Friday 27 May 2016

भावपूर्ण श्रद्धांजली



गेले दोन महिने हॉस्पिटलमध्ये मरणाच्या दारावर झुरत असलेल्या माझ्या आजोबांचा ८३ वर्षांचा जीवन प्रवास काल अखेर संपला. ते अनंतात विलीन झाले. त्यांची ही साथ सुटली ह्याचं अपार दुःख मनात होतं पण त्याहूनही त्यांची वेदनेतून सुटका झाली ह्याचं काय ते समाधान. ह्या दोन महिन्यात त्यांना खूपच सोसावं लागलं. त्यांना काही सहज मरण नशिबी नव्हतं.
माझं आणि माझ्या आजोबांचं असं एक छान सुंदर नातं होतं. आमचं असं एक वेगळं विश्व होतं. ह्या विश्वात होते ते दोन पक्के मित्र. आमचं हे मैत्रीचं नातं काळा सोबत अधिक बहरत गेलं. अधिक घट्ट होत गेलं. आम्हा दोघांना क्रिकेटचं फार वेड. प्रत्येक सामना आम्ही तहान भूक हरपून फॉलो करायचो. त्या नंतर आमचं चर्चा सत्र चालायचं तासंतास. कोण कसं खेळलं ह्यावर. ते कॉलेजात क्रिकेट टीम मधे होते. तेव्हाचे रंगतदार किस्से त्यांच्या मुखातनं ऐकायला तर फार मज्जा यायची.
त्यांचं बरंच आयुष्य गिरगावच्या चाळीत गेलं. त्यांचं बालपण शाळा सर्व गिरगावात. त्या मुळं माहिमला राहायला लागले तरीही त्या गिरगावच्या आठवणींमधे ते रमायचे. आम्हाला सांगायचे. मग आम्ही सुध्दा अगदी तिथेच आहोत असं वाटायचं. त्यांच्या नजरेतनं मी चाळीतलं जीवन कसं असेल ह्याचा अनुभव अनेकदा घेतला.
आमच्या विश्वात आता मात्र सर्वत्र अंधार पसरला आहे. कधीही भरून न निघणारी पोकळी निर्माण झाली आहे.आता आठवणींच्या हिंडोळ्यावर झुलताना आठवणार ते सोबत घालवलेले ते मौल्यवान क्षण, त्यांच्या सोबत कायम असणारा त्यांचा रेडिओ, त्यांची आवडती बिर्याणी आणि असं बरंच काही. ते आम्हाला जरी सोडून गेले असले तरी त्यांचं माझ्या हृदयातलं स्थान कधीच कमी होणार नाही किंबहुना ते अधिक भक्कम होईल.


आज मला पाडगावकरांच्या कवितेतल्या ओळी आठवतात:

आजोबांच्या खोलीत आता धुकं धुकं धुकं..
आजोबांचं जग आता मुकं मुकं मुकं..



- निनाद वाघ



Friday 20 May 2016

गोष्ट एका रात्रीची


रात्रीची वेळ. साधारणतः दहा वाजले होते. जेवणानंतर असाच एक फेरफटका मारायला म्हणून मी घरून निघालो आणि चालत चालत पोहोचलो ते शिवाजी पार्क जवळच्या चौपाटीवर. तिथल्या खडकावर जाऊन बसलो. एरवी गजबजलेली मुंबई रात्री मात्र अगदी शांत आणि सुरेख वाटत होती. आसपास फारशी माणसं नव्हती. मागील रस्त्यावर गाड्यांची ये जा ही नव्हती. होती ती फक्त निरव शांतता आणि सोबतीला आकाशात पसरलेलं छान शुभ्र चांदणं. किनाऱ्यावर येणाऱ्या प्रत्येक लाटेसह होणाऱ्या पाण्याच्या स्पर्शानं मन प्रफुल्लीत होत होतं. त्या रात्रीची जादू काही औरच होती.
अशा ह्या वातावरणात मीही हरवून गेलो. अशा बेभान अवस्थेत अचानक कानावर काही मधुर स्वर पडले. दूरवर कुठंतरी कुणीतरी आपल्या सुमधुर स्वरात गात असावं. इतक्या रात्री कोण बरं गात असेल ह्याचं कुतूहल वाटत होतं. त्या आवाजाच्या दिशेनं माझी पावलं वळली. जसा जसा पुढं जात होतो तशी मनाची उत्सुकता वाढत होती. शेवटी एका ठिकाणी पोहोचलो. समोरच्या एका खडकावर एक म्हातारा इसम दिसला. एखाद्या शास्त्रीय गायकाला शोभेल असाच काहीसा पोशाख. त्यांचा आवाज, तो स्वर मंत्रमुग्ध करणारा होता. अशा चांदण्या रात्री समुद्र किनारी असं गाणं म्हणजे कानांना खरंच पर्वणी. अहाहा!
मी अगदी तल्लीन होऊन त्यांचं गाणं ऐकत होतो. ते ही अगदी उत्साहाने गात होते. गाता गाता त्यांची नजर माझ्यावर पडली तसे ते थांबले. 
मी म्हणालो, “पंडितजी गाणं थांबवू नका. गात रहा. तुमच्या आवाजात जादू आहे. ह्या मैफीलीनं माझे कान तृप्त झाले.”
मग पुढचा तास दीड तास त्यांचं गाणं अगदी मन भरून ऐकत होतो. त्या नंतर आमच्या गप्पा रंगल्या. ते सांगत होते अन् मी ऐकत होतो. त्यांनी त्यांच्या काळातले गाण्याच्या कार्यक्रमातले किंवा रेकॉर्डिंगचे गमतीदार किस्से सांगितले. गायक म्हणून केलेला प्रवास त्यातल्या चांगल्या वाईट गोष्टी त्याही सांगितल्या. मलाही गमंत वाटत होती आणि त्यांच्या जीवन प्रवासाचा अभिमान सुद्धा.
“तुम्ही रोज येता का इथे? मला आवडेल तुमचं गाणं रोज ऐकायला.”
ते नुसतेच हसले आणि तिथून निघाले. मला जरा आश्चर्य वाटलं पण मग मी ही तिथून निघालो.
घड्याळ पाहिलं तर पहाटेचे पाच वाजले होते. सूर्योदयाची चाहूल लागली होती. हळूहळू घराकडे जाताना नाक्यावर चहाची टपरी दिसली. तोही नुकताच धंदा सुरू करत होता. चहा घेण्यासाठी म्हणून थांबलो. तितक्यात तिथे पेपरवाला ही दिसला. चहा सोबत वाचायला म्हणून पेपर घेतला. मनात अजूनही पंडितजींचा आवाज घुमत होता. ही रात्र अद्भुत होती. कायम स्मरणात राहणारी. 
चहाचा घोट घेत मी पेपर चाळत होतो. इतक्यात मधल्या एका पानावर पंडितजींचा फोटो दिसला. आत्ता भेटलेल्या माणसाचा फोटो पेपर मधे पाहून मी आनंदानं वाचायला गेलो तर फोटो खाली लिहिलं होतं:
पंडित रामशंकर ह्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
त्यांची आज पाचवी पुण्यतिथि होती.



- निनाद वाघ



Friday 13 May 2016

पुस्तक



वाचन तसं माझं फारसं नाही पण आयुष्य नावाचं एक अनोखं पुस्तक जन्मापासून वाचतो आहे. समजून घेण्याचा प्रयत्न करतो आहे. त्यावर आधारित ही माझी नवीन कविता:



पुस्तक

उघडून पुस्तक आयुष्याचं
वाचायला घेतलं प्रत्येक पान..
वाचता वाचता जाणवलं
हे पुस्तक तर फारच लहान..

कोरी होती काही पानं
काही मात्र झिजलेली..
नक्षीदार काही पानं
काही आठवणींनी भिजलेली..

वाचताना काही पानं
मन अलगद सुखावले..
काही पानांमुळे मात्र
डोळ्यांचे कड ओलावले..

सरता सरता हे पुस्तक
वाटले फार गंमतीदार..
ह्यात सुखाची पानं कमी
अन् दुःखाचे अध्याय फार..



- निनाद वाघ




Friday 6 May 2016

बेड नंबर १५



आज आसमंतात सर्वत्र मळभ पसरले होते. भर उन्हाळ्यात आभाळ सुध्दा भरून आलं होतं. मी त्या वास्तू जवळ पोहोचलो. अगदी अस्वस्थ मनाने त्या पायऱ्या चढलो. प्रत्येक पायरी सोबत मनातली धाकधूक वाढत होती. तिसऱ्या माळ्यावर पोहोचलो तेव्हा माझे बिथरलेले डोळे अगदी कासावीस होऊन त्यांना शोधू लागले अन् दिसला तो अगदी कोपऱ्यात असलेला बेड नंबर १५.

त्या बेडवर त्यांना झोपलेल्या अवस्थेत पाहिलं आणि डोळ्याच्या कडा ओलावल्या. जरा जवळ गेलो आणि माझ्या थरथरत्या हातांनी त्यांचा स्थिर हात हातात घेतला आणि कापऱ्या स्वरात हुंदका गिळत म्हटलं, “आजोबा मी आलोय” 

माझा स्पर्श त्यांच्यासाठी ओळखीचा होता. त्यांनी त्यावरून मला ओळखलं कारण मला पाहून ओळखण्याची मुभा त्यांच्याकडे नव्हती. दुर्दैवाने ते अंध होते. 
“काय कसे आहात?” मी विचारलं.

ते बोलायचा प्रयत्न करू लागले. खूप काही सांगायचं होतं त्यांना. आपलं मन मोकळं करायचं होतं पण नियतीनं त्यांना सक्तीचं मौन पाळायला लावलं होतं. त्यांची बोलण्याची ताकद हिरावून घेतली होती.
माझं आणि आजोबांचं असं एक अनोखं नातं होतं. त्यांच्या प्रत्येक हाकेला ओ द्यायला मी हजर असायचो. माझ्या कवितांचे कार्यक्रम आकाशवाणीवर झाले ते त्यांच्याच प्रोत्साहनानं. मी आयुष्यात शिक्षण आणि मानानं फार मोठा झालेलं त्यांना पाहायचं होतं. मी माझ्या कवितांचा कार्यक्रम सादर करावा आणि त्यात अगदी पहिल्या रांगेत बसून त्यांनी त्याचा आस्वाद घ्यावा अशी त्यांची इच्छा होती.

अगदी काल परवा पर्यंत हसत खेळत माझ्या सोबत गप्पा मारत बसलेले माझे आजोबा आज असे अंथरूणावर खिळून राहिलेले दिसतात तेव्हा मन कितीही खंबीर असलं तरी ते पार कोलमडून जातं. मनात विचारांना उधाण येतं. तेही खवळतं.

मी त्यांच्या अंगावरून हात फिरवला. ते सांगू शकत नसले तरी त्यांना होणाऱ्या वेदना जाणवत होत्या. आपल्या उजव्या हाता पायाने ते उठून बसण्याचा करत असलेला केविळवाणा प्रयत्न माझे वाहणारे डोळे हताशपणे पाहत होते. डावीकडून त्यांना साथ नव्हती. ती बाजू पूर्णतः निकामी झाली होती. स्वतःच्या मर्जीनं ते आपल्या हाताची बोटं सुध्दा फिरवू शकत नव्हते. इतकं लाचार झालेलं मी त्यांना ह्या आधी कधीच पाहिलं नव्हतं.
त्यांचं जीवन अगदी सरळ साधं होतं. कधीच कुणाचा वाईट विचार केला नाही. अशा माणसाला असं असहाय्य जगणं कशासाठी? 

तेव्हा बा. सी. मर्ढेकर ह्यांच्या कवितेची ओळ आठवली
“जगायची पण सक्ती आहे मरायची पण सक्ती आहे”

आजोबांची ही अवस्था काही पाहवत नव्हती पण तिथून पावलं देखील वळत नव्हती. आजोबांकडे पाहत माझं मन हळवं होत म्हणालं:

आजोबा तुम्हाला भेटल्या शिवाय राहवत नाही
तुमची ही अवस्था डोळ्यांनी काही पाहवत नाही..
वेदनेतून सुटका व्हावी असं मनाला वाटतं
आठवणींनी तुमच्या मन बघा दाटतं..
म्हणून म्हणतो..
जे झालं ते व्हायला नको होतं..
आधीच अंधारात असलेलं जीवन 
अजून काळोखात जायला नको होतं..
जगायला अशी सक्ती तरी कशाला?
मरणाच्या दारावर असं झुरायला नको होतं..

अगदी जड अंतःकरणाने मी तिथून निघालो. पायरी जवळ पोहोचलो तेव्हा आजोबांची हाक ऐकू आली. मी मागे वळलो तर त्या बेड वर ते अगदी दीन अवस्थेत अंधारात दिसणाऱ्या जगाकडे शून्यात पाहत पडले होते. कदाचित त्यांच्या हृदयानी मारलेल्या हाकेला माझ्या मनाने अलगद ओ दिला असावा.



- निनाद वाघ