Friday 8 July 2016

अंधश्रद्धा


मागच्या शनिवारची गोष्ट. आईनं दिलेल्या सामानाची यादी घेऊन मी बाजारात गेलो होतो. बाकी वस्तूंसोबत मी दुकानदाराकडे एक लिटर तेलाचा कंटेनर मागितला तर दुकानदार मला म्हणाला, “साहेब आज शनिवार आणि शनिवारी तेल विकत घेऊ नये. तुम्ही उद्या या”
मी म्हटलं त्याला की बाबा रे ह्या गोष्टी मी काही मानत नाही. तरीही त्याचं म्हणणं होतं की आज नकोच.
आता काय बोलणार ह्या प्रकाराला. त्यानं स्वतःचं नुकसान करून घेतलं पण मला तेल विकत घेऊ दिलं नाही. बरं तिथून घरी जाता जाता सलून मध्ये केस कापून जाऊया म्हटलं तर तितक्यात एक ओळखीचे गृहस्थ भेटले. माझी विचारपूस करताना त्यांच्या लक्षात आलं की मी केस कापायला निघालो आहे. मग काय..तेही सुरू झाले ना राव..शनिवारी केस कापू नये वगैरे वगैरे आणि इच्छा नसतानाही माझी सलूनकडे जाणारी पावलं घराकडे वळवावी लागली.
खरंतर ह्या सगळ्या मागे काय लॉजिक आहे हेच मला समजत नाही. शनिवारी मीठ तेल आणू नये किंवा जेवणात तीन पोळ्या वाढू नये. दारात शिंकू नये वगैरे असे अनेक गैरसमज लोकांच्या मनात घर करून आहेत. पिढ्यांपिढ्या त्या सुरू आहेत. लहानपणापासून ह्या गोष्टी आपल्या मनात ठासून भरल्या जातात आणि मनात आयुष्यभर एक भीती निर्माण होते. भीती होणाऱ्या नुकसानाची.अशी भीती की जर मी ती गोष्ट पाळली नाही तर काही संकट येऊ शकतं. काहींना तर ही अंधश्रद्धा आहे हे माहिती असून देखील उगाच रिस्क कशाला म्हणून पाळतात. हो आणि जर काही एखाद्याने नियम मोडला तर मग त्यावरचे उपाय अजून विचित्र. जसं उदाहरणार्थ जर दारात कुणी शिंकलं तर लगेच तिथे पाणी शिंपडा म्हणजे अपशकून टळेल.खरंच?
अशा लोकांना आपण जर काही समजवायला गेलो तर ते आपल्याशी वाद घालतील आणि काही विसंगत उदाहरण देऊन स्वतःच बरोबर म्हणून जाहीर करतील. त्यामुळे आपणच मूर्ख ठरतो.
आपल्याला खरंतर श्रद्धा आणि अंधश्रद्धा ह्यातील फरक समजायला हवा. देवावर विश्वास ही श्रद्धा पण देवाचे अस्तित्व सिद्ध करण्यासाठी केलेला आटापिटा म्हणजे अंधश्रद्धा. श्रद्धेनं देवाची पूजा करणे किंवा देवळात जाणे ह्यात काहीच चूक नाही. त्याने आपल्याला मानसिक बळ मिळतं. पण त्याचं रूपांतर अंधश्रद्धेत होऊ देऊ नका. जर अमूक गोष्ट केली तर आपलं काम होणार किंवा मांजर आडवी गेली तर काम होणार नाही वगैरे ह्यात काहीच तथ्य नाही आणि जरी तसं घडलं तरी तो केवळ योगायोग असतो हे लक्षात घ्यायला हवं.
अंधश्रद्धा ही समाजासाठी घातक आहे. अंधश्रद्धेतनं माणसं अघोरी कृत्य ही करतात. ज्या दिवशी ही विचारसरणी बदलेल तेव्हा ती समाजात घडणाऱ्या बदलाची नांदी असेल. भीतीवर मात करता आली पाहिजे नाहीतर हे चक्र असंच सुरू राहिल. आपलं नशीब आपल्या हातात असतं. ते आपणच घडवतो. हेच सत्य आहे.
हे लिहून जेव्हा चहा पीत खिडकीत उभा होतो तेव्हा एक माणूस बिल्डिंगमध्ये शिरताना त्याला एक मांजर आडवी जाणार होती तर तो माणूस झटकन उडी मारून मांजरीलाच आडवा गेला.


- निनाद वाघ



No comments: