Sunday 27 October 2019

माझी अविस्मरणीय दिवाळी




२००९ सालचा प्रसंग.
संध्याकाळची वेळ. आईनं दिलेल्या सामानाची यादी घेऊन मी खरेदी करायला निघालो. दिवाळी ऐन तोंडावर आली होती आणि त्याचं प्रत्यय म्हणजे सिटी लाईटची कंदील गल्ली अगदी थाटात आणि एका विलक्षण तेजात लखलखत होती. ते पाहून कुणालाही वाटेल की गल्ली आहे की मोत्याची माळ. जणू स्वर्ग धरतीवर अवतरला.
मग पुढे मी रानडे रोडला गेलो. तिथेही लोकांची लगबग सुरू होती. दिव्यांचे तोरण, फराळ आणि बरंच काही. दिवाळी म्हटलं की एक वेगळाच उत्साह प्रत्येकात संचारतो आणि सगळीकडे तो दिसून येतो.

ह्या सगळ्या उत्साही लोकांच्या गर्दीत मला एक गृहस्थ दिसले. साधारणतः ७० वर्ष वय असावं. एक साधा खादी कुर्ता, लेंगा अन् उजव्या हातात काठी तर डाव्या खांद्यावर काही कापडी पिशव्या. बहुधा दिवाळीची खरेदी केली असावी. गर्दीतनं वाट काढत ते जात होते.

मला राहावलं नाही म्हणून मी माणूसकीच्या नात्याने त्यांच्याकडे गेलो.
"आजोबा! काही मदत करू का?"
आधी ते नकोच म्हणाले पण माझा प्रेमळ आग्रह पाहून त्यांनी त्यांच्या पिशव्या माझ्याकडे दिल्या. मी त्यांच्या सोबत चालू लागलो.
आता काहीतरी संवाद व्हावा म्हणून मी सहज म्हटलं
"आजोबा! नातवंडांसाठी दिवाळीची खरेदी दिसतेय!"

ते काहीही बोलले नाही आणि फक्त मिश्कीलपणे हसले. त्याचा नेमका अर्थ काय लावायचा हे मलाही कळलं नाही. मग पुढची दहा मिनिटं मी शांतपणे त्यांच्यासोबत चालत राहिलो. पुढे एक असं साधं छोटसं असं एक बैठी घर आलं. आजोबा तिथे थांबले. माझ्या हातातल्या पिशव्या घेतल्या आणि मला म्हणाले,"हे माझं घर. मी इथे राहतो. परवा दिवाळीला अभ्यंगस्नान झाल्यावर नक्की इथे ये. हवंतर अगत्याचं आमंत्रण समज"
त्यांनी इतक्या प्रेमाने ते आमंत्रण दिलं की नाही म्हणायचा प्रश्नच नव्हता.

मी त्यांच्या आमंत्रणाचा मान ठेवून त्यांच्या घरी गेलो. घर अगदी छान सजवलं होतं. दारासमोर छान नक्षीदार रांगोळी होती. आकाश कंदील अगदी दिमाखात मिरवत होता. तेलाचे दिवे होते. अगदी नयनमनोहर दृश्य होतं सगळं. घराचे दार उघडेच होते. मी आत शिरलो तसं आजोबांनी माझं अगदी उत्साहाने स्वागत केलं. आत दोन लहान मुलं साधारणतः १२-१४ वर्षांची अशी खेळत होती. आजोबा माझ्यासाठी एका प्लेटमधे फराळ घेऊन आले.
"फराळ घे. लाजू नकोस"
"बरं आमच्या नेहानं काढलेली रांगोळी बघितली की नाही? कंदीलसुद्धा आमच्या रोहननं बनवलाय बरं का.."
"काय सांगता. खूपच छान. इतक्या लहान वयात इतकं सुंदर टॕलेंट असणं खरंच खूप कौतुकास्पद आहे"
आजोबा दोघांचंही तोंडभरुन कौतुक करत होते. आपलं इतकं कौतुक होतय बघून ती चिल्ली पिल्ली लाजत होती.
आमच्या गप्पा छान रंगल्या होत्या. असं वाटतंच नव्हतं की आमची दुसरीच भेट आहे.

आमच्या गप्पा सुरू असतानाच आतल्या खोलीतून एक गोरा छान तिशीतला तरुण बाहेर आला.
आजोबांनी त्याची ओळख करून दिली. “हा आमचा राकेश. एम.बी. केलं आहे. आणि सध्या एका मोठ्या कंपनीत नोकरीला आहे.”
" हाय. नाईस टू मिट यू"

माझ्या बशीतला चिवडा संपलाय बघून आजोबा आत चिवडा आणायला गेले. राकेश बाजूला बसला होता.
" ह्या वयातसुद्धा तुमच्या वडिलांकडे एखाद्या तरुणाला लाजवेल अशी ऊर्जा आहे. नाही का?"
" अगदी बरोबर बोललात तुम्ही. ते माझ्यासाठी माझ्या वडीलांसारखे आहेत. किंबहुना त्याहूनही जास्त."
" म्हणजे?" मी अचंबित होऊन विचारले.
" मी त्यांना आबा म्हणतो. त्यांनी मला लहानपणापासून सांभाळलं. माझं शिक्षण केलं. आज मी जे काही आहे ते त्यांच्याचमूळे. ते नसते तर आज कदाचित मला हे आयुष्य लाभलं नसतं. मी आयुष्यभराचा ऋणी आहे त्यांचा. आज रोहन आणि नेहासाठी सुद्धा ते जीव लावतात. आज सुद्धा ते आम्हाला आवडणारा खाऊ मुंबईतील विविध दुकानातून आणून देतात. ते कधीच स्वतःसाठी जगले नाहीत. नेहमी आमच्या सुखाचा आनंदाचा विचार केला. खूप जीव लावतात ते. "

मला क्षणभर काही कळेना. आजोबांची अशी प्रतिमा असेल असं वाटलं नव्हतं. हे सगळं ऐकून माझा त्यांच्या प्रतीचा आदर कैक पटीने वाढला आणि दोन दिवसांपूर्वीच्या त्यांच्या त्या मिश्किल हसण्याचं कारण देखील समजलं.

राकेशच्या बोलण्यावरुन मला समजलं की आजोबा म्हणजे कमी पैशात आनंदाने जगणारा एक परोपकारी माणूस. तितकाच मदतीला धावून येणारा आणि वेळ प्रसंगी पैशाची मदत करणारा. अशा माणसाला आपण याची देही याची डोळा पाहतोय हे माझ्यासाठी अभिमानास्पद आहे.

मी आजोबांचा निरोप घेतला आणि तिथून अनेक अविस्मरणीय क्षण उरात साठवून निघालो.
मी पाहिलेली ती दिवाळी प्रेम, आपुलकी, जिव्हाळ्याने भरलेली होती. परोपकाराने सजली होती. साधेपणाने बहरली होती. त्यात पैश्यांचे फटाके नव्हते तर निस्सीम प्रेमाचा गोडवा होता.

दिवाळी म्हटलं की प्रत्येकाची अशी एखादी आठवण असतेच. ती दिवाळी माझ्यासाठी एक सुखद आठवण होती. आजही ते क्षण आठवले की चेहऱ्यावर एक वेगळच तेज येतं. तो प्रसंग आयुष्यभरासाठी मनात घर करून आहे. कायम राहणार!


- निनाद वाघ ©