Sunday 10 May 2020

भाग १: पहिली भेट



सकाळी चा अलार्म वाजला आणि मी नेहमी सारखाच दचकून उठलो. आज पुन्हा उठायला उशीर झाला होता. तशी झोप सुद्धा मला उशिराच लागली होती म्हणा कारण सकाळी काय होणार ह्याचं टेंशन जास्त होतं. मनात धाकधूक होती. दिवस महत्त्वाचा होता.

मी पटापट सगळं आवरायला घेतलं आणि बूट घालतानाच चहाचे दोन घोट अक्षरशः घशात ओतले अन् घाईघाईनं कॉलेजला जायला निघालो. खरंतर एरवी इतकी घाई केलीच नसती पण आजचा दिवस फार महत्त्वाचा होता. त्यासाठीच ही धावपळ.

काही दिवसांपूर्वी मी एका स्वरचित कविता वाचन स्पर्धेसाठी नाव दिलं होतं. अनेक स्पर्धक ह्या स्पर्धेत सहभागी होणार होते त्यातून ५० जणांना मुख्य स्पर्धेसाठी निवडलं गेलं होतं. त्यात माझं सिलेक्शन झालं होतं. अशा भव्य स्पर्धेत भाग घेण्याची माझी ही पहिलीच वेळ होती. तो स्पर्धेचा दिवस आज होता आणि त्यासाठीच काहीही करून मला वाजेपर्यंत कॉलेजला पोहोचणं गरजेचं होतं.

मी कसाबसा धावत पळत कॉलेजला पोहोचलो. घामाच्या नुसत्या धारा वाहत होत्या. ओलाचिंब चेहरा घेऊन त्याच अवतारात मी रूम नंबर A मधे शिरलो. सुदैवाने स्पर्धेला सुरूवात झाली नव्हती. तिथे माझ्या सारखेच अनेक जण बसलेले दिसले. काही कॉन्फिडंट चेहरे तर काही माझ्या सारखे बिथरलेले. मी एका कोपऱ्यात बसलो आणि माझी कविता मनातल्या मनात वाचू लागलो.

मी स्वतःमधे इतका गुंतलो होतो की माझ्या शेजारच्या खुर्चीवर कुणी येऊन बसलं आहे हे सुद्धा माझ्या ध्यानात नाही आलं.

"मी इथे बसले तर चालेल ना?" तिनेच मला प्रश्न केला. तेव्हा अचानक माझं लक्ष तिच्याकडे गेलं. एक गोड सुंदर मुलगी माझ्या शेजारी बसली होती.

"हो..चालेल की"

ती मुलगी कोण होती माहिती नाही पण पाहता क्षणी ती मला आपलीशी वाटली. तिच्याकडे पाहिलं आणि अचानक मनावरचा ताण थोडा कमी झाला.

"हाय.." तिनेच संवाद सुरू केला.

"हाय..."

"काय टेंशन आलंय का?"

"खरं सांगायचं तर..हो..थोडं आलंय"

"तुझ्या चेहऱ्यावर ते स्पष्ट दिसतंय. उगाच टेंशन नको घेत जाऊस. तू छान सादर करशील. आय एम शुयर"

मी तिच्याकडे पाहतच राहिलो. एक अनोळखी मुलगी आपल्याशी इतक्या आपुलकीनं वागतेय हे पाहून मला थोडं आश्चर्यच वाटलं. जिला हे सुद्धा माहिती नाही की मी काय सादर करणार आहे, ती माझ्या बाबत इतकी कॉन्फिडंट कशी असू शकते? असो..पण मला बरं वाटलं. थोडा हुरूप आला.

एव्हाना स्पर्धेला सुरूवात झाली होती. अनेक छान कविता सादर होत होत्या. माझं नाव अनाऊंस् झालं आणि माझी धडधड वाढली. मी स्टेजवर गेलो आणि एवढ्या लोकांना पाहून ब्लँक झालो. मला काहीच सुचेना. माझा कॉन्फिडंस अगदी झिरो झाला होता. मी कशीबशी अडखळत सुरूवात केली. तेव्हा अचानक माझं लक्ष त्या मुलीकडे गेलं. मी घाबरलो आहे हे कदाचित तिच्याही लक्षात आलं असावं. ती माझ्याकडे पाहून अगदी गोड हसली. तिने तिच्या एका नजरेत मला धीर दिला. तिच्या डोळ्यांत पाहिलं आणि माझा आत्मविश्वास एकदम बळावला. नव्या जोमाने मी माझी कविता सादर करायला सुरूवात केली..

बोलावंसं वाटत होतं
सांगावंसं वाटत होतं
का कोण जाणे त्या रात्री..
भेटावंसं वाटत होतं..

अंधार दाटला होता तेव्हा
मनात काळोख पसरला होता..
अंधुक सारं जग होतं
मन अस्वस्थ वाटत होतं
का कोण जाणे त्या रात्री..
भेटावंसं वाटत होतं..

सरल्या क्षणांच्या आठवणींना
भरल्या डोळ्यांनी साक्ष दिली
गर्दीत त्या माणसांच्या
एकटंसं वाटत होतं
का कोण जाणे त्या रात्री..
भेटावंसं वाटत होतं..

ओळखीचा तो रस्ता होता
अनोळखी ते वळण होतं
भेट होऊदे आता तरी
देवाकडे एकच मागणं होतं..
का कोण जाणे त्या रात्री..
भेटावंसं वाटत होतं..

ऐकलं देवानं तेव्हा माझं
भेट तुझी स्वप्नात झाली..
उदय झाला सूर्याचा
अन् प्रसन्न एक पहाट आली..

टाळ्यांचा कडकडाट झाला. परिक्षकांना आणि इतर उपस्थितांना माझी कविता आवडली. सर्वांनी कौतुक केलं. माझा आनंद गगनात मावेना. मी स्टेजवरून खाली उतरलो आणि धावत आधी त्या मुलीकडे गेलो. ती तिथेच बसली होती. त्याच जागेवर.

"थँक्स..खरंच थँक्स..खरंतर मी तुला ओळखत सुद्धा नाही पण तरीसुद्धा तू धीर दिलास म्हणून इतक्या आत्मविश्वासाने आज मी कविता सादर करू शकलो. नाहीतर आज माझी नक्कीच फजिती झाली असती. तू वाचवलं मला. त्यासाठी मनापासून थँक्स."

"अरे..अरे..बस..एवढं फॉर्मल व्हायची गरज नाही. इट्स् ओके."

"फॉर्मल नाही पण मनापासून आभार मानतोय. ही स्पर्धा माझ्यासाठी महत्त्वाची होती. पहिल्यांदा मी एवढं धाडस केलं होतं."

"कविता छान होती. आवडली मला"

"थँक्यू .. मी तुझ्याशी बोलतोय खरं पण अजून मला तुझं नाव सुद्धा माहिती नाहीये. नाव काय तुझं बाय वे?
ती पुन्हा गोड हसली आणि म्हणाली "नावात काय आहे?
व्यक्ती महत्त्वाची. नाही का?"

मी काही बोलणार त्या आधीच ती म्हणाली, "चल निघते मी. भेटू पुन्हा कधीतरी. बाय"

"पण....."

नाव सांगताच ती तिथून निघाली आणि मी नुसताच पाहत होतो तिच्याकडे...


to be continued..


- निनाद वाघ ©

14 comments:

माधुरी said...

छान सुरुवात

Unknown said...

मस्त सुरवात तू तर उत्तम लेखक आणि कवि आहेस असाच लिहीत राहा

Unknown said...

खूपच छान,आसाच लिहीत रहा,मस्त.

Vighnesh Khale said...

उत्तम लिखाण नेहमीप्रमाणे. 👌👌

Swati Wagh said...

Interesting

Gurudas wagh said...

Nice Start... Keep it up

Unknown said...

खूपच छान.. कविता पण मस्त आहे. पुढच्या भागाची वाट बघेन

Jyotsna Samant said...

Hey very nice story... Poem also..waiting for next part

Shweta said...

सुरुवात छान केलीस. पुढे काय त्याची उत्सुकता आहे

Unknown said...

फार छान खूप आवडले

Ninad Wagh said...

सर्वांचे आभार

Unknown said...

निनाद आज वाचला तुझा लेख. छान आहे. कविता ही छान आहे. कथेत involve व्हायला होते. भाषाही सरळ सोपी.छान.

GEETSAPTAK said...

खुपच छान
कविता तर सुंदरच

GEETSAPTAK said...

खुपच छान
कविता तर सुंदरच