Friday 12 February 2016

वडा पाव


मी शाळेत असतानाची गोष्ट. आमच्या शाळेच्या आवारात एक माणूस रोज यायचा. वयाने तसा वृद्ध होता. कमरेतून जरासा वाकलेला. डोक्यावर वेताची टोपली अन् त्यात लाल रंगाच्या गोळ्या आणि वडा पाव विकायचा. त्या काळी शाळेत जाताना खिशात मोबाईल किंवा मनगटावर घड्याळ नसायचे आणि म्हणूनच वर्गाच्या खिडकीतून त्या माणसाला आवारात शिरताना पाहिले की समजायचे आता लवकरच मधली सुट्टी होणार अन् आनंद व्हायचा.
मधल्या सुट्टीत मुलांचा घोळका नेहमी त्याच्या अवती भोवती असायचा.सर्व मुलांचा तो लाडका ‘वडा पाव चाचा’ होता.कोणी वडा पाव घ्यायचं तर कोणी छोट्या लाल गोळ्या. ते चिमुकले हात जेव्हा त्या थरथरणाऱ्या हातावर दोन पाच रूपये ठेवायचे तेव्हा सूरकुत्या पडलेल्या त्याच्या चेहऱ्यावर समाधानाची रेष अगदी स्पष्ट दिसायची.
मलाही कधीकधी मोह व्हायचा वडा पाव खाण्याचा परंतु घरातून परवानगी नव्हती. आईनं दिलेला डबा खायचा अशी सक्त ताकीद होती. गुपचूप खायचं म्हटलं तर खिशात पाच रूपये ही नसायचे. मग एके दिवशी आईकडे खूप हट्ट करून परवानगी मिळवली. शाळेत जाताना आईनं हातात पाच रूपये ठेवले अन् सांभाळून घेऊन जा म्हणून सांगितलं. खिशात पाच रूपये ठेवल्यावर खिसा अगदी भरल्या सारखा वाटला.खूप आनंद झाला. 
शाळेत अगदी उत्साहात गेलो. वर्गात काही लक्ष लागेना. माझी नजर शोधत होती ती फक्त आणि फक्त चाचांना. तास संपत होते तसे मन आणखीनच आतूर होत होते पण चाचा काही दिसेना. इतक्यात मधल्या सुट्टीची बेल झाली. अजूनही चाचांचा काही पत्ता नव्हता. कदाचित चाचा अगोदरच आवारात शिरले असतील ही आशा मनात बाळगून मी अक्षरशः पटांगणात धावलो. ते तिथेही नव्हते. आता मात्र मन उदास झाले होते. रागही खूप येत होता. मी तिथेच जोर जोरात रडू लागलो आणि पुन्हा वर्गात जाण्यासाठी निघालो. तेव्हा अचानक चाचांना पटांगणात शिरताना पाहिले. क्षणात डोळ्यांतून आसवे गायब झाली आणि चेहऱ्यावर प्रसन्नता उमटली. लगेच हात खिशात गेला. आईनं दिलेल्या पाच रूपयांत तीन रूपयांचा वडा पाव आणि दोनच्या लाल गोळ्या घेतल्या. वडा पाव खाण्यापेक्षाही तो स्वतः विकत घेतल्याचा आनंद जास्त होता.मन अगदी तृप्त झालं. 
शाळा सोडून आता अनेक वर्ष लोटली पण आजही कधी शाळेच्या परिसरात गेलो तर माझी नजर त्या चाचांना शोधत असते. आज खिशात पाच चे पाचशे झाले.पोटातली भूकही वाढली.अनेकदा अनेक ठिकाणी वडा पाव खाल्ले पण कधीच चाचांच्या हातची सर त्याला नव्हती. शाळेत असताना खाल्लेल्या त्या पहिल्या वडापावाची चव आजही जिभेवर आहे आणि आयुष्यभर राहील.. 



- निनाद वाघ






1 comment:

Unknown said...

छान शाळेतल्या कॅन्टीन ची आठवण करून दिलीस मस्त!