Friday 29 July 2016

चारोळ्या..



मनातील गोष्ट आज मनात राहून गेली..
आठवणींच्या झर्‍या मधून नकळत ती वाहून गेली..
********************************************

मनात विचार अनेक आहेत
पण शब्द काही सुचत नाही..
हातात लेखणी असून देखील
कागदावर काही उतरत नाही..
********************************************

कुणा एकाच्या सुखासाठी
दुःख आपल्याला सोसावं लागतं..
जसं माणसांच्या आनंदासाठी
ढगांनाही रडावं लागतं..
********************************************

कोसळणाऱ्या पावसाकडे
नुसतं पाहत बसावं..
झेलताना तो प्रत्येक थेंब
मनमोकळं हसावं..
********************************************

जेव्हा असते साथ कुणाची
तेव्हा पावसात सुध्दा रंगत असते..
रटाळ वाटतो हाच पाऊस
जेव्हा कुणाचीच आपल्याला संगत नसते..
********************************************

सुख- दुःख

भास होतो सुखाचा
आनंदी राहते मन..
मग आठवण होते दुःखाची
अन् विस्कटतं सारं जीवन..

सुखाच्या शोधात मग
सुरू होते माझी वारी..
पण सुख आले जेव्हा दारी..
तेव्हा कुरवाळत बसलो होतो
माझी दुःख सारी..
********************************************
दृष्टी नाही तर दृष्टिकोन बदला
म्हणजे सुंदर दिसतील सर्व दृश्य..
इतरांना नको तर स्वतःला बदला
मग बघा किती छान वाटेल आयुष्य..
********************************************
आयुष्यात सरणारा प्रत्येक क्षण
मनात घर करून राहतो..
काळांतराने त्याकडे आपण
आठवण म्हणून पाहतो..
********************************************
आपलं नशीब आपल्या हाती
दोष इतरांना देऊ नका..
आपण घडवू तसंच घडेल आयुष्य
रोष इतरांवर काढू नका..
********************************************
हे आयुष्या.. जरा जपून..
किती रे सुसाट पळशील..
सरळ मार्गी जाताना..
तू मात्र अचानक वळशील..
********************************************
शब्द ही मुके होतात
आठवणींमधे भिजताना..
आभाळाकडे पाहत
पाऊस कवेत घेताना..



- निनाद वाघ

www.shabdatmandatomi.blogspot.in



Friday 8 July 2016

अंधश्रद्धा


मागच्या शनिवारची गोष्ट. आईनं दिलेल्या सामानाची यादी घेऊन मी बाजारात गेलो होतो. बाकी वस्तूंसोबत मी दुकानदाराकडे एक लिटर तेलाचा कंटेनर मागितला तर दुकानदार मला म्हणाला, “साहेब आज शनिवार आणि शनिवारी तेल विकत घेऊ नये. तुम्ही उद्या या”
मी म्हटलं त्याला की बाबा रे ह्या गोष्टी मी काही मानत नाही. तरीही त्याचं म्हणणं होतं की आज नकोच.
आता काय बोलणार ह्या प्रकाराला. त्यानं स्वतःचं नुकसान करून घेतलं पण मला तेल विकत घेऊ दिलं नाही. बरं तिथून घरी जाता जाता सलून मध्ये केस कापून जाऊया म्हटलं तर तितक्यात एक ओळखीचे गृहस्थ भेटले. माझी विचारपूस करताना त्यांच्या लक्षात आलं की मी केस कापायला निघालो आहे. मग काय..तेही सुरू झाले ना राव..शनिवारी केस कापू नये वगैरे वगैरे आणि इच्छा नसतानाही माझी सलूनकडे जाणारी पावलं घराकडे वळवावी लागली.
खरंतर ह्या सगळ्या मागे काय लॉजिक आहे हेच मला समजत नाही. शनिवारी मीठ तेल आणू नये किंवा जेवणात तीन पोळ्या वाढू नये. दारात शिंकू नये वगैरे असे अनेक गैरसमज लोकांच्या मनात घर करून आहेत. पिढ्यांपिढ्या त्या सुरू आहेत. लहानपणापासून ह्या गोष्टी आपल्या मनात ठासून भरल्या जातात आणि मनात आयुष्यभर एक भीती निर्माण होते. भीती होणाऱ्या नुकसानाची.अशी भीती की जर मी ती गोष्ट पाळली नाही तर काही संकट येऊ शकतं. काहींना तर ही अंधश्रद्धा आहे हे माहिती असून देखील उगाच रिस्क कशाला म्हणून पाळतात. हो आणि जर काही एखाद्याने नियम मोडला तर मग त्यावरचे उपाय अजून विचित्र. जसं उदाहरणार्थ जर दारात कुणी शिंकलं तर लगेच तिथे पाणी शिंपडा म्हणजे अपशकून टळेल.खरंच?
अशा लोकांना आपण जर काही समजवायला गेलो तर ते आपल्याशी वाद घालतील आणि काही विसंगत उदाहरण देऊन स्वतःच बरोबर म्हणून जाहीर करतील. त्यामुळे आपणच मूर्ख ठरतो.
आपल्याला खरंतर श्रद्धा आणि अंधश्रद्धा ह्यातील फरक समजायला हवा. देवावर विश्वास ही श्रद्धा पण देवाचे अस्तित्व सिद्ध करण्यासाठी केलेला आटापिटा म्हणजे अंधश्रद्धा. श्रद्धेनं देवाची पूजा करणे किंवा देवळात जाणे ह्यात काहीच चूक नाही. त्याने आपल्याला मानसिक बळ मिळतं. पण त्याचं रूपांतर अंधश्रद्धेत होऊ देऊ नका. जर अमूक गोष्ट केली तर आपलं काम होणार किंवा मांजर आडवी गेली तर काम होणार नाही वगैरे ह्यात काहीच तथ्य नाही आणि जरी तसं घडलं तरी तो केवळ योगायोग असतो हे लक्षात घ्यायला हवं.
अंधश्रद्धा ही समाजासाठी घातक आहे. अंधश्रद्धेतनं माणसं अघोरी कृत्य ही करतात. ज्या दिवशी ही विचारसरणी बदलेल तेव्हा ती समाजात घडणाऱ्या बदलाची नांदी असेल. भीतीवर मात करता आली पाहिजे नाहीतर हे चक्र असंच सुरू राहिल. आपलं नशीब आपल्या हातात असतं. ते आपणच घडवतो. हेच सत्य आहे.
हे लिहून जेव्हा चहा पीत खिडकीत उभा होतो तेव्हा एक माणूस बिल्डिंगमध्ये शिरताना त्याला एक मांजर आडवी जाणार होती तर तो माणूस झटकन उडी मारून मांजरीलाच आडवा गेला.


- निनाद वाघ



Friday 1 July 2016

जोशी काका


रोज सायंकाळी साडेपाच वाजता मी शिवाजी पार्कच्या उद्यान गणेश मंदिरात जात असे. आजही गेलो. गणपती बाप्पांचे दर्शन घेतले अन् मंदिरा समोरच्या कट्ट्यावर जाऊन बसलो. आज जोशी काका मात्र कुठं दिसत नव्हते. तसं सहसा त्यांना कधीही उशीर व्हायचा नाही पण आज नेमका झाला.मी त्यांना जरी रोज भेटत असलो तरी आजचा दिवस मात्र खास होता आणि म्हणूनच मी त्यांच्या येण्याची वाट पाहत बसून राहिलो.
माझी जोशी काकांशी ओळख झाली ती साधारणतः पाच वर्षांपूर्वी इथंच ह्याच कट्ट्यावर.जोशी काका म्हणजे एक सामान्य दिसणारे असामान्य व्यक्तिमत्त्व. अगदी साधारण राहणीमान परंतु विचारांची श्रीमंती असणारा माणूस.सदा हसतमुख.
ओळख वाढली तशी आमच्यात मैत्री झाली.आमच्यात जवळजवळ चार दशकांचा फरक होता पण मैत्रीला वयाची मर्यादा कधीच नसते हेच खरं!
काळा सोबत आमची मैत्री अधिक घट्ट होत गेली. मी त्यांच्या कडून खूप काही शिकलो.आयुष्य हसत खेळत कसं जगावं हे त्यांनी मला शिकवलं. कितीही कठीण प्रसंग आला किंवा कसली समस्या असो, त्याला ते अगदी हसत हसत सामोरे जायचे आणि त्यावर मात करायचे. कुठल्याही गोष्टीचा ताण न घेता ही आयुष्य अगदी सुंदर आणि यशस्वीपणे जगता येतं हे त्यांनीच मला दाखवून दिलं. टेंशन घेऊन प्रश्न सुटत नाहीत तर ते अधिक गुंतले जातात अशा मताचे ते होते.
त्यांना मनं जिंकणं अगदी सहज जमायचे.म्हणजे समोरच्या व्यक्तीला न दुखावता ही आपलं म्हणणं त्या पर्यंत सहज पोहोचवायचे. आणि म्हणूनच की काय त्यांचे शत्रू कोणीच नव्हते. जे होते ते फक्त मित्र.
मला ते प्रेमाने बंड्या म्हणून हाक मारायचे.आम्ही रोज कट्ट्यावर बसून गप्पा मारायचो.
आज फ्रेंडशिप डे होता म्हणजेच मैत्री दिन. त्यांच्या साठी मी एक खास भेटवस्तु आणली होती. आपल्याला आयुष्यात मित्र अनेक भेटतात पण खरा मित्र सापडायला भाग्य लागतं. मला ते भाग्य लाभलं म्हणूनच तर जोशी काका सारखे मित्र भेटले. मला माझ्या सुख दुःखात साथ देणारे. योग्य मार्ग दाखवणारे सोबती. खरंच ते एक गोड नातं होतं.एक गोड मैत्री.
त्यांची वाट पाहताना तास कसा उलटला समजलंच नाही.पण त्यांचा मात्र अजूनही काहीच पत्ता नव्हता. आज बहुधा त्यांना न भेटता जावं लागणार होतं.फार उशीर झाला होता. मी घरी जायला निघालो. चार पावलं चाललो इतक्यात काही लोकांची गर्दी दिसली. कुणाची तरी अंतयात्रा निघाली होती. अशा प्रसंगी माझं मन नेहमी हळवं होतं पण माणूस जन्माला येतो तो एक ना एक दिवस मरण पावणार हे निश्चित असतं म्हणूनच त्याला निरोप डोळ्यात अश्रू आणून नव्हे तर हसत हसत द्यावा हेही मला जोशी काकांनीच शिकवलं.
मी हळुहळु चालत राहिलो.चालता चालता सहज नजर पडली ती घेऊन जात असलेल्या प्रेतावर. पाहिलं आणि पायाखालची जमीन सरखली.मृत पावलेली व्यक्ती जोशी काका होती.माझ्या काळजाचा ठोका चुकला.काहीच सुचेना.कट्ट्यावर वाट पाहताना त्यांनी भेटावं अशी इच्छा होती पण ती भेट अखेरची असेल हे माहिती नव्हतं.कायम हसतमुख असणारे जोशी काका आपल्या मृत्यू शैय्येवर सुद्धा हसत झोपले होते. बहुधा मृत्यूला ही ते हसता हसता सामोरे गेले असावेत.
मनात भावना दाटल्या होत्या. देवाने इतकं क्रूर तरी का वागावं? आभाळाला ही भरून आलं अन् तेही कोसळू लागलं.मी आणलेली भेटवस्तु त्यांच्या पायाशी ठेवली आणि वळलो तेव्हा मागून आवाज आला, “थँक्स बंड्या” अन् माझी पावलं नकळत त्यांच्या अंतयात्रेत सामील झाली.



- निनाद वाघ