Friday 26 February 2016

मन हे आपुले



                  नेहमीच मी तुमच्याशी माझ्या मनातलं मांडतो मनातलं बोलतो पण आज मी तुमच्याशी जरा वेगळं बोलणार कारण आज माझ्या मनातलं नाही तर मना विषयी बोलणार आहे. आपल्या नाजूक मनाविषयी. कधी भावूक होणारं मन तर कधी आनंदी मन. कधी हताश झालेलं मन तर कधी उत्साही मन. अनेक आठवणी जपणारं मन. अनेक विचार निर्माण करणारं मन. क्षणात इकडे तर क्षणात तिकडे असं निसर्गात सहजतेनं वावरणारं आपलं मन. ह्या आपल्या मनावर व्यक्त होताना मी माझी ही कविता शेयर करतोय:

मन हे आपुले..

मन हे आपुले मन हे आपुले
जाई कधी कुठे हे ना कळे..

हे मन आपुले चंचल 
नसे त्याला क्षणभर थारा
सोसाट्यानं वाहत राही
जसा निसर्गात हा वारा
स्तब्ध राहते कधीकधी 
तर कधी झपाट्याने पळे
मन हे आपुले मन हे आपुले
जाई कधी कुठे हे ना कळे..

लावूनी पंख स्वतःला
ते आसमंतात उडे 
झाडां सोबत झुलताना
कधी सागरात बुडे
जाई सरळ कधीकधी 
तर कधी अचानक वळे
मन हे आपुले मन हे आपुले
जाई कधी कुठे हे ना कळे..

अशा ह्या मनाला जपणं फार गरजेचं असतं कारण मन नाराज असेल तर आयुष्याचं सारं गणित चुकतं. सर्वत्र नैराश्य पसरतं. कायम मनावर ताण असतो. आपलं स्वास्थ्य बिघडतं आणि मग हळूहळू तो येऊ लागतो.

तो येतो तेव्हा ...

          आयुष्यात हरलो होतो.थकलो होतो.नैराश्य पदरी पडले होते.पार खचून गेलो होतो.अन् अखेर तो आलाच..
अगोदर कधीकधी यायचा मग हळूहळू रोज येऊ लागला आणि आता तर कायमचा मुक्कामाला आला.कायम माझ्या सोबत असायचा. मी लोकांच्या गर्दीत असायचो तरीही तो काही माझी पाठ सोडायचा नाही.मी कामात असायचो तर तो तिथेही असायचा. सगळी कडे तो डोकावू लागला. मग मात्र लोकं ही विचारू लागली पण माझ्याकडे उत्तर नसायचे. तो मला लोकां पासून तोडायचा. त्याच्या मुळे मित्र दुरावले पण त्याचं स्थान मात्र अधिक भक्कम झालं.
         तो जितका नको नकोसा वाटायचा तितकाच तो माझ्या जवळ यायचा.सगळं खूप विलक्षण होतं.
मला वाटायचे की तो फक्त माझ्याच सोबत आहे मग हळूहळू समजत गेलं की तो तर अनेकांसोबत आहे. सगळेच त्याच्या मुळे त्रासलेले.
खरंतर आपलं आयुष्यच असं झालं आहे की तो कोणाच्याही जीवनात डोकावू शकतो.तो सर्वां सोबत वावरत असतो. आपल्या लक्षात येईस तोवर खूप उशीर झालेला असतो.आपण खचून जातो. आपण काही करायचे ठरवले की तो आपल्याला मागे खेचत राहतो. त्याच्यामुळेच नैराश्य येते आणि ते चक्र सुरू होतं. एक भरारी घेऊ पाहणाऱ्या आयुष्याचा अस्त होतो. सगळं त्याच्या मुळेच.
        असा असतो हा प्रत्येकाच्या आयुष्यात कधी टप्प्या टप्प्याने तर कधी कायमचाच येणारा 'एकटेपणा'
हा एकटेपणा जर टाळायचा असेल तर मानसिक स्वास्थ्य जपणं फार महत्त्वाचं. मन प्रसन्न असलं की सगळं काही सुरळीत होतं.

मन करा रे प्रसन्न..!

पुरे झाहले दुःख आता
वेदना कुरवाळू तरी किती..?
नको आसवे डोळ्यांत आता
कशाला उद्याची भीती..?

कशाला चिंता कालची..?
गेला दिवस जुना झाला..
घेऊन आता नवी चेतना
नवा दिवस पुन्हा आला..

हे कटू विचार सारे
मनास आपुल्या करती सुन्न..
झटकून सारी दुःख आता
मन करा रे प्रसन्न..!



- निनाद वाघ





Friday 19 February 2016

जरा माणसांसारखं वागूया



आज तुमच्या समोर माझी एक कविता सादर करतोय. ह्या कवितेचं शीर्षक आहे “जरा माणसांसारखं वागूया”
ह्या कवितेचा संदर्भ असा आहे की बदलणाऱ्या काळा सोबत माणूस इतका बदलत गेला की तो माणसांशी माणसांसारखं वागणं विसरून गेला.
खरंतर माणूस हा शिक्षण, नोकरी, पैसा ह्यात असा काही गुंतला गेला आहे की त्याच्याकडे नेहमीच वेळेचा अभाव असतो. ना परिवारासाठी तो वेळ देऊ शकतो, ना मित्र मैत्रीणींसाठी आणि ना स्वतःसाठी. शिवाय फेसबूक, वॉट्सॲप सारख्या माध्यमातून जग अगदी जवळ आलंय. जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात आपण कुणाशीही बोलू शकतो, त्याला पाहू शकतो पण ह्या सगळ्यात माणसांमधे दुरावा निर्माण होत आहे हे आपल्या लक्षात येत नाही. आजकाल आपल्या घरच्या लोकांशी बोलणं तर होतं पण संवाद हरवलाय. तुम्हाला तरी आठवतं का कट्ट्यावर मित्रांशी शेवटच्या गप्पा कधी मारल्या? हे सगळं आता ऑनलाइन होतं. नात्यांमधली ती गंमत हरवलीय.
एखाद्या यंत्रासारखं आपल्या कामाचं चक्र नुसतं सुरू असतं. काहीजण तर आपल्या स्वतःच्या घरी लॉजींग बोर्डींगला आल्या सारखे येतात. रात्री चेक इन करतात अन् सकाळी चेक आऊट.
जगण्यासाठी माणसाला काम करून पैसे कमवणं नक्कीच गरजेचं आहे पण हे करत असताना थोडा वेळ आपल्या माणसांना देणंही तितकंच गरजेचं आहे. आपण कितीही बिझी असलो, कामाचा कितीही लोड असला तरीही थोडा वेळ हे सारं बाजूला सारून माणसांशी मनमोकळेपणाने वागता आलं पाहिजे म्हणजे जगणं नक्कीच सुकर होईल. नाही का?



जरा माणसांसारखं वागूया..

सारून सारं बाजूला
मनमोकळं जगूया म्हणतोय..
तुटलेली नाती सारी
पुन्हा नव्याने जोडूया म्हणतोय
आज जरा माणसांशी
माणसांसारखा वागूया म्हणतोय..


आजी सोबत जरा निवांत
गप्पा मारूया म्हणतोय..
आजोबांसोबत फिरायला जरा
पार्कात जाऊया म्हणतोय..
आज जरा माणसांशी
माणसांसारखा वागूया म्हणतोय..


आईच्या हातचा गरम भात
तिच्या सोबत जेवूया म्हणतोय..
सोडून नुसते बोलणे
बाबांशी संवाद साधूया म्हणतोय..
आज जरा माणसांशी
माणसांसारखा वागूया म्हणतोय..


ताईची गंमत करताना
दादाची ही खोड काढूया म्हणतोय..
सोनेरी बालपण आठवताना
सारं जग विसरूया म्हणतोय..
आज जरा माणसांशी
माणसांसारखा वागूया म्हणतोय..


मित्रांना आता पुन्हा
जुन्याच कट्ट्यावर भेटूया म्हणतोय..
तुटलेली नाती सारी
पुन्हा नव्याने जोडूया म्हणतोय..
आज जरा माणसांशी
माणसांसारखा वागूया म्हणतोय..


- निनाद वाघ



Friday 12 February 2016

वडा पाव


मी शाळेत असतानाची गोष्ट. आमच्या शाळेच्या आवारात एक माणूस रोज यायचा. वयाने तसा वृद्ध होता. कमरेतून जरासा वाकलेला. डोक्यावर वेताची टोपली अन् त्यात लाल रंगाच्या गोळ्या आणि वडा पाव विकायचा. त्या काळी शाळेत जाताना खिशात मोबाईल किंवा मनगटावर घड्याळ नसायचे आणि म्हणूनच वर्गाच्या खिडकीतून त्या माणसाला आवारात शिरताना पाहिले की समजायचे आता लवकरच मधली सुट्टी होणार अन् आनंद व्हायचा.
मधल्या सुट्टीत मुलांचा घोळका नेहमी त्याच्या अवती भोवती असायचा.सर्व मुलांचा तो लाडका ‘वडा पाव चाचा’ होता.कोणी वडा पाव घ्यायचं तर कोणी छोट्या लाल गोळ्या. ते चिमुकले हात जेव्हा त्या थरथरणाऱ्या हातावर दोन पाच रूपये ठेवायचे तेव्हा सूरकुत्या पडलेल्या त्याच्या चेहऱ्यावर समाधानाची रेष अगदी स्पष्ट दिसायची.
मलाही कधीकधी मोह व्हायचा वडा पाव खाण्याचा परंतु घरातून परवानगी नव्हती. आईनं दिलेला डबा खायचा अशी सक्त ताकीद होती. गुपचूप खायचं म्हटलं तर खिशात पाच रूपये ही नसायचे. मग एके दिवशी आईकडे खूप हट्ट करून परवानगी मिळवली. शाळेत जाताना आईनं हातात पाच रूपये ठेवले अन् सांभाळून घेऊन जा म्हणून सांगितलं. खिशात पाच रूपये ठेवल्यावर खिसा अगदी भरल्या सारखा वाटला.खूप आनंद झाला. 
शाळेत अगदी उत्साहात गेलो. वर्गात काही लक्ष लागेना. माझी नजर शोधत होती ती फक्त आणि फक्त चाचांना. तास संपत होते तसे मन आणखीनच आतूर होत होते पण चाचा काही दिसेना. इतक्यात मधल्या सुट्टीची बेल झाली. अजूनही चाचांचा काही पत्ता नव्हता. कदाचित चाचा अगोदरच आवारात शिरले असतील ही आशा मनात बाळगून मी अक्षरशः पटांगणात धावलो. ते तिथेही नव्हते. आता मात्र मन उदास झाले होते. रागही खूप येत होता. मी तिथेच जोर जोरात रडू लागलो आणि पुन्हा वर्गात जाण्यासाठी निघालो. तेव्हा अचानक चाचांना पटांगणात शिरताना पाहिले. क्षणात डोळ्यांतून आसवे गायब झाली आणि चेहऱ्यावर प्रसन्नता उमटली. लगेच हात खिशात गेला. आईनं दिलेल्या पाच रूपयांत तीन रूपयांचा वडा पाव आणि दोनच्या लाल गोळ्या घेतल्या. वडा पाव खाण्यापेक्षाही तो स्वतः विकत घेतल्याचा आनंद जास्त होता.मन अगदी तृप्त झालं. 
शाळा सोडून आता अनेक वर्ष लोटली पण आजही कधी शाळेच्या परिसरात गेलो तर माझी नजर त्या चाचांना शोधत असते. आज खिशात पाच चे पाचशे झाले.पोटातली भूकही वाढली.अनेकदा अनेक ठिकाणी वडा पाव खाल्ले पण कधीच चाचांच्या हातची सर त्याला नव्हती. शाळेत असताना खाल्लेल्या त्या पहिल्या वडापावाची चव आजही जिभेवर आहे आणि आयुष्यभर राहील.. 



- निनाद वाघ






Friday 5 February 2016

माणुसकी दुर्मिळ झाली हो !


आज सकाळीच रमेश भाऊंचा फोन आला. फोनवरून एक दुःखद बातमी समजली आणि मन अगदी हळवं झालं. बातमी होती कविता ताईंच्या निधनाची. सगळं कसं अचानक घडलं. काही आजार नव्हता. वयाने सुद्धा तशा लहानच होत्या. जेव्हा निधनाचं कारण समजलं तेव्हा मात्र मनाला झालेली वेदना अधिक तीव्र झाली. आतून पूर्णतः कोसळलो होतो. स्वतःला जेमतेम सावरत मी त्यांच्या घराकडे निघालो.
मी कविता ताईंच्या घरी पोहोचलो तेव्हा तिथलं वातावरण अगदी शोकाकुळ झालं होतं. प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू तरळत होते आणि हृदयात वेदना जी प्रकर्षाने त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होती. कविता ताईंच्या जाण्यानं निर्माण झालेली पोकळी आता आयुष्यभर जाणवेल ह्याची हळहळ इथं उपस्थित प्रत्येकाला वाटत होती कारण इथं आलेला प्रत्येक माणूस हा कविता ताईंचा ऋणी होता. असे ऋण ज्याची परतफेड कधीच होऊ शकत नाही. निदान ह्या जन्मी तरी नाही.
कविता देशपांडे म्हणजेच माझ्या लाडक्या कविता ताई. हे रसायनच मुळी वेगळं होतं. गेली जवळपास २० वर्षे त्या निस्वार्थ मनाने समाजसेवा करत होत्या. कित्येकांना त्यांनी रोजगार मिळवून दिला तर अनेकांच्या विसकटलेल्या संसाराची घडी पुन्हा व्यवस्थित बसविण्यात त्यांनी मदत केली. ज्यांची घरं उध्वस्त झाली त्यांना पुन्हा खंबीरपणे उभे राहण्याचे बळ दिले तेही ह्यांनीच. त्यांना त्यांच्या कामात मदत करायची संधी मला अनेकदा लाभली. त्यांच्या सोबत काम करायची मज्जा काही और होती.
रमेश भाऊ हे त्यांचे अगदी जुने सहकारी. त्यांना ही अश्रू अनावर झाले होते. ते गहीवरले. बोलताना त्यांचा आवाज कापत होता. "ताई गेल्या रे..ताई गेल्या..आपल्याला सोडून..कायमच्या.."
अंगावर काटा आला.माझ्या पायाखालची जमीन सरखली होती तरीही भाऊंना धीर देत मी म्हणालो,"कसं झालं ?"
तेव्हा हुंदका गिळून ते म्हणाले, "ताई काही आश्रमांना मदत करून घरी परत येत होत्या. रस्ता क्रॉस करत असताना सिग्नल तोडून येणाऱ्या एका भरधाव मोटर सायकलीने त्यांना धडक दिली. रक्ताच्या थारोळ्यात ताई पडल्या होत्या. मदतीसाठी हाका मारत होत्या. बघ्यांची गर्दी जमली पण मदतीसाठी एकही हाथ पुढं सरसावला नाही आणि त्यांनी तिथेच आपले प्राण सोडले.." हे सांगताना भाऊ कोसळले. मीही दोन पावलं मागे गेलो. मनात विचार आला की ज्या बाईने आपले संपूर्ण आयुष्य लोकांच्या मदतीसाठी खर्ची केले त्या बाईला असं मरण यावं? एखाद्या बेवारश्या सारखं?
ही घटना म्हणजे माणूसकीला काळीमा. खरंच विचार करायला लावणारी. ह्या घटनेने एक गोष्ट मात्र माझ्या लक्षात आली की समाजात माणसं तर खूप आहेत पण माणूसकी नाही. या गोष्टीची खरंच खंत वाटते.
कविता ताई तर गेल्या पण माझ्या सारख्या अनेकांना हा वारसा पुढे नेण्यासाठी प्रेरित करून.त्या नेहमी म्हणायच्या समाज सुधारणेसाठी प्रयत्न करत राहवा कारण बदल नक्कीच होणार. त्यांचं म्हणणं बरोबर आहे कारण कुठल्याही अपेक्षा न बाळगता केलेल्या कार्यात अपेक्षा भंग होण्याची भीती नसते. असतो तो फक्त उच्च कोटीचा आनंद. आमचं मार्गदर्शन करायला आमच्या कविता ताई आहेतच. त्याही आहेत ह्या अथांग आसमंतात आम्हाला आशीर्वाद द्यायला..


- निनाद वाघ