Friday 6 May 2016

बेड नंबर १५



आज आसमंतात सर्वत्र मळभ पसरले होते. भर उन्हाळ्यात आभाळ सुध्दा भरून आलं होतं. मी त्या वास्तू जवळ पोहोचलो. अगदी अस्वस्थ मनाने त्या पायऱ्या चढलो. प्रत्येक पायरी सोबत मनातली धाकधूक वाढत होती. तिसऱ्या माळ्यावर पोहोचलो तेव्हा माझे बिथरलेले डोळे अगदी कासावीस होऊन त्यांना शोधू लागले अन् दिसला तो अगदी कोपऱ्यात असलेला बेड नंबर १५.

त्या बेडवर त्यांना झोपलेल्या अवस्थेत पाहिलं आणि डोळ्याच्या कडा ओलावल्या. जरा जवळ गेलो आणि माझ्या थरथरत्या हातांनी त्यांचा स्थिर हात हातात घेतला आणि कापऱ्या स्वरात हुंदका गिळत म्हटलं, “आजोबा मी आलोय” 

माझा स्पर्श त्यांच्यासाठी ओळखीचा होता. त्यांनी त्यावरून मला ओळखलं कारण मला पाहून ओळखण्याची मुभा त्यांच्याकडे नव्हती. दुर्दैवाने ते अंध होते. 
“काय कसे आहात?” मी विचारलं.

ते बोलायचा प्रयत्न करू लागले. खूप काही सांगायचं होतं त्यांना. आपलं मन मोकळं करायचं होतं पण नियतीनं त्यांना सक्तीचं मौन पाळायला लावलं होतं. त्यांची बोलण्याची ताकद हिरावून घेतली होती.
माझं आणि आजोबांचं असं एक अनोखं नातं होतं. त्यांच्या प्रत्येक हाकेला ओ द्यायला मी हजर असायचो. माझ्या कवितांचे कार्यक्रम आकाशवाणीवर झाले ते त्यांच्याच प्रोत्साहनानं. मी आयुष्यात शिक्षण आणि मानानं फार मोठा झालेलं त्यांना पाहायचं होतं. मी माझ्या कवितांचा कार्यक्रम सादर करावा आणि त्यात अगदी पहिल्या रांगेत बसून त्यांनी त्याचा आस्वाद घ्यावा अशी त्यांची इच्छा होती.

अगदी काल परवा पर्यंत हसत खेळत माझ्या सोबत गप्पा मारत बसलेले माझे आजोबा आज असे अंथरूणावर खिळून राहिलेले दिसतात तेव्हा मन कितीही खंबीर असलं तरी ते पार कोलमडून जातं. मनात विचारांना उधाण येतं. तेही खवळतं.

मी त्यांच्या अंगावरून हात फिरवला. ते सांगू शकत नसले तरी त्यांना होणाऱ्या वेदना जाणवत होत्या. आपल्या उजव्या हाता पायाने ते उठून बसण्याचा करत असलेला केविळवाणा प्रयत्न माझे वाहणारे डोळे हताशपणे पाहत होते. डावीकडून त्यांना साथ नव्हती. ती बाजू पूर्णतः निकामी झाली होती. स्वतःच्या मर्जीनं ते आपल्या हाताची बोटं सुध्दा फिरवू शकत नव्हते. इतकं लाचार झालेलं मी त्यांना ह्या आधी कधीच पाहिलं नव्हतं.
त्यांचं जीवन अगदी सरळ साधं होतं. कधीच कुणाचा वाईट विचार केला नाही. अशा माणसाला असं असहाय्य जगणं कशासाठी? 

तेव्हा बा. सी. मर्ढेकर ह्यांच्या कवितेची ओळ आठवली
“जगायची पण सक्ती आहे मरायची पण सक्ती आहे”

आजोबांची ही अवस्था काही पाहवत नव्हती पण तिथून पावलं देखील वळत नव्हती. आजोबांकडे पाहत माझं मन हळवं होत म्हणालं:

आजोबा तुम्हाला भेटल्या शिवाय राहवत नाही
तुमची ही अवस्था डोळ्यांनी काही पाहवत नाही..
वेदनेतून सुटका व्हावी असं मनाला वाटतं
आठवणींनी तुमच्या मन बघा दाटतं..
म्हणून म्हणतो..
जे झालं ते व्हायला नको होतं..
आधीच अंधारात असलेलं जीवन 
अजून काळोखात जायला नको होतं..
जगायला अशी सक्ती तरी कशाला?
मरणाच्या दारावर असं झुरायला नको होतं..

अगदी जड अंतःकरणाने मी तिथून निघालो. पायरी जवळ पोहोचलो तेव्हा आजोबांची हाक ऐकू आली. मी मागे वळलो तर त्या बेड वर ते अगदी दीन अवस्थेत अंधारात दिसणाऱ्या जगाकडे शून्यात पाहत पडले होते. कदाचित त्यांच्या हृदयानी मारलेल्या हाकेला माझ्या मनाने अलगद ओ दिला असावा.



- निनाद वाघ





No comments: