Friday 29 January 2016

हरवले आहे !!


अहो आता तुम्हाला म्हणून सांगतो, असं म्हणतात शोधलं की सापडतं पण मी तर अगदी मनापासून प्रयत्न केला त्याला शोधण्याचा तरीही मला काही ते सापडले नाही. खरं सांगायचं तर ते हरवलं आहे हे समजायलाच खूप उशीर झाला. आयुष्याच्या ह्या प्रवासात ओघाने पुढं जात असताना अचानक एके दिवशी ते नसल्याचे जाणवले. मी मागे वळून पाहण्याचा खूप प्रयत्न केला पण ते काही दृष्टिस पडले नाही. वाईट वाटतं!
ही कहाणी आहे माझ्या हरवलेल्या बालपणाची. आयुष्यातलं हे एक सुंदर निरागस असं पर्व. ह्या सुंदर पर्वाच्या सुखद आठवणी मनात कायमच्या घर करून राहिल्या आणि साठवलेल्या ह्या आठवणींना उजाळा देताना डोळ्यांची कड अलगद ओलावते तेव्हा नकळत हिरावून घेतलेल्या त्या बालपणाची उणीव अगदी प्रकर्षाने भासते.

बसुनी एकटाच तटावरी
येते त्याची आठवण..
आता पुन्हा येणे नाही
किती रम्य ते बालपण..

माझ्या ह्या बालपणाला जबाबदारी म्हणजे काय हेच माहीत नव्हतं. मनाला हवं तेव्हा हवं तसं वागायचं. अगदी मनमोकळं बोलायचं. वागण्यात किंवा बोलण्यात कुठलाही कृत्रिमपणा नाही. बोले तो एकदम बिंधास्त..!
बालपणी मन सुद्धा अगदी लहान लहान गोष्टीत रमायचं. खेळायचं बागडायचं आणि भरपूर धमाल. थोडं खोडकर थोडं हट्टी. त्याची गंमत वेगळीच होती. पैसा श्रीमंतीची ओढ नव्हती. ना कसली तडजोड ना धावपळ आणि म्हणूनच टेंशन म्हणजे काय हेही माहित नव्हतं. स्वतःचं असं एक वेगळं विश्व होतं.
काळाच्या ओघात आयुष्य पुढे सरकत राहिलं आणि माझं बालपण त्यात निसटून गेलं. जबाबदाऱ्या वाढत गेल्या. आयुष्य एका विशिष्ट चक्रात फिरू लागलं. वागण्या बोलण्यात कृत्रिमपणा आला. आता माझं माझ्या बालपणाशी भेट होणे शक्य नाही कारण मी खूप पुढे आलो आणि ते मात्र तिथेच राहिलं. अगदी कायमचं!


किनारा :

किनाऱ्यावर होतो उभा
ओढ लागली समुद्राची..
पोहताना त्या खवळलेल्या सागरात
जीव अडकला किनाऱ्यापाशी..

किनाऱ्यासंगे बालपण माझे
अथांग आयुष्य समुद्रासारखे..
सुख दुःखाच्या लाटा वाहे
जीव किनाऱ्यात अडकून राहे..


- निनाद वाघ

Friday 22 January 2016

जरा ‘त्या' बद्दल बोलूया


मान्यवरहो,

सर्वप्रथम मी तुमची क्षमा मागतो कारण गेल्या काही दिवसात मी काही ब्लॉग पोस्ट केलं नाही. बरेच दिवस नवीन पोस्ट नाही म्हटल्यावर मला अनेकांचे मेसेज आले तर काहींनी मला प्रत्यक्ष विचारलं. ह्यावरून माझ्या एक गोष्ट लक्षात आली की तुम्ही माझा ब्लॉग आवर्जून तर वाचता पण पोस्ट नाही म्हटल्यावर तुम्ही ते मिस केलं आणि म्हणूनच मी एका नव्या विषयासह तुमच्या समोर यायचं ठरवलं.

आज जो विषय निवडला आहे तो विषय तसा सोपा आहे पण तरीही न समजणारा. अगदी सरळ साधं वाटणारा पण तरीही एक न सुटणारं कोडं. हो मला जरा ‘त्या’ बद्दल बोलायचं होतं. ‘त्या' बद्दलच!

त्या बद्दल म्हणजे नेमकं कशा बद्दल हा प्रश्न तुम्हाला नक्की पडला असेल. तर ऐका..मला बोलायचे आहे ते प्रत्येकाला स्वतःचं असं असणाऱ्या त्या रहस्यमय आयुष्याबद्दल. आपल्या आयुष्याबद्दल!



वाटते सहज, अगदी सोपे
दडली ह्यात अनेक रहस्य..
सुख दुःखाचा खेळ हा सारा
ह्याला म्हणतात आपलं आयुष्य..


खरंतर आयुष्य अशा सुंदर शब्दाला स्वतःची अशी व्याख्या नाही. फार फार तर असं म्हणू शकतो की जन्मापासून मृत्यू पर्यंत केलेला प्रवास म्हणजे आयुष्य. एकट्यानं सुरु झालेला प्रवास असतो हा पण टप्प्या टप्प्यानं त्यात माणसं जोडली जातात आणि ह्या प्रवासाला एक वेगळा रंग चडतो. नाही का?

आयुष्य ह्या एका शब्दात अनेक गुपितं दडलेली असतात. तसं बघाल तर खूप काही आहे आयुष्यावर बोलण्यासारखं पण शब्दात मांडण्या इतकं सोपं ही नसतं ते, कारण अनुभवातूनच ते घडत असतं. दुःखातून सावरत सुखाचा मार्ग शोधत ते अगदी सावधपणे तरीही वेगाने पुढे सरकत असतं. प्रत्येकाचं आयुष्य हे खूप वेगळं असतं पण तरीही त्यात खूप साम्य असतं.

मग इतकं साम्य असताना सुध्दा प्रत्येक आयुष्य वेगळं कसं? अनेकांना हार पत्करावी लागते तर जिंकणं काहींना शक्य होतं. खरंच जिंकणं इतकं कठीण असतं का हो?

ह्याचं उत्तर आहे नाही.

आयुष्यात खरंतर जिंकणं फार सोपं असतं. आयुष्य सहज जिंकता येतं पण त्यासाठी माणसांना जिंकता आलं पाहिजे त्यांचं मन जिंकता आलं पाहिजे.आपल्या माणसांना दुरावून मिळवलेलं यश हे खरंतर आपलं अपयश असतं कारण आयुष्याच्या शेवटी किती पैसे कमावले ह्या पेक्षा आपण किती माणसं जोडली ह्यात माणसांची खरी श्रीमंती ठरते. तीच आपली खरी संपत्ती.तेच आपलं खरं यश.


- निनाद वाघ

Sunday 3 January 2016

शुभारंभ


प्रिय वाचक,

आज तुमच्याशी संवाद साधतो आहे. तसं तर आपलं नातं जुनंच आहे. ह्या अगदोर ही आपण संवाद साधत होतो ते माझ्या फेसबूक पेजच्या माध्यमातून पण नवं वर्षातील आपली ही पहिली भेट आणि नवीन वर्षात काहीतरी नवं घेऊन तुमच्या समोर यायचं होतं म्हणून हा नवीन ब्लॉग सुरू करतोय.

हा ब्लॉग सुरू करताना असंख्य असे विचार मनात आहेत जे मला तुमच्या समोर मांडायचे आहेत. मनातल्या भावना तुमच्या सारख्या हक्काच्या माणसांसमोर व्यक्त करायच्या आहेत. शब्दांची ही गुंफण करत त्याला भावनांची जरी जोड असली तरी ते शब्द अन् त्यातल्या भावना तुमच्या पर्यंत पोहोचण्यासाठी माध्यम लागतं आणि ह्या पेक्षा अधिक सुंदर माध्यम कुठलं असू शकतं?


शब्दांनाही लागतं माध्यम 
व्यक्त होण्यासाठी..
मनातल्या भावना
मुक्त होण्यासाठी..


ब्लॉगची सुरूवात तर झाली आहे. पण काय लिहावं असा प्रश्न होता. मनापासून जे वाटतं ते लिहिणार हे मात्र निश्चित. शब्दांचा हा सारा खेळ शब्दातून मांडणार. नेमकं काय असेल हे आत्ता नाही सांगत कारण माझ्या प्रत्येक पोस्ट मधून ते उलगडत जाईल आणि त्यातच खरी गंमत आहे. एक मात्र नक्की की इथे विषयाची मर्यादा नसेल कारण विचारांना कधीच कुठली मर्यादा नसते.

मान्यवरहो वाचक हा लेखकासाठी मौल्यवान असतो आणि म्हणूनच शब्दात मांडताना फक्त तुमची साथ हवी आणि ती आहेच ह्याची ही मला खात्री आहे. तुम्ही माझ्या पाठीशी भक्कम पणे आहात ह्याचा प्रत्यय मला नेहमी येतो जेव्हा महाराष्ट्राच्या विविध भागातून अनेकांचे मेसेज येतात. खूप छान वाटतं. माझ्या सारख्या एका सामान्य लेखकाला तुम्ही आपलंसं केलं. तुमच्या ह्या प्रेमाने मी खरंच भारावून गेलो आहे. वेळोवेळी मिळालेल्या ह्या प्रोत्साहनाने लिहिण्याचा उत्साह अधिक वाढतो. मनाला समाधान लाभतं.

चला तर मग हा सिलसिला असाच सुरू राहू द्या.

माझ्या हातून जास्तीतजास्त चांगलं आणि दर्जेदार लिखाण व्हावं हीच ईश्वर चरणी प्रार्थना करतो आणि तुमची रजा घेतो ते पुढच्या आठवड्यात पुन्हा भेटण्यासाठी.


अगदी जाता जाता काही शब्द खास तुमच्यासाठी..


लेखकासाठी वाचक ठरतो
खरा आधारस्तंब..
रसिकहो तुमच्या आशीर्वादाने करतोय 
ह्या ब्लॉगचा शुभारंभ..


धन्यवाद !!

तुमचा लाडका,

निनाद वाघ