Sunday 31 May 2020

भाग ४: एक गुपीत आयुष्याचं



तिचा शोध घ्यायला मी अनेक प्रयत्न केले. किंबहुना अजूनही करतोय. पण तिची भेट काही झाली नाही. बघता बघता ५ वर्ष सरली. कॉलेजचं शेवटचं वर्ष होतं. आयुष्य बदललं होतं. विचारांमधे आता मॕच्यूरिटी आली होती. करियरवर फोकस करायची वेळ होती. कविता करणं एकीकडे सुरूच होतं पण छंद म्हणून. त्यात करियर करावं असा काही विचार नव्हता. आयुष्याच्या ह्या टप्प्यावर प्रत्येक जण गोंधळेलाच असतो. माझं काही वेगळं नव्हतं. मी एका फर्ममधे इंटर्नशिप सुरू केली पण का कोण जाणे तिथे मन रमत नव्हतं. शरीर जरी ऑफीसमधे असलं तरी मन तिथे नसायचं.
हे सगळं एकीकडे सुरू असताना दुसरीकडे इतक्या वर्षांनी देखील त्या मुलीचा विचार अगदी स्पष्टपणे डोक्यात रेंगाळत होता. ती ओढ तशीच होती. ती आस तितकीच होती. एकीकडे स्वप्नांना भरारी देण्याचा प्रयत्न तर दुसरीकडे तिला शोधायची धडपड. 
आयुष्य असंच सुरू होतं आणि एकेदिवशी पुन्हा दाराची बेल वाजली. मी दार उघडला तर दारात कुणी नव्हतं पण एक पत्र मात्र ठेवलं होतं, अगदी तसंच जसं काही वर्षांपूर्वी झालं होतं.
मी लगेचच पत्र वाचायला घेतलं. 

"हाय..कसा आहेस? मला माहित आहे की तुला प्रश्न पडला असेल ना की मी कोण आहे? माझं नाव काय? माझ्या बद्दल असंख्य प्रश्न मनात असतील..पण कधीकधी काही प्रश्नांची उत्तरं न शोधलेली बरी..आपली भेट पुन्हा होईल की नाही माहित नाही पण माझ्या आयुष्यात तू नेहमीच स्पेशल असशील. हवंतर मला तुझी पहिली फॕन समझ..आणि तुझ्या ह्या पहिल्या फॕन साठी एखादी कविता सादर कर की.."

पत्र वाचलं आणि मन भरून आलं. आपलं कुणीतरी कौतुक करतंय..आपल्या कविता आवडतात. एका व्यक्तीसाठी का होईना पण आयुष्यात मात्र मला काय करायचं आहे ते समजलं होतं. जे सुचलं ते लिहून काढलं. ही कविता तिच्या पर्यंत नक्की पोहोचेल ह्याची खात्री होती.. 


एक गुपीत आयुष्यचं..


समोर रस्ते चार होते
मार्ग कुठला निवडू कळेना.. 
निवडला एक मार्ग शेवटी
पण पावलं तिथे वळेना.. 


निवडताना तो रस्ता
सल्ले घेतले इतरांचे.. 
ऐकले नाही तेव्हा
आतून येणाऱ्या स्वरांचे.. 


प्रवास खडतर वाटू लागला
कायम संकटानी ग्रासलेला.. 
चहू बाजूने अंधार पसरला
कायम दुःखाने त्रासलेला.. 


एके दिवशी मग मी
एक दृढ निश्चय केला.. 
चार पावलं मागे वळत
प्रवास नव्यानं सुरू केला.. 


आता प्रवास सुकर झाला
जीवनात माझ्या आनंद आला.. 
दुःख सारे विरुन गेले
आयुष्य नव्याने उदयास आले.. 


आनंदी आयुष्याचं तुम्हाला गुपीत
सांगतो नीट ऐका जरा.. 
सल्ला देणारे भेटतील खूप
पण मनाला आवडेल तेच करा.. 


- निनाद वाघ ©




to be continued..

Sunday 24 May 2020

भाग ३: शोध सुरूच..!


दार उघडलं तर दारात कुणीच नव्हतं. दार लावणार इतक्यात माझं लक्ष गेलं ते कुणीतरी ठेवून गेलेल्या एका लिफाफ्यावर. मी ते उचललं आणि दार लावून घेतला.
लिफाफ्याच्या आत एक कार्ड होतं. त्या कार्डवर एक मेसेज होता.

"कविता खूप छान करतोस. सादर सुद्धा छान करतोस. अशाच छान कविता करत जा. पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा"

त्यात काही नाव वगैरे काहीच नव्हतं. असं निनावी पत्र कुणी पाठवलं असेल असा प्रश्न मनात आला खरा पण लगेच जाणवलं की असं पत्र पाठवणारी मुलगी तीच असू शकते.

आता मात्र मला तिला जाणून घ्यायचं होतं. तिला समजून घ्यायचं होतं. मी तिला एकदाच भेटलो. सुरवातीला फक्त जी एक सहज भेटलेली व्यक्ती वाटत होती ती आता मात्र मनाला आकर्षित करू लागली होती. तिचा तो चेहरा डोळ्यांसमोर होताच. एखादा ७० mm सिनेमा पाहावा तसा तो भेटीचा प्रसंग डोळ्यांसमोर येत होता. तिला भेटण्याची आणि ती कोण आहे हे जाणून घ्यायची उत्कंठता शिगेला पोहोचली होती.

मी शोध घ्यायला सुरूवात केली. स्पर्धेत भाग घेतलेल्या काहींना विचारलं पण कोणीही तिला ओळखत नव्हतं. माझ्याकडे सुद्धा एकदम लिमिटेड माहिती होती. मी सोसायटीच्या वॉचमॕनला सुद्धा विचारलं की कुणी अनोळखी व्यक्ती आली होती का म्हणून पण त्यानंसुद्धा कुणाला बघितल्याचं त्याला आठवत नव्हतं.
मी हताश होऊन पुन्हा घरी आलो आणि तसाच झोपी गेलो.


"काय रे..कसा आहेस?

"अगं ..तुला मी इतकं शोधतोय आणि तू मात्र इथे शांत बसली आहेस व्हय.."

"मला शोधतोयस..का रे..माझा शोध का म्हणून घेतोयस? काही काम होतं का?"

"नाही काही काम नव्हतं.."

"मग?"

"असंच शोधत होतो.."

"असंच कुणी शोधतं का कुणाला? काहीतरी कारण असणार"

" कारण... कारण खरंतर मला सुद्धा नाही माहित..पण ते जाऊदे..तू आधी तुझं नाव सांग.."
ती हसली..

"माझं नाव.."

"हं..बोल.."

"माझं नाव.."

ती नाव सांगणारच होती अन् मला खाडकन जाग आली..स्वप्न होतं ते...मी बेडवर बसून राहिलो.. सिलिंगकडे बघत..

कसं सांगू तुम्हाला
अंतरी माझ्या काय चाललंय ?
घुसमटलेले विचार
अन् मन खवळलंय..



to be continued..



- निनाद वाघ ©

Sunday 17 May 2020

भाग २: "ती कोण होती?"


मी प्रश्नार्थक नजरेनं तिच्याकडे पाहत राहिलो पण ती मात्र निघून गेली. ती कोण असेल ह्या विचाराच्या तंद्रीत मी दाराकडे नजर लावून होतो. आपल्या अवतीभवती काय घडतंय ह्याचं ही मला भान नव्हतं. कार्यक्रम संपला होता. लोकं निघायला सुरूवात झाली होती. मी मात्र तिथेच उभा होतो. त्याच तंद्रीत, त्याच प्रश्नार्थक नजरेनं पाहत.

"चला रूम लॉक करायची आहे. प्लीज बाहेर जाऊन थांबा" असं म्हणत कुणीतरी माझ्या पाठीवर हात ठेवल्याचं मला जाणवलं आणि मी भानावर आलो.

"सॉरी..सॉरी.."

मी तिथून तर निघालो पण मनात मात्र ते विचार घोळत होते. सगळं आश्चर्यचकित करणारं होतं. सारखा एकच प्रश्न,"कोण असेल ती?"

आता दुपार उलटली होती. मी चालत घरी जात होतो पण माझी नजर मात्र सारखी तिलाच शोधत होती की कुठेतरी अकस्मात ती दिसेल ह्या एका आशेवर. दुर्दैवाने तसं काहीही घडलं नाही.

मी हताशपणे घरी आलो. दिवसभरात घडलेल्या घडामोडींमुळे थोडा थकवा जाणवत होता. इतका की सोफ्यावर बसल्या बसल्या कधी डोळा लागला हेच कळलं नाही. जेव्हा जाग आली तेव्हा बघतो तर रात्रीचे वाजले होते.

किचनमधे जाऊन मी स्वतःसाठी गरम कॉफी बनवली आणि कॉफीचा मग घेऊन खिडकीत जाऊन बसलो. खिडकीतून सगळं जग गजबजलेलं पण तरीही शांत सुंदर दिसत होतं. मनात आलं म्हणून यू ट्युबवर किशोर कुमारची छान रोमँटिक गाणी लावली.

तसं खिडकीत बसून कॉफी प्यायची ही काही माझी पहिलीच वेळ नव्हती. अनेकदा असं बसलोय पण आज सगळंच वेगळं वाटत होतं. छान वाटत होतं.

ढगांमागे लपलेला तो चंद्र, नभात पसरलेलं ते टिपूर चांदणं, हातात गरम कॉफी आणि बॕकग्राऊंडला किशोर दा.. अहाहा..

मी त्या वातावरणात रमलो होतो. अजूनही तिचा तो सुंदर चेहरा डोळ्यांसमोर होताच. तिचं ते गोड हसणं, बोलण्यातली ती आर्तता, तो सहज संवाद, त्यातला आपलेपणा..कोण म्हणेल की ती पहिली भेट होती..

असं अचानक कुणीतरी यावं,
नजरेनं खूप काही बोलून जावं,
आपल्या त्या गोड शब्दांनी
अगदी हृदयाला साद घालावी अन्
मनात स्थान निर्माण करावं
पहिल्या भेटीत खरंच असं घडू शकतं का?

"ती कोण असेल?" हा प्रश्न सारखा मनाला अस्वस्थ करत होता. उत्तर काही सापडत नव्हतं. सगळंच रहस्यमय वाटत होतं. होतं ते फक्त एक मोठं प्रश्नचिन्ह. काय करावं कळत नव्हतं. असं शांत बसून चालणार नव्हतं. शेवटी मी स्वतःशीच एक निश्चय केला. त्या अनामिक अस्तित्वाचा शोध घ्यायचा ठरवलं.

निश्चय केला खरा मात्र शोधणार कसं ते समजत नव्हतं आणि आयुष्यात जेव्हा फक्त प्रश्न उरतात तेव्हा आपोआप आपले हात त्या परमात्म्यापुढे जोडले जातात. मी सुद्धा तेच केलं.

"देवा..आता तूच काय तो मार्ग दाखव.."

देवाला साकडं घातलं आणि तितक्यात दाराची बेल वाजली. मी पटकन दार उघडला अन् बघतो तर...



to be continued..

- निनाद वाघ ©