Friday 19 February 2016

जरा माणसांसारखं वागूया



आज तुमच्या समोर माझी एक कविता सादर करतोय. ह्या कवितेचं शीर्षक आहे “जरा माणसांसारखं वागूया”
ह्या कवितेचा संदर्भ असा आहे की बदलणाऱ्या काळा सोबत माणूस इतका बदलत गेला की तो माणसांशी माणसांसारखं वागणं विसरून गेला.
खरंतर माणूस हा शिक्षण, नोकरी, पैसा ह्यात असा काही गुंतला गेला आहे की त्याच्याकडे नेहमीच वेळेचा अभाव असतो. ना परिवारासाठी तो वेळ देऊ शकतो, ना मित्र मैत्रीणींसाठी आणि ना स्वतःसाठी. शिवाय फेसबूक, वॉट्सॲप सारख्या माध्यमातून जग अगदी जवळ आलंय. जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात आपण कुणाशीही बोलू शकतो, त्याला पाहू शकतो पण ह्या सगळ्यात माणसांमधे दुरावा निर्माण होत आहे हे आपल्या लक्षात येत नाही. आजकाल आपल्या घरच्या लोकांशी बोलणं तर होतं पण संवाद हरवलाय. तुम्हाला तरी आठवतं का कट्ट्यावर मित्रांशी शेवटच्या गप्पा कधी मारल्या? हे सगळं आता ऑनलाइन होतं. नात्यांमधली ती गंमत हरवलीय.
एखाद्या यंत्रासारखं आपल्या कामाचं चक्र नुसतं सुरू असतं. काहीजण तर आपल्या स्वतःच्या घरी लॉजींग बोर्डींगला आल्या सारखे येतात. रात्री चेक इन करतात अन् सकाळी चेक आऊट.
जगण्यासाठी माणसाला काम करून पैसे कमवणं नक्कीच गरजेचं आहे पण हे करत असताना थोडा वेळ आपल्या माणसांना देणंही तितकंच गरजेचं आहे. आपण कितीही बिझी असलो, कामाचा कितीही लोड असला तरीही थोडा वेळ हे सारं बाजूला सारून माणसांशी मनमोकळेपणाने वागता आलं पाहिजे म्हणजे जगणं नक्कीच सुकर होईल. नाही का?



जरा माणसांसारखं वागूया..

सारून सारं बाजूला
मनमोकळं जगूया म्हणतोय..
तुटलेली नाती सारी
पुन्हा नव्याने जोडूया म्हणतोय
आज जरा माणसांशी
माणसांसारखा वागूया म्हणतोय..


आजी सोबत जरा निवांत
गप्पा मारूया म्हणतोय..
आजोबांसोबत फिरायला जरा
पार्कात जाऊया म्हणतोय..
आज जरा माणसांशी
माणसांसारखा वागूया म्हणतोय..


आईच्या हातचा गरम भात
तिच्या सोबत जेवूया म्हणतोय..
सोडून नुसते बोलणे
बाबांशी संवाद साधूया म्हणतोय..
आज जरा माणसांशी
माणसांसारखा वागूया म्हणतोय..


ताईची गंमत करताना
दादाची ही खोड काढूया म्हणतोय..
सोनेरी बालपण आठवताना
सारं जग विसरूया म्हणतोय..
आज जरा माणसांशी
माणसांसारखा वागूया म्हणतोय..


मित्रांना आता पुन्हा
जुन्याच कट्ट्यावर भेटूया म्हणतोय..
तुटलेली नाती सारी
पुन्हा नव्याने जोडूया म्हणतोय..
आज जरा माणसांशी
माणसांसारखा वागूया म्हणतोय..


- निनाद वाघ



No comments: