्न तुम्हाला नक्की पडला असेल. तर ऐका..मला बोलायचे आहे ते प्रत्येकाला स्वतःचं असं असणाऱ्या त्या रहस्यमय आयुष्याबद्दल. आपल्या आयुष्याबद्दल!



वाटते सहज, अगदी सोपे
दडली ह्यात अनेक रहस्य..
सुख दुःखाचा खेळ हा सारा
ह्याला म्हणतात आपलं आयुष्य..


खरंतर आयुष्य अशा सुंदर शब्दाला स्वतःची अशी व्याख्या नाही. फार फार तर असं म्हणू शकतो की जन्मापासून मृत्यू पर्यंत केलेला प्रवास म्हणजे आयुष्य. एकट्यानं सुरु झालेला प्रवास असतो हा पण टप्प्या टप्प्यानं त्यात माणसं जोडली जातात आणि ह्या प्रवासाला एक वेगळा रंग चडतो. नाही का?

आयुष्य ह्या एका शब्दात अनेक गुपितं दडलेली असतात. तसं बघाल तर खूप काही आहे आयुष्यावर बोलण्यासारखं पण शब्दात मांडण्या इतकं सोपं ही नसतं ते, कारण अनुभवातूनच ते घडत असतं. दुःखातून सावरत सुखाचा मार्ग शोधत ते अगदी सावधपणे तरीही वेगाने पुढे सरकत असतं. प्रत्येकाचं आयुष्य हे खूप वेगळं असतं पण तरीही त्यात खूप साम्य असतं.

मग इतकं साम्य असताना सुध्दा प्रत्येक आयुष्य वेगळं कसं? अनेकांना हार पत्करावी लागते तर जिंकणं काहींना शक्य होतं. खरंच जिंकणं इतकं कठीण असतं का हो?

ह्याचं उत्तर आहे नाही.

आयुष्यात खरंतर जिंकणं फार सोपं असतं. आयुष्य सहज जिंकता येतं पण त्यासाठी माणसांना जिंकता आलं पाहिजे त्यांचं मन जिंकता आलं पाहिजे.आपल्या माणसांना दुरावून मिळवलेलं यश हे खरंतर आपलं अपयश असतं कारण आयुष्याच्या शेवटी किती पैसे कमावले ह्या पेक्षा आपण किती माणसं जोडली ह्यात माणसांची खरी श्रीमंती ठरते. तीच आपली खरी संपत्ती.तेच आपलं खरं यश.


- निनाद वाघ