Friday 20 May 2016

गोष्ट एका रात्रीची


रात्रीची वेळ. साधारणतः दहा वाजले होते. जेवणानंतर असाच एक फेरफटका मारायला म्हणून मी घरून निघालो आणि चालत चालत पोहोचलो ते शिवाजी पार्क जवळच्या चौपाटीवर. तिथल्या खडकावर जाऊन बसलो. एरवी गजबजलेली मुंबई रात्री मात्र अगदी शांत आणि सुरेख वाटत होती. आसपास फारशी माणसं नव्हती. मागील रस्त्यावर गाड्यांची ये जा ही नव्हती. होती ती फक्त निरव शांतता आणि सोबतीला आकाशात पसरलेलं छान शुभ्र चांदणं. किनाऱ्यावर येणाऱ्या प्रत्येक लाटेसह होणाऱ्या पाण्याच्या स्पर्शानं मन प्रफुल्लीत होत होतं. त्या रात्रीची जादू काही औरच होती.
अशा ह्या वातावरणात मीही हरवून गेलो. अशा बेभान अवस्थेत अचानक कानावर काही मधुर स्वर पडले. दूरवर कुठंतरी कुणीतरी आपल्या सुमधुर स्वरात गात असावं. इतक्या रात्री कोण बरं गात असेल ह्याचं कुतूहल वाटत होतं. त्या आवाजाच्या दिशेनं माझी पावलं वळली. जसा जसा पुढं जात होतो तशी मनाची उत्सुकता वाढत होती. शेवटी एका ठिकाणी पोहोचलो. समोरच्या एका खडकावर एक म्हातारा इसम दिसला. एखाद्या शास्त्रीय गायकाला शोभेल असाच काहीसा पोशाख. त्यांचा आवाज, तो स्वर मंत्रमुग्ध करणारा होता. अशा चांदण्या रात्री समुद्र किनारी असं गाणं म्हणजे कानांना खरंच पर्वणी. अहाहा!
मी अगदी तल्लीन होऊन त्यांचं गाणं ऐकत होतो. ते ही अगदी उत्साहाने गात होते. गाता गाता त्यांची नजर माझ्यावर पडली तसे ते थांबले. 
मी म्हणालो, “पंडितजी गाणं थांबवू नका. गात रहा. तुमच्या आवाजात जादू आहे. ह्या मैफीलीनं माझे कान तृप्त झाले.”
मग पुढचा तास दीड तास त्यांचं गाणं अगदी मन भरून ऐकत होतो. त्या नंतर आमच्या गप्पा रंगल्या. ते सांगत होते अन् मी ऐकत होतो. त्यांनी त्यांच्या काळातले गाण्याच्या कार्यक्रमातले किंवा रेकॉर्डिंगचे गमतीदार किस्से सांगितले. गायक म्हणून केलेला प्रवास त्यातल्या चांगल्या वाईट गोष्टी त्याही सांगितल्या. मलाही गमंत वाटत होती आणि त्यांच्या जीवन प्रवासाचा अभिमान सुद्धा.
“तुम्ही रोज येता का इथे? मला आवडेल तुमचं गाणं रोज ऐकायला.”
ते नुसतेच हसले आणि तिथून निघाले. मला जरा आश्चर्य वाटलं पण मग मी ही तिथून निघालो.
घड्याळ पाहिलं तर पहाटेचे पाच वाजले होते. सूर्योदयाची चाहूल लागली होती. हळूहळू घराकडे जाताना नाक्यावर चहाची टपरी दिसली. तोही नुकताच धंदा सुरू करत होता. चहा घेण्यासाठी म्हणून थांबलो. तितक्यात तिथे पेपरवाला ही दिसला. चहा सोबत वाचायला म्हणून पेपर घेतला. मनात अजूनही पंडितजींचा आवाज घुमत होता. ही रात्र अद्भुत होती. कायम स्मरणात राहणारी. 
चहाचा घोट घेत मी पेपर चाळत होतो. इतक्यात मधल्या एका पानावर पंडितजींचा फोटो दिसला. आत्ता भेटलेल्या माणसाचा फोटो पेपर मधे पाहून मी आनंदानं वाचायला गेलो तर फोटो खाली लिहिलं होतं:
पंडित रामशंकर ह्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
त्यांची आज पाचवी पुण्यतिथि होती.



- निनाद वाघ



No comments: