Sunday 7 June 2020

भाग ५: एक अनवट वळण


आयुष्य खूप पुढे सरकलं होतं. कॉलेज सुटून आता बरीच वर्ष झाली होती. माझे सगळेच मित्र-मैत्रीणी आता जवळपास सेटल झाले होते. काहींची तर लग्न सुद्धा उरकली होती. मी सुद्धा एका चांगल्या कंपनीत कंटेंट रायटर म्हणून नोकरी करत होतो. कविता करणे वगैरे सुरूच होते. अधूनमधून कवितांचे कार्यक्रम सुद्धा सुरू होते. म्हणायचं तर सगळं छान चाललं होतं.

तिची भेट आता पुन्हा काही होणार नाही हे जवळपास निश्चित होतं. मी सुद्धा आयुष्यातील ते पान हृदयाच्या एका कोपऱ्यात दुमडून ठेवलं होतं. कधीतरी तिचा विचार यायचा आणि मन हळवं व्हायचं. पण कुठेतरी हे सगळं स्वीकार केलेलं. असो..

ह्या सगळ्या धावपळीत एके दिवशी मला शैलेशचा फोन आला. शैलेश हा माझा कॉलेजचा मित्र. नंतर नोकरी निमित्त तो पुण्याला असायचा. तेव्हापासून आमचा तितकासा कॉन्टॕक्ट नव्हता.

"काय मित्रा खूपच बिझी दिसतोय. ना फोन ना मेसेज. मी पुण्याला काय गेलो मला विसरलास.."

"असं काही नाही..आय नो..माझ्याकडून राहून गेलं..सॉरी..पण तू तरी कुठे केलास.."

"असो..मी तूला एक गुड न्यूज द्यायला फोन केलाय"

"कसली गुड न्यूज?"

"अरे माझं लग्न ठरलंय..पुढच्या महिन्याच्या १० तारखेला लग्न आहे. तुला यायचंच आहे. मला कसलीही कारणं नाही चालणार. पिट्या, वर्षा, राघव..सगळेच येतायत."

" वॉव..सही..अभिनंदन मित्रा..ग्रेट..मी नक्की येणार..त्यात काही शंकाच नाही. अरेंज की लव?"

"येस..अरेंज रे..मी तुला पत्रिका पाठवतोय आणि वॉट्सॲप सुद्धा करतो. नक्की ये. बाय"

"बाय.."

मला खूप आनंद झालेला. शैलेशच्या लग्नासाठी मी खूपच एक्सायटेड होतो. सगळे जुने मित्र भेटणार होते. जुन्या आठवणी जाग्या झाल्या.

पिट्याने तर वाट्सॲप गृप पण बनवला होता. "मिशन शैलेशचं लग्न" त्यात सगळ्यांच्या चर्चा सुरू झाल्या. कसं जायचं..ड्रेस कोड काय वगैरे. अचानक एक नवी ऊर्जा आली होती.

तयारी जोरदार सुरू होती अन् बघता बघता तो दिवस आला. ठरल्या प्रमाणे पिट्या गाडी घेऊन माझ्या घराजवळ आला आणि आम्ही हॉलवर पोहोचलो. बाकी तिथेच भेटणार होते. लग्न मुंबईत होतं. हॉलवर सगळेच भेटले. इतक्या वर्षांनी भेटल्यानं सर्वांना आनंद झाला होता.

आम्ही आत शैलेशच्या रूममध्ये गेलो. नवरदेवाच्या थाटात तो वेगळाच दिसत होता.

"काय रे वहिनी कुठेय आमच्या..दिसल्या नाहीत त्या..आमची भेट घडवून दे की.."

"तयारी करतेय रे ती..येईल इतक्यात..तुम्ही नाश्ता करून या आधी"

आम्ही नाश्ता करायला म्हणून गेलो. येताना मला एक फोन आला म्हणून मी थांबलो अन् बाकीचे पुढे गेले. काही मिनिटांनी मला वेटींग वर पिट्याचा फोन आला.
मी चालू कॉल होल्डवर ठेवून तो उचलला.

"अरे कुठे आहेस ये लवकर..वहिनी आल्या आहेत.."

"हो..लगेचच आलो.."

मी फोन ठेवला आणि हॉलमध्ये जात होतो. स्टेजजवळ पिट्या आणि बाकीचे घोळका करून उभे होते. मी तिथे जातच होतो इतक्यात पिट्या बाजूला झाला आणि मला "वहिनी" दिसल्या. मी पाहून थक्क झालो. माझ्या पायाखालची जमीनच सरकली. होय..ही तिच होती..तीच जिला मी इतकी वर्ष शोधत होतो. मी वाहणाऱ्या डोळ्यांनी तिच्याकडे बघत राहिलो..

सजलेल्या लग्न मंडपात
तुला नवरी म्हणून पाहिलं..
अन् तुझ्यावरचं माझं प्रेम
व्यक्त करायचं राहिलं..

**END**

- निनाद वाघ ©