Friday 2 November 2018

माणूस



माणूस


परिस्थितीशी झुंज देणारा 
असा माणूस व्हायला हवा..
आसवे गाळावे त्यांनीही 
पण मानसिकरीत्या खंबीर हवा..


प्रत्येक प्रश्नांना उत्तर नसले तरीही
शोधायचा त्यांने प्रयत्न करावा..
मनात झालेला विचारांचा गुंता
अगदी अलगद असा सोडवून घ्यावा..


राग आला कितीही तरी
मनात त्याच्या क्रोध नसावा..
कठीण समय आला जरी
चेहरा कायम प्रसन्न असावा..


परिस्थितीशी झुंज देणारा 
असा माणूस व्हायला हवा..
आसवे गाळावे त्यांनीही 
पण मानसिकरीत्या खंबीर हवा..


- निनाद वाघ

Monday 15 October 2018

बोलावंसं वाटत होतं..


बोलावंसं वाटत होतं..


बोलावंसं वाटत होतं
सांगावंसं वाटत होतं
का कोण जाणे त्या रात्री..
भेटावंसं वाटत होतं..


अंधार दाटला होता तेव्हा
मनात काळोख पसरला होता..
अंधुक सारं जग होतं
मन अस्वस्थ वाटत होतं
का कोण जाणे त्या रात्री..
भेटावंसं वाटत होतं..


सरल्या क्षणांच्या आठवणींना
भरल्या डोळ्यांनी साक्ष दिली
गर्दीत त्या माणसांच्या
एकटंसं वाटत होतं
का कोण जाणे त्या रात्री..
भेटावंसं वाटत होतं..


ओळखीचा तो रस्ता होता
अनोळखी ते वळण होतं
भेट होऊदे आता तरी
देवाकडे एकच मागणं होतं..
का कोण जाणे त्या रात्री..
भेटावंसं वाटत होतं..


ऐकलं देवानं तेव्हा माझं
भेट तुझी स्वप्नात झाली..
उदय झाला सूर्याचा
अन् प्रसन्न एक पहाट आली..


- निनाद वाघ

२५.०५.२०१८

Wednesday 12 September 2018

भेटला तो पुन्हा..


आज जवळपास ७ वर्षांनी तो मला दिसला. जसा ७ वर्षांपूर्वी पाहिला होता अगदी तसाच. डोक्यावर झिरो कट, डोळ्यावर चष्मा, लाल टी शर्ट हाफ पँट अन् उजव्या हातात सिगारेट तर डाव्या हातात कटींग चहा. मी काही बोलणार इतक्यात त्यांनीच मला हाक मारली, "काय रायटर साहेब.. काय म्हणता?" माझ्या आयुष्यात मला साहेब म्हणणारे क्वचितच असतील आणि त्यात रायटर साहेब म्हणून हाक मारणारा हा एकमेव होता. 

"बस देवाच्या कृपेने चाललंय चांगलं.. तू बोल.. होतास कुठे इतकी वर्ष? कॉलेज संपलं आणि तू गायब झालास..विसरलास ना मला..एक फोन नाही की मेसेज नाही..नंबर सुध्दा चेंज करून बसलास?"

"काय रायटर साहेब..तुम्हाला कसं विसरू शकतो..आम्ही छोटी माणसं..जाणार कुठं..कामासाठी मुंबई बाहेर होतो..आता परत मुंबईला शिफ्ट झालोय..बाकी नवीन काय लिहिलं इतक्या वर्षात.. शब्दात मांडतोयस की नाही..?"

"लिहितो तसं छोटं मोठं काहीतरी पण वेळ मिळत नाही रे तितकासा.."

"काय बोलतो..साला तू रायटर है और लिखना बंद? कॉलेजमध्ये असताना सिगरेट चहा आणि तुझी कविता.. साला एक दिन नही गया उसके बिना.. काय दिवस होते यार ते..आणि बाय द वे तू खूप जाडा झालायस असं वाटत नाही का? नुसता चरत असतोस की काय?"

"हो रे.. माझं सामाजिक वजन वाढविण्याच्या प्रयत्नात होतो तर शारीरिक वजन वाढत गेलं..पर मेरा छोड़.. तू बता.. तू अभी तक वैसा ही है.. कुछ नहीं सुधरा.. गिटार कहां है.. I hope बंद नही किया..."

"हो अधून मधून कधीतरी वाजवतो रे..बाकी वेळी आयुष्य आपली वाजवत असते..भाई मी काय म्हणतो..चल ना अपने पुराने कट्टे पे चलते है.." सिगरेटचा धूर सोडत तो म्हणाला.

आमची ओळख कॉलेजपासूनची. रुपारेल कॉलेज समोर एक चहावाला होता. तिथे आम्ही बसून तासन् तास टाईमपास करायचो. कुठल्याही विषयावर आमचं चर्चा सत्र चालायचं. जेव्हापासून मी त्याला ओळखायला लागलो तेव्हापासून त्याच्या हातात सिगारेट बघतोय. बऱ्याचदा त्याला समजावण्याचा प्रयत्न केला की हे व्यसन बरं नाही. त्यावर त्याचं नेहमी एकच उत्तर असायचं,"आपलं ना कुणी आई न बाप..ना कसला आगा ना पिछा..मग मेलो तरी कुणाला फरक पडणार आहे?" 
मग मी ही सांगणं सोडून दिलं. त्याला आहे तसं स्वीकारलं.आमच्या कॉलेजच्या अशा असंख्य आठवणी आहेत. सोबत केलेल्या असाईनमेंट्स, लेक्चर बंक करून कॉलेज कॕम्पसमधे किंवा कँटीनमधे केलेला टाईमपास वगैरे. बोलता बोलता आम्ही आमच्या जुन्या कट्ट्यावर पोहोचलो. 

"काय राम चाचा.. ओळखलं का?

"निनाद बाबा.. आशिश बाबा तुम्ही? आप दोनों को कौन भूल सकता हैं..पर बडे दिनों के बाद आयें.."

आमच्या कट्ट्यावरच्या गप्पांचा राम चाचा हा एक महत्त्वाचा साक्षीदार. त्याचं नाव राम पण त्याच्या आजूबाजूला लोकं चहा-चहा करायची म्हणून त्या चहा चहा चं अपभ्रंश आम्ही चाचा केलं आणि पुढे त्यांना राम चाचा हेच नाव पडलं अन् नकळत असं एक नातं त्यांच्याशी जोडलं गेलं. ह्या कट्ट्यावर आम्ही हसलो रडलो, अनेक अविस्मरणीय क्षण घालवले आणि त्या सगळ्यात राम चाचा नेहमी सोबत असायाचे. कित्येकदा तर आम्हाला पडलेल्या प्रश्नांची त्यांच्याकडे साधी सोपी उत्तरं असायची.

"हे घ्या तुमचा तोच स्पेशल कटींग. शक्कर कम..अदरक ज्यादा.."

" राम चाचा तुम्हाला हे अजूनही लक्षात आहे"

" कसं काय विसरणार. तुमच्या नंतर इथे अनेक मुलं आली पण त्यांना तुमची सर नव्हती. आप दोनो की तो बात ही अलग थीं "

"..आणि तुमच्या सारखा चहा मला परत कधीच मिळाला नाही." असं म्हणत आम्ही काही वर्ष मागे गेलो.

आशिश मात्र इतका वेळ जरा शांतच होता. थोडा हळवा वाटला.
" काय रे मित्रा..काय झालं? अचानक असा शांत झालास. सगळं Ok ना?"

"हो रे..साला इथे आलो आणि ते सगळे जुने दिवस आठवले. काय दिवस होते रे ते..! तुला राजन सर आठवतात ना..किती खेचायचो आपण त्यांची. बिचारा देव माणूस. आपण इतकी मस्ती करायचो तरी कधी चिडला नाही. उलट परिक्षा जवळ आली की नोट्ससाठी मदत करायचा. आपल्या टॕलेंटचं नेहमी कौतुक करायचा."

"बघ ना यार..गेले ते दिवस अन् उरल्या फक्त आठवणी"

"बाकी आपला ग्रूप काय म्हणतोय? प्रतीक अजूनही तितकाच बारीक आहे की वाढला तुझ्यासारखा? ऋुतुजा सायलीचं काय? सगळे कसे आहेत? साला इतकी वर्षं भेटलोच नाही कुणाला".
"सगळे मजेत आहेत रे..भेटतो आम्ही बर्‍याचदा..तुझी आठवण काढतात सगळे..सायली चं लग्नं आहे डिसेंबरमधे.."

"काय सांगतोस..तिचं अभिनंदन करायला हवं.. सगळे भेटू आपण एकदा.."

"हो नक्की"

"काय रायटर साहेब..आपल्या लाईफवर काहीतरी लिही की.."

मी नुसताच हसलो. तो ही हसला. त्याने पुन्हा सिगरेट पेटवली आणि एक पफ मारत म्हणाला," साला तू बँकमधे मी मार्केटिंगमधे. नुसते टार्गेट्स चेझ करतोय. आठवतं इथे बसूनच आपण ठरवलेलं की तू लिहिलेलं गाणं मी कंपोझ करणार. काय स्वप्नं होती आपली. कुठे आणि कधी हरवली तेच कळलं नाही."

"करू रे आपण. अजूनही वेळ गेलेली नाहीये. आयुष्याच्या कुठल्या एका अनवट वळणावर पुन्हा असेच भेटू तेव्हा तुझी ट्यून तयार ठेव आणि माझे शब्दही रेडी असतील.."


- निनाद वाघ