Monday, 13 March 2017

शब्द शब्द अन् शब्द

शब्द शब्द अन् शब्द..
त्यांची जुळवा जुळव..
अविरत विचार..
समजत नाही नेमकं लिहायचं काय ते..
तरीही 
लिहित असतो कागदावर..
एक शब्द मग दुसरा..
बघता बघता त्याचं वाक्य होतं..
अशी अनेक वाक्य..
कविता म्हणा हवं तर..
खरंतर भावनांची गुंफण..
नकळत कागदावर उतरलेली..
जे बोलू शकलो नाही कधीही 
तेच मांडण्याचा केवीळवाणा प्रयत्न..
कधी सफल
कधी फसलेले..
तरीही चेहऱ्यावर एक समाधान..
शब्दात मांडल्याचं..
तुम्हाला सांगितल्याचं..
तेच सदैव राहील..
- निनाद वाघSunday, 8 January 2017

थोडं मनातलं..
नमस्कार मान्यवरहो,


आज हे लिहिताना मनाताल्या भावना खरंच खूप वेगळ्या आहेत. आनंद तर आहेच पण शब्दांच्यापलीकडे जाऊन भावनांना वाट करून द्यावी असं वाटतंय कारण आज माझ्या 'शब्दात मांडतो मी' ह्या ब्लॉगला एक वर्ष पूर्ण होत आहे. खरंतर एक वर्ष पूर्ण झालं ह्यावर अजूनही विश्वास बसत नाहीये. आत्ताच कुठे एक छोटंसं रोपटं लावलं होतं आणि बघता बघता ते इतकं बहरेल ह्याची खरंच कल्पना नव्हती. ह्या ब्लॉगने मला खूप काही दिलं.थोड्याफार प्रमाणात का होईना पण ह्या ब्लॉगने मला माझी अशी एक स्वतंत्र ओळख निर्माण करून दिली. माझं लिखाण लोकांपर्यंत पोहोचलं. माझा आत्मविश्वास वाढवला.

खरंतर एका वर्षापूर्वी ब्लॉग सुरू करावा की नाही ह्यावर मनातल्या मनात गोंधळ उडाला होता. लोकं आपल्याला खरंच स्वीकारणार का अशी धाकधूक मनात होती. हो नाही करता करता अखेर ब्लॉग सुरू करावा असं ठरवलं आणि आज एका वर्षानंतर ३००००+ Page Views असणारा ब्लॉग म्हणून नावारूपाला आला तेव्हा घेतलेल्या निर्णयाचं समाधान वाटलं.

ब्लॉग लिहिण्याचा संपूर्ण प्रवास हा अगदी सुखद होता तसंच त्यातून खूप काही शिकण्यासारखंही होतं. एक लेखक किंवा कवी म्हणून तर शिकायला मिळालं पण वैयक्तिक आयुष्यातही ह्याचा फायदा झाला कारण त्या अनुभवाचा परिणाम माझ्या व्यक्तीमत्वावर होत होता आणि नकळत कुठेतरी मी माणूस म्हणून घडत होतो ह्याची जाणीव मला आज होत आहे.

ह्या ब्लॉगचं खरं श्रेय जर कुणाला जातं तर ते तुम्हा माय बाप रसिक वाचकांना. तुमचा पाठिंबा होता म्हणून तर हा मैलाचा दगड गाठू शकलो. तुमचे आभार मानावे तितके कमीच. जे लिखाण आवडलं ते तुम्ही उचलून धरलं तर जेव्हा अडखळलो तेव्हा तुम्हीच सावरलं. हे तुमचे ऋण मी आयुष्यभर नाही विसरणार. वेळोवेळी येणाऱ्या तुमच्या प्रतिक्रिया मला लिहायला अजून प्रोत्साहीत करतात. तसंच आई वडिलांची आणि बहिणीची प्रेमळ साथ माझं मनोबळ वाढवतात.

माझ्यासाठी ही तर फक्त एक सुरूवात आहे. अजून खूप काही मिळवायचे आहे. खूप काही लिहायचे आहे. आत्ता जेमतेम बहरू लागलेल्या ह्या रोपट्याचं नुसतं झाड नाही तर वटवृक्ष व्हावं हीच इच्छा आहे. तुमचा पाठिंबा आणि आशीर्वाद सदैव असाच राहो ही प्रार्थना करतो.
लोभ आहेच. तो वृद्धिंगत व्हावा, ही विनंती.


- निनाद वाघ

Thursday, 29 December 2016

शब्द माझे सांगातीशब्द माझे सांगाती


शब्दांचा खेळ हा सारा
शब्दातूनच मांडतो..
कधी शब्दासवे बोलतो
कधी शब्दासंगे भांडतो..


आनंदात जेव्हा शब्द असे
सोबत माझ्या तेही हसे..
रागवतात कधी शब्द माझे
मौन पाळून कोपऱ्यात बसे..


कधी आठवणींच्या झऱ्यामधे
शब्द माझे अलगद वाहतात..
कितीही एकटे वाटले तरीही 
शब्द माझे पाठीशी राहतात..


विरहच्या दुःखात सुद्धा 
शब्दच मला साथ देतात..
भावूक झालेल्या मनाला
शब्दच मग कवेत घेतात..


राहवत नाही मला शब्दांशिवाय
तेच माझे सखा, तेच माझे सोबती..
कवितांच्या माझ्या विश्वात
शब्द माझे सांगाती..


- निनाद वाघ
Saturday, 8 October 2016

हॉस्पिटल .. नको रे बाबा..
हॉस्पिटल .. नको रे बाबा..


नको रे बाबा त्या हॉस्पिटलचं घेऊ नाव
आजारी इसम जेथे घेई धाव..
आठवतात मग ती माणसं सगळी 
प्रत्येकाची कथा वेगळी..
प्रत्येकाची व्यथा वेगळी..


कुणाला इथे हृदयाचा आजार 
कुणी मात्र तापानं बेजार..
गुडघे दुखीनं म्हातारा त्रस्त
आजीबाई तिथं दम्यानं ग्रस्त..
एकाच ठिकाणी ही माणसं सगळी 
प्रत्येकाची कथा वेगळी..
प्रत्येकाची व्यथा वेगळी..


कुणी दोन पायावर चालत येई
अन् चार खांद्यावर विलीन होई..
कुणी नुसतं खाटेवर पडूनी
स्वास्थ्य सुधारण्याची वाट पाही..
घरची ओढ इथं प्रत्येकाला लागली
प्रत्येकाची कथा वेगळी..
प्रत्येकाची व्यथा वेगळी..


देवा सारखे इथे असतात डॉक्टर 
मदतीला धावून येणारी ती सिस्टर..
म्हणतात मिळून आपण उपचार करू
औषधांचा मारा मग होतो सुरू..
करतात येथे नुसती धावपळ सगळी 
प्रत्येकाची कथा वेगळी..
प्रत्येकाची व्यथा वेगळी..


काही जगतात काही मरतात 
काही मरणाच्या दारावर नुसतेच झुरतात..
नकोशी वाटणारी, ही दुनिया आहे आगळी
प्रत्येकाची कथा वेगळी..
प्रत्येकाची व्यथा वेगळी..- निनाद वाघ
Sunday, 25 September 2016

रजनीचं नेमकं काय झालं?सकाळपासून हाच विचार करतोय की रजनीची सुटका झाली असेल का..ती सुखरूप घरी पोहोचली असेल का?
आज सकाळी बसमध्ये बसलो होतो. दोन माणसं मागच्या सीटवर बसून बोलत होती. त्यांचं बोलणं कानावर पडत होतं. त्यातला एकजण म्हणाला की त्यानं रजनीला फोन केला होता तेव्हा ती खूप टेंशनमध्ये होती. बॕग भरत होती. तिचा जीव घुसमटत होता. घरातून पळून जायच्या तयारीत होती. फक्त संधी शोधत होती. बस मधला माणूस बहुधा तिचा भाऊ असावा. घरातून पळून ती त्याच्या घरीच येणार होती.
रजनीची घुसमट का होत असावी? तिला पळून जायची संधी मिळाली असेल का? पळून जाणं हे तिच्यासाठी योग्य होतं का? असेल तर मग ती सुखरूप घरी पोहोचली असेल का? कुठल्याच प्रश्नांची उत्तरं नाहीत आत्ता. कशाचीही कल्पना नाही.
कधीकधी कसलाही आगा-पिछा नसताना एखादी गोष्ट कानी पडते आणि मग विचार चक्र सुरू होतं.
काय झालं असेल रजनीचं हे माझ्या नजरेतनं बघा..

पाच वर्षांपूर्वी पराग मुंबईला नोकरीसाठी आला तेव्हा रजनी कॉलेजात शिकत होती. परागचा आपल्या बहिणीवर खूप जीव होता. आईवडील गेल्यानंतर परागनं नोकरी करत रजनीला सांभाळलं. वर्षभरात आपलं शिक्षण पूर्ण करून रजनीसुद्धा मुंबईला आली.
रजनी आणि पराग ह्या दोघांचं आयुष्य कधीच सरळ सोपं नव्हतं. आईवडील अचानक अपघातात गेले. पराग तेव्हा दहा वर्षांचा होता आणि रजनी जेमतेम चार वर्षांची. सगळी जबाबदारी परागच्या इवल्याशा खांद्यावर आली. दुःख बाजूला सारून त्यानं ती जबाबदारी पेलली. वयाच्या बाराव्या वर्षी त्याला नोकरी करावी लागली. शिक्षणाची आवड असून देखील आपलं शिक्षण पूर्ण करू शकला नाही. कष्टापरी कष्ट केले त्याचा देह चंदनापरी झिजला. तरीही तो खचला नाही. रडला नाही. रजनीचं शिक्षण पूर्ण केलं. तिलाही मुंबईत घेऊन आला.
रजनीनं सुध्दा भावाला खूप मदत केली. बारा वर्षाचा पराग जेव्हा नोकरी करत होता तेव्हा शाळेत जाणारी रजनी घरोघरी जाऊन धुणी-भांडी करायची. दोघांचं बालपण कष्ट करण्यात गेलं. जेव्हा त्यांच्या वयाची मुलं खेळात रमायची तेव्हा हे दोघे जगण्यासाठी झगडत होते.
आता दोघे मुंबईत सेटल झाले होते. भाड्याने एक छोटी रूम घेतली होती. बघता बघता रजनीचं लग्न ठरलं. मुलगा मुंबईचाच होता. लग्न अगदी साधेपणानं पार पडलं. एका मोठ्या जबाबदारीतून मुक्त झाल्यानं परागलाही हलकं वाटलं. आनंद तर होताच.
रजनीचा संसार सुरू झाला. सहा महिने सगळं सुरळीत सुरू होतं. रजनी खूप आनंदात होती. रजनीचा नवरा नोकरी निमित्त फिरतीवर असायचा. दिल्ली मुंबई प्रवास तर नेहमीच व्हायचा.असाच तो एकदा दिल्लीला गेला होता. तिथून मुंबईला परतताना विमानाचा अपघात झाला. सर्व प्रवासी जागीच ठार झाले.
रजनीला हा धक्का पचवणे फार कठीण होते. ती पार कोलमडून गेली होती. पुन्हा एकदा आयुष्यानं तिला एका अनवट वळणावर आणून ठेवले होते. जिथून पुढं सगळं धुसर दिसत होतं पण चालणं अनिवार्य होतं.
तिला आता सासरी जगणं फार कठीण होत होतं. रजनीची काहीच चूक नसताना तिचे सासू सासरे आपल्या मुलाच्या मृत्यूला तिलाच जबाबदार धरत होते. तिच्यातच काहीतरी दोष असणार म्हणून तर आधी स्वतःच्या आईवडीलांना गिळलं आणि आता आमच्या मुलाला, असं तिचे सासू सासरे म्हणायचे. चार चौघात सारखा तिचा अपमान करायचे. हे सगळं रजनीच्या सहनशक्तीच्या बाहेर जात होतं.
एकीकडे सासू सासऱ्यांचा जाच तर दुसरीकडे नवऱ्याच्या आठवणी. तिचा जीव घुसमटत होता. तिला हे घर सोडून जायचं होतं पण फक्त एका संधीची वाट पाहत होती. तिने तिच्या भावाला तसं कळवलं. त्यालाही तिची घुसमट समजली. तो तिच्या पाठीशी अगदी खंबीरपणे उभा राहिला. त्यानं तिला माहेरी यायला सांगितलं. माहिती नाही का पण आपल्या सासू सासऱ्यांना सांगून जायची तिच्यात हिम्मत नव्हती. तिने बॅग भरली आणि घरी कुणी नसताना तिथून निघाली ते कायमची. माहेरी आल्यावर पुन्हा एकदा स्वतःच्या पायावर उभी राहिली. नोकरी पुन्हा सुरू केली. काही काळ ती जरा खचली होती पण त्यात अडकून राहिली नाही. दुःख कुरवाळत बसली नाही. पुन्हा उभारी घेतली अन् स्वतःचं अस्तित्व निर्माण केलं. 
दुःख कमी जास्त प्रमाणात सर्वांना असतं म्हणून नशिबाला दोष देऊन किंवा खचून जाऊन प्रश्न सुटत नाही. रजनीच्या जागी दुसरं कुणी असतं तर जीव दिला असता कदाचित. नशिबाची साथ तिला कधीच नव्हती पण तरीही नशिबाला दोष देण्यापेक्षा ती त्याला सामोरी गेली आणि स्वतःचा मार्ग निवडला.-निनाद वाघ
www.shabdatmandatomi.blogspot.in
Monday, 12 September 2016

CODE मंत्र : एक अनुभवजूनमधे CODE मंत्र ह्या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग झाला तेव्हापासून ह्या नाटकाबद्दल ऐकून होतो. नाटक छान आहे किंवा सगळ्यांची कामं छान झाली आहेत वगैरे. इतकी तगडी स्टार कास्ट असल्यावर नाटक वाईट असेल अशी शंका नव्हतीच मुळी. नाटक पाहण्याची उत्कंठता मात्र दिवसेंदिवस वाढत होती आणि अखेर काल यशवंत नाट्यमंदिरात ह्या नाटकाचा प्रयोग पाहण्याची संधी मिळाली. खरंच हे नाटक म्हणजे एक विलक्षण अनुभव आहे जो शब्दात मांडणं कठीण आहे.
कर्तव्य आणि कर्तव्याचा अतिरेक ह्यातली पातळ सीमारेषा ह्यावर भाष्य करणाऱ्या ह्या नाटकाची मांडणी खरंच खूप प्रभावी आहे. नाटकाचा पडदा उघडतो ते नाटक संपेपर्यंत प्रत्येक क्षण म्हणजे कानांना आणि डोळ्यांना पर्वणीच जणू. नाटकाचा पेस सुद्धा अगदी परफेक्ट सेट केलाआहे. अजय पूरकर ह्यांनी साकारलेली प्रतापराव निंबाळकर ही व्यक्तीरेखा तर कायमच लक्षात राहील. मुक्ता बर्वे नेहमी प्रमाणे उत्कृष्ट आहेच. मुक्ता बर्वे आणि अजय पूरकर ह्यांनी सर्वार्थाने त्यांच्या भूमिकेला न्याय दिला आहे. दुसऱ्या अंकात ह्या दोघातले संभाषण संवाद तर लाजवाब. उमेश जगताप, अतुल महाजन, कौस्तुभ दिवाण, विक्रम गायकवाड सह इतर कलाकारांचं काम सुध्दा अप्रतिम झालं आहे.
स्नेहा देसाई ह्यांचं मूळ लिखाण इंग्रजी कथानकावरून प्रेरित आहे आणि विजय निकम ह्यांनी त्याचं छान रूपांतर केलं आहे. राजेश जोशी ह्याचं दिग्दर्शन, प्रसाद वालावलकरांच नेपथ्य आणि सचिन जिगर ह्यांच्या पार्श्वसंगीत ह्याने ह्या कलाकृतीला चार चांद लावले. अक्षरशः रंगभूमीवर रणभूमी उभी केली आहे ह्या मंडळी ने. नाट्यगृहातलं वातावरण संमोहित करणारं आहे.
खरंच हे नाटक पाहून आपण मंत्रमुग्ध होऊन जातो. आकर्षित होतो. पुन्हा पुन्हा पाहवंसं वाटतं. CODE मंत्रच्या संपूर्ण टीमचं कौतुक करावं तितकं थोडं. इतक्या भव्य नाटकाचा भार ह्या टीमनं अगदी लीलया पेलला आहे.
काही गोष्टी आयुशभर हृदयात घर करून राहतात. त्यातलच हे एक नाटक. तुम्ही सुध्दा हे नाटक एकदा तरी नक्की पहा आणि तो सुकर अनुभव घ्या. 
HATS OFF TEAM CODE मंत्र ..जय हिंद..


- निनाद वाघ

Friday, 29 July 2016

चारोळ्या..मनातील गोष्ट आज मनात राहून गेली..
आठवणींच्या झर्‍या मधून नकळत ती वाहून गेली..
********************************************

मनात विचार अनेक आहेत
पण शब्द काही सुचत नाही..
हातात लेखणी असून देखील
कागदावर काही उतरत नाही..
********************************************

कुणा एकाच्या सुखासाठी
दुःख आपल्याला सोसावं लागतं..
जसं माणसांच्या आनंदासाठी
ढगांनाही रडावं लागतं..
********************************************

कोसळणाऱ्या पावसाकडे
नुसतं पाहत बसावं..
झेलताना तो प्रत्येक थेंब
मनमोकळं हसावं..
********************************************

जेव्हा असते साथ कुणाची
तेव्हा पावसात सुध्दा रंगत असते..
रटाळ वाटतो हाच पाऊस
जेव्हा कुणाचीच आपल्याला संगत नसते..
********************************************

सुख- दुःख

भास होतो सुखाचा
आनंदी राहते मन..
मग आठवण होते दुःखाची
अन् विस्कटतं सारं जीवन..

सुखाच्या शोधात मग
सुरू होते माझी वारी..
पण सुख आले जेव्हा दारी..
तेव्हा कुरवाळत बसलो होतो
माझी दुःख सारी..
********************************************
दृष्टी नाही तर दृष्टिकोन बदला
म्हणजे सुंदर दिसतील सर्व दृश्य..
इतरांना नको तर स्वतःला बदला
मग बघा किती छान वाटेल आयुष्य..
********************************************
आयुष्यात सरणारा प्रत्येक क्षण
मनात घर करून राहतो..
काळांतराने त्याकडे आपण
आठवण म्हणून पाहतो..
********************************************
आपलं नशीब आपल्या हाती
दोष इतरांना देऊ नका..
आपण घडवू तसंच घडेल आयुष्य
रोष इतरांवर काढू नका..
********************************************
हे आयुष्या.. जरा जपून..
किती रे सुसाट पळशील..
सरळ मार्गी जाताना..
तू मात्र अचानक वळशील..
********************************************
शब्द ही मुके होतात
आठवणींमधे भिजताना..
आभाळाकडे पाहत
पाऊस कवेत घेताना..- निनाद वाघ

www.shabdatmandatomi.blogspot.inFriday, 8 July 2016

अंधश्रद्धा


मागच्या शनिवारची गोष्ट. आईनं दिलेल्या सामानाची यादी घेऊन मी बाजारात गेलो होतो. बाकी वस्तूंसोबत मी दुकानदाराकडे एक लिटर तेलाचा कंटेनर मागितला तर दुकानदार मला म्हणाला, “साहेब आज शनिवार आणि शनिवारी तेल विकत घेऊ नये. तुम्ही उद्या या”
मी म्हटलं त्याला की बाबा रे ह्या गोष्टी मी काही मानत नाही. तरीही त्याचं म्हणणं होतं की आज नकोच.
आता काय बोलणार ह्या प्रकाराला. त्यानं स्वतःचं नुकसान करून घेतलं पण मला तेल विकत घेऊ दिलं नाही. बरं तिथून घरी जाता जाता सलून मध्ये केस कापून जाऊया म्हटलं तर तितक्यात एक ओळखीचे गृहस्थ भेटले. माझी विचारपूस करताना त्यांच्या लक्षात आलं की मी केस कापायला निघालो आहे. मग काय..तेही सुरू झाले ना राव..शनिवारी केस कापू नये वगैरे वगैरे आणि इच्छा नसतानाही माझी सलूनकडे जाणारी पावलं घराकडे वळवावी लागली.
खरंतर ह्या सगळ्या मागे काय लॉजिक आहे हेच मला समजत नाही. शनिवारी मीठ तेल आणू नये किंवा जेवणात तीन पोळ्या वाढू नये. दारात शिंकू नये वगैरे असे अनेक गैरसमज लोकांच्या मनात घर करून आहेत. पिढ्यांपिढ्या त्या सुरू आहेत. लहानपणापासून ह्या गोष्टी आपल्या मनात ठासून भरल्या जातात आणि मनात आयुष्यभर एक भीती निर्माण होते. भीती होणाऱ्या नुकसानाची.अशी भीती की जर मी ती गोष्ट पाळली नाही तर काही संकट येऊ शकतं. काहींना तर ही अंधश्रद्धा आहे हे माहिती असून देखील उगाच रिस्क कशाला म्हणून पाळतात. हो आणि जर काही एखाद्याने नियम मोडला तर मग त्यावरचे उपाय अजून विचित्र. जसं उदाहरणार्थ जर दारात कुणी शिंकलं तर लगेच तिथे पाणी शिंपडा म्हणजे अपशकून टळेल.खरंच?
अशा लोकांना आपण जर काही समजवायला गेलो तर ते आपल्याशी वाद घालतील आणि काही विसंगत उदाहरण देऊन स्वतःच बरोबर म्हणून जाहीर करतील. त्यामुळे आपणच मूर्ख ठरतो.
आपल्याला खरंतर श्रद्धा आणि अंधश्रद्धा ह्यातील फरक समजायला हवा. देवावर विश्वास ही श्रद्धा पण देवाचे अस्तित्व सिद्ध करण्यासाठी केलेला आटापिटा म्हणजे अंधश्रद्धा. श्रद्धेनं देवाची पूजा करणे किंवा देवळात जाणे ह्यात काहीच चूक नाही. त्याने आपल्याला मानसिक बळ मिळतं. पण त्याचं रूपांतर अंधश्रद्धेत होऊ देऊ नका. जर अमूक गोष्ट केली तर आपलं काम होणार किंवा मांजर आडवी गेली तर काम होणार नाही वगैरे ह्यात काहीच तथ्य नाही आणि जरी तसं घडलं तरी तो केवळ योगायोग असतो हे लक्षात घ्यायला हवं.
अंधश्रद्धा ही समाजासाठी घातक आहे. अंधश्रद्धेतनं माणसं अघोरी कृत्य ही करतात. ज्या दिवशी ही विचारसरणी बदलेल तेव्हा ती समाजात घडणाऱ्या बदलाची नांदी असेल. भीतीवर मात करता आली पाहिजे नाहीतर हे चक्र असंच सुरू राहिल. आपलं नशीब आपल्या हातात असतं. ते आपणच घडवतो. हेच सत्य आहे.
हे लिहून जेव्हा चहा पीत खिडकीत उभा होतो तेव्हा एक माणूस बिल्डिंगमध्ये शिरताना त्याला एक मांजर आडवी जाणार होती तर तो माणूस झटकन उडी मारून मांजरीलाच आडवा गेला.


- निनाद वाघFriday, 1 July 2016

जोशी काका


रोज सायंकाळी साडेपाच वाजता मी शिवाजी पार्कच्या उद्यान गणेश मंदिरात जात असे. आजही गेलो. गणपती बाप्पांचे दर्शन घेतले अन् मंदिरा समोरच्या कट्ट्यावर जाऊन बसलो. आज जोशी काका मात्र कुठं दिसत नव्हते. तसं सहसा त्यांना कधीही उशीर व्हायचा नाही पण आज नेमका झाला.मी त्यांना जरी रोज भेटत असलो तरी आजचा दिवस मात्र खास होता आणि म्हणूनच मी त्यांच्या येण्याची वाट पाहत बसून राहिलो.
माझी जोशी काकांशी ओळख झाली ती साधारणतः पाच वर्षांपूर्वी इथंच ह्याच कट्ट्यावर.जोशी काका म्हणजे एक सामान्य दिसणारे असामान्य व्यक्तिमत्त्व. अगदी साधारण राहणीमान परंतु विचारांची श्रीमंती असणारा माणूस.सदा हसतमुख.
ओळख वाढली तशी आमच्यात मैत्री झाली.आमच्यात जवळजवळ चार दशकांचा फरक होता पण मैत्रीला वयाची मर्यादा कधीच नसते हेच खरं!
काळा सोबत आमची मैत्री अधिक घट्ट होत गेली. मी त्यांच्या कडून खूप काही शिकलो.आयुष्य हसत खेळत कसं जगावं हे त्यांनी मला शिकवलं. कितीही कठीण प्रसंग आला किंवा कसली समस्या असो, त्याला ते अगदी हसत हसत सामोरे जायचे आणि त्यावर मात करायचे. कुठल्याही गोष्टीचा ताण न घेता ही आयुष्य अगदी सुंदर आणि यशस्वीपणे जगता येतं हे त्यांनीच मला दाखवून दिलं. टेंशन घेऊन प्रश्न सुटत नाहीत तर ते अधिक गुंतले जातात अशा मताचे ते होते.
त्यांना मनं जिंकणं अगदी सहज जमायचे.म्हणजे समोरच्या व्यक्तीला न दुखावता ही आपलं म्हणणं त्या पर्यंत सहज पोहोचवायचे. आणि म्हणूनच की काय त्यांचे शत्रू कोणीच नव्हते. जे होते ते फक्त मित्र.
मला ते प्रेमाने बंड्या म्हणून हाक मारायचे.आम्ही रोज कट्ट्यावर बसून गप्पा मारायचो.
आज फ्रेंडशिप डे होता म्हणजेच मैत्री दिन. त्यांच्या साठी मी एक खास भेटवस्तु आणली होती. आपल्याला आयुष्यात मित्र अनेक भेटतात पण खरा मित्र सापडायला भाग्य लागतं. मला ते भाग्य लाभलं म्हणूनच तर जोशी काका सारखे मित्र भेटले. मला माझ्या सुख दुःखात साथ देणारे. योग्य मार्ग दाखवणारे सोबती. खरंच ते एक गोड नातं होतं.एक गोड मैत्री.
त्यांची वाट पाहताना तास कसा उलटला समजलंच नाही.पण त्यांचा मात्र अजूनही काहीच पत्ता नव्हता. आज बहुधा त्यांना न भेटता जावं लागणार होतं.फार उशीर झाला होता. मी घरी जायला निघालो. चार पावलं चाललो इतक्यात काही लोकांची गर्दी दिसली. कुणाची तरी अंतयात्रा निघाली होती. अशा प्रसंगी माझं मन नेहमी हळवं होतं पण माणूस जन्माला येतो तो एक ना एक दिवस मरण पावणार हे निश्चित असतं म्हणूनच त्याला निरोप डोळ्यात अश्रू आणून नव्हे तर हसत हसत द्यावा हेही मला जोशी काकांनीच शिकवलं.
मी हळुहळु चालत राहिलो.चालता चालता सहज नजर पडली ती घेऊन जात असलेल्या प्रेतावर. पाहिलं आणि पायाखालची जमीन सरखली.मृत पावलेली व्यक्ती जोशी काका होती.माझ्या काळजाचा ठोका चुकला.काहीच सुचेना.कट्ट्यावर वाट पाहताना त्यांनी भेटावं अशी इच्छा होती पण ती भेट अखेरची असेल हे माहिती नव्हतं.कायम हसतमुख असणारे जोशी काका आपल्या मृत्यू शैय्येवर सुद्धा हसत झोपले होते. बहुधा मृत्यूला ही ते हसता हसता सामोरे गेले असावेत.
मनात भावना दाटल्या होत्या. देवाने इतकं क्रूर तरी का वागावं? आभाळाला ही भरून आलं अन् तेही कोसळू लागलं.मी आणलेली भेटवस्तु त्यांच्या पायाशी ठेवली आणि वळलो तेव्हा मागून आवाज आला, “थँक्स बंड्या” अन् माझी पावलं नकळत त्यांच्या अंतयात्रेत सामील झाली.- निनाद वाघFriday, 24 June 2016

सिंप्ली डेलीशियस


मी लहानपणापासून खाण्याचा खूपच शौकीन आहे. जितकं मला आईच्या हातचं जेवण आवडतं तितकंच मला निरनिराळ्या हॉटेलात, फूड जॉईंट्स मधे जाऊन खायला तसेच नवनवीन पदार्थ टेस्ट करायला आवडतात. कॉलेजात असताना सुद्धा मी वर्गात जितका नसायचो त्याहून जास्त कँटीन मधे असायचो. आता विचार करा अशी आवड असताना जर मित्राचंच हॉटेल असेल तर मग अजून काय हवं?
सत्यजित धारगळकर हा माझा अगदी जुना आणि खास मित्र. आमची कॉलेजात जायच्या अगोदर पासून ओळख असली तरी कॉलेजात गेल्यानंतर आमची खऱ्या अर्थाने घट्ट मैत्री झाली जी आज पर्यंत टिकून आहे. कधीही काही मदत लागली तर हक्कानं मी त्याच्या घरी जातो. त्याचे आई बाबा सुध्दा मला अगदी घरातल्या सारखंच वागवतात. आमचं काही रोज बोलणं किंवा भेट होत नाही पण एकमेकांच्या मदतीला मात्र आम्ही नेहमी सज्ज असतो.
धारगळकर कुटुंबाचा बेकरी व हॉटेल व्यवसाय आहे. सत्यजित सुध्दा त्यात अगदी आवडीने आणि नेटाने लक्ष घालतो. प्रसाद बेकरीची प्रॉडक्ट्स तर गेली अनेक वर्षे लोकं आवडीने खात आहेत. माहीम दादर भागात क्वचितच लोकं असतील ज्यांना प्रसाद बेकरी माहीत नसेल. त्यांची टोस्ट व खारी बिस्किटं खावी तितकी कमी. फारच अफलातून असतात.
तसंच सिंप्ली डेलीशियस (Simply Delicious) हे हॉटेल. उडपी पंजाबी तसंच चायनीज जेवण इथं मिळतं. चवदार चविष्ट असं हे जेवण असतं. इथे दुपारी व संध्याकाळी प्रचंड प्रमाणात गर्दी असते. मी सुद्धा अनेकदा इथंच जेवतो. निमित्त वेगवेगळी असली तरी ठिकाण हेच. इथली चीझ पाव भाजी तर माझी ऑल टाईम फेवरिट आहे. घरी पार्सल तर इतक्या वेळा मागवतो इथून की तिथली माणसं आता मला नुसत्या आवाजानं ओळखतात.
माहीमच्या बॉम्बे स्कॉटिश शाळेच्या बाजूला ही बेकरी आणि हॉटेल आहे. माझ्या आवडीचं ठिकाण.
चला मी आता जरा पेट पूजा करून घेतो तो पर्यंत तुम्ही सुद्धा चवीनं खा आणि आनंदी रहा.- निनाद वाघFriday, 17 June 2016

बंधन


जर एखाद्या पक्ष्याचे दोन्हीही पाय दोरखंडानं झाडाला बांधले आणि मग त्या पक्ष्याला गगनात भरारी घ्यायला सांगितले तर त्या पक्ष्याला ते शक्य होईल का?
बरं मग भरारी घेता येत नाही ह्यात चूक कोणाची? पाय बांधले त्या व्यक्तीची की त्या पक्ष्याची?
ह्यावर नक्की विचार करा कारण माणसांच्या आयुष्यात ही अनेकदा असंच घडतं की.
माणूस हा अनेकदा नात्यांच्या रूढी परंपरेच्या समाजातील प्रतिष्ठेच्या दोरखंडाने असा काही बांधला गेलेला असतो की स्वतःचं ध्येय गाठणं अन् महत्त्वकांक्षा पूर्ण करणं त्याला कठीण होऊन बसतं. तेव्हा दोरखंड तुटल्या वाचून पर्याय नसतो. पण ते देखील त्याला सहज शक्य नसतं कारण तोवर तो पूर्णतः नात्यांच्या बंधनात अडकून गेलेला असतो आणि म्हणूनच तो आपल्या ध्येयाच्या विरूध्द दिशेनं प्रवास सुरू करतो. इतरांना आनंदी ठेवताना स्वतः दुःख सहन करतो. त्रागा करतो. मग पुन्हा लोकं विचारात की इतकं सगळं छान असून देखील कायम दुःखी त्रासलेला का असतोस? तेव्हा त्याच्याकडे उत्तर नसतं आणि हे चक्र असंच सुरू राहतं.
बंधन तोडा. ध्येय गाठा. स्वप्न पूर्ण करा.


बंधन


कधीकधी मलाही वाटतं 
मनमोकळं वागावं..
तोडून सारी बंधनं
मनसोक्त जगावं..

पण बंधनं सारी मीच ठरवली
ती तोडू तरी कशी?
मर्यादा माझी मीच ठरवली
ती ओलांडू तरी कशी?

हेच कारण असेल कदाचित 
माझ्या अलिप्त राहण्याचं..
सुखात असून सुद्धा 
कायम दुरमुखलेला दिसण्याचं..

- निनाद वाघ
Friday, 10 June 2016

कातरवेळ


संध्याकाळी थकून घरी परत येत होतो. दिवसभराचा थकवा झटकून टाकायला समुद्र किनारी जाऊन बसलो. तिथे सुचलेले शब्द..

कातरवेळ

गडद केशरी आभाळ
अथांग सागर पसरलेला
किनाऱ्यावर येती लाटा
अन् सूर्य क्षितिजावर बसलेला

पाहताना हे अद्भुत दृश्य
वाटते आयुष्य व्हावे स्तब्ध
नेत्र ही पाणावतात
मन होते निशब्द

बघता बघता निसर्गाचा
सुरू होतो एक सुंदर खेळ
पाहता पाहता डोळ्यांसमोर 
सरते ती कातरवेळ..


- निनाद वाघ
Friday, 3 June 2016

देवा तुला शोधू कुठं?मागे देऊळ नावाचा एक सिनेमा आला होता. त्यात एक गाणं होतं की “देवा तुला शोधू कुठं” आठवतं?
खरं तर हा प्रश्न सध्या मला पडला आहे. देव आहे की नाही हा मुळात इथला वाद नाहीच कारण देव अस्तित्वात आहे हे मानणाऱ्यांपैकी मी एक. फक्त तो कुठे आणि कोणत्या स्वरूपात आहे हा काय तो मुद्दा.
अनेकांच्या सांगण्यावरून मी देवाला शोधण्यासाठी अनेक मंदिरं पालथी घातली. अनेक देऊळांना भेट दिली. पण त्याचे काही दर्शन झाले नाही. अनेक धार्मिक स्थळं फिरून आलो. तासंतास रांगा लावल्या तसंच अनेक पूजा अर्चा केल्या पण त्याच्याशी काही भेट होईना. मनात विचार आला की मी इतकं सगळं करून सुद्धा मला देव का नाही सापडत?
हा प्रश्न मला कायम सतावत होता. एके दिवशी रेडिओ लावला तेव्हा ग. दि. माडगूळकरांचे शब्द कानावर पडले:

नसे राऊळी वा नसे मंदिरी
जेथे राबती हात तेथे हरी..

हे शब्द ऐकताच माझ्या लक्षात आलं की मला पडलेल्या प्रश्नाचं उत्तर सापडलं. माझ्या हेही ध्यानात आलं की देवाला शोधायचा माझा मार्गच चुकला होता.
नंतर बाबा आमटे, प्रकाश आमटे, मदर टेरेसा ह्या सारख्या अनेक महान व्यक्तींच्या कार्या बद्दल वाचले आणि लक्षात आले की ज्या देवाला मी देऊळात शोधत होतो तो तर इथं ह्यांच्या ह्दयात आहे. प्रामाणिकपणे कष्ट करणाऱ्या त्या प्रत्येक माणसात देव आहे.
खरं सांगायचं तर देव म्हणजे काय तर ती एक शक्ती आहे जी आपल्याला बळ देते. आपला आत्मविश्वास वाढवते. हरलेल्याला जिंकण्याची नवी उमेद देते. नवी ऊर्जा देत आयुष्य जगायला शिकवते. अशी ही अद्भुत शक्ती म्हणजे देव. ही शक्ती अफाट आहे. त्यात परिवर्तनाची ताकद आहे. पण आपण ह्या शक्तीला अन् त्या ऊर्जेला दगडांच्या मूर्ती मध्ये दांबून ठेवतो आणि तिथेच शोधत राहतो. अशाने तो काही सापडायचा नाही.
देवाला शोधताय तर त्याला माणसांमध्ये शोधा. तुमच्या मध्ये माझ्या मध्ये शोधा. माणसाच्या श्रमात शोधा. समोरच्या व्यक्तीच्या वाणीत शोधा. गरिबांमध्ये शोधा. श्रीमंतांमध्ये शोधा. निसर्गात शोधा. स्वतः मध्ये शोधा. तो नक्की सापडेल कारण देव सर्वत्र आहे.- निनाद वाघFriday, 27 May 2016

भावपूर्ण श्रद्धांजलीगेले दोन महिने हॉस्पिटलमध्ये मरणाच्या दारावर झुरत असलेल्या माझ्या आजोबांचा ८३ वर्षांचा जीवन प्रवास काल अखेर संपला. ते अनंतात विलीन झाले. त्यांची ही साथ सुटली ह्याचं अपार दुःख मनात होतं पण त्याहूनही त्यांची वेदनेतून सुटका झाली ह्याचं काय ते समाधान. ह्या दोन महिन्यात त्यांना खूपच सोसावं लागलं. त्यांना काही सहज मरण नशिबी नव्हतं.
माझं आणि माझ्या आजोबांचं असं एक छान सुंदर नातं होतं. आमचं असं एक वेगळं विश्व होतं. ह्या विश्वात होते ते दोन पक्के मित्र. आमचं हे मैत्रीचं नातं काळा सोबत अधिक बहरत गेलं. अधिक घट्ट होत गेलं. आम्हा दोघांना क्रिकेटचं फार वेड. प्रत्येक सामना आम्ही तहान भूक हरपून फॉलो करायचो. त्या नंतर आमचं चर्चा सत्र चालायचं तासंतास. कोण कसं खेळलं ह्यावर. ते कॉलेजात क्रिकेट टीम मधे होते. तेव्हाचे रंगतदार किस्से त्यांच्या मुखातनं ऐकायला तर फार मज्जा यायची.
त्यांचं बरंच आयुष्य गिरगावच्या चाळीत गेलं. त्यांचं बालपण शाळा सर्व गिरगावात. त्या मुळं माहिमला राहायला लागले तरीही त्या गिरगावच्या आठवणींमधे ते रमायचे. आम्हाला सांगायचे. मग आम्ही सुध्दा अगदी तिथेच आहोत असं वाटायचं. त्यांच्या नजरेतनं मी चाळीतलं जीवन कसं असेल ह्याचा अनुभव अनेकदा घेतला.
आमच्या विश्वात आता मात्र सर्वत्र अंधार पसरला आहे. कधीही भरून न निघणारी पोकळी निर्माण झाली आहे.आता आठवणींच्या हिंडोळ्यावर झुलताना आठवणार ते सोबत घालवलेले ते मौल्यवान क्षण, त्यांच्या सोबत कायम असणारा त्यांचा रेडिओ, त्यांची आवडती बिर्याणी आणि असं बरंच काही. ते आम्हाला जरी सोडून गेले असले तरी त्यांचं माझ्या हृदयातलं स्थान कधीच कमी होणार नाही किंबहुना ते अधिक भक्कम होईल.


आज मला पाडगावकरांच्या कवितेतल्या ओळी आठवतात:

आजोबांच्या खोलीत आता धुकं धुकं धुकं..
आजोबांचं जग आता मुकं मुकं मुकं..- निनाद वाघFriday, 20 May 2016

गोष्ट एका रात्रीची


रात्रीची वेळ. साधारणतः दहा वाजले होते. जेवणानंतर असाच एक फेरफटका मारायला म्हणून मी घरून निघालो आणि चालत चालत पोहोचलो ते शिवाजी पार्क जवळच्या चौपाटीवर. तिथल्या खडकावर जाऊन बसलो. एरवी गजबजलेली मुंबई रात्री मात्र अगदी शांत आणि सुरेख वाटत होती. आसपास फारशी माणसं नव्हती. मागील रस्त्यावर गाड्यांची ये जा ही नव्हती. होती ती फक्त निरव शांतता आणि सोबतीला आकाशात पसरलेलं छान शुभ्र चांदणं. किनाऱ्यावर येणाऱ्या प्रत्येक लाटेसह होणाऱ्या पाण्याच्या स्पर्शानं मन प्रफुल्लीत होत होतं. त्या रात्रीची जादू काही औरच होती.
अशा ह्या वातावरणात मीही हरवून गेलो. अशा बेभान अवस्थेत अचानक कानावर काही मधुर स्वर पडले. दूरवर कुठंतरी कुणीतरी आपल्या सुमधुर स्वरात गात असावं. इतक्या रात्री कोण बरं गात असेल ह्याचं कुतूहल वाटत होतं. त्या आवाजाच्या दिशेनं माझी पावलं वळली. जसा जसा पुढं जात होतो तशी मनाची उत्सुकता वाढत होती. शेवटी एका ठिकाणी पोहोचलो. समोरच्या एका खडकावर एक म्हातारा इसम दिसला. एखाद्या शास्त्रीय गायकाला शोभेल असाच काहीसा पोशाख. त्यांचा आवाज, तो स्वर मंत्रमुग्ध करणारा होता. अशा चांदण्या रात्री समुद्र किनारी असं गाणं म्हणजे कानांना खरंच पर्वणी. अहाहा!
मी अगदी तल्लीन होऊन त्यांचं गाणं ऐकत होतो. ते ही अगदी उत्साहाने गात होते. गाता गाता त्यांची नजर माझ्यावर पडली तसे ते थांबले. 
मी म्हणालो, “पंडितजी गाणं थांबवू नका. गात रहा. तुमच्या आवाजात जादू आहे. ह्या मैफीलीनं माझे कान तृप्त झाले.”
मग पुढचा तास दीड तास त्यांचं गाणं अगदी मन भरून ऐकत होतो. त्या नंतर आमच्या गप्पा रंगल्या. ते सांगत होते अन् मी ऐकत होतो. त्यांनी त्यांच्या काळातले गाण्याच्या कार्यक्रमातले किंवा रेकॉर्डिंगचे गमतीदार किस्से सांगितले. गायक म्हणून केलेला प्रवास त्यातल्या चांगल्या वाईट गोष्टी त्याही सांगितल्या. मलाही गमंत वाटत होती आणि त्यांच्या जीवन प्रवासाचा अभिमान सुद्धा.
“तुम्ही रोज येता का इथे? मला आवडेल तुमचं गाणं रोज ऐकायला.”
ते नुसतेच हसले आणि तिथून निघाले. मला जरा आश्चर्य वाटलं पण मग मी ही तिथून निघालो.
घड्याळ पाहिलं तर पहाटेचे पाच वाजले होते. सूर्योदयाची चाहूल लागली होती. हळूहळू घराकडे जाताना नाक्यावर चहाची टपरी दिसली. तोही नुकताच धंदा सुरू करत होता. चहा घेण्यासाठी म्हणून थांबलो. तितक्यात तिथे पेपरवाला ही दिसला. चहा सोबत वाचायला म्हणून पेपर घेतला. मनात अजूनही पंडितजींचा आवाज घुमत होता. ही रात्र अद्भुत होती. कायम स्मरणात राहणारी. 
चहाचा घोट घेत मी पेपर चाळत होतो. इतक्यात मधल्या एका पानावर पंडितजींचा फोटो दिसला. आत्ता भेटलेल्या माणसाचा फोटो पेपर मधे पाहून मी आनंदानं वाचायला गेलो तर फोटो खाली लिहिलं होतं:
पंडित रामशंकर ह्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
त्यांची आज पाचवी पुण्यतिथि होती.- निनाद वाघ