Sunday 31 May 2020

भाग ४: एक गुपीत आयुष्याचं



तिचा शोध घ्यायला मी अनेक प्रयत्न केले. किंबहुना अजूनही करतोय. पण तिची भेट काही झाली नाही. बघता बघता ५ वर्ष सरली. कॉलेजचं शेवटचं वर्ष होतं. आयुष्य बदललं होतं. विचारांमधे आता मॕच्यूरिटी आली होती. करियरवर फोकस करायची वेळ होती. कविता करणं एकीकडे सुरूच होतं पण छंद म्हणून. त्यात करियर करावं असा काही विचार नव्हता. आयुष्याच्या ह्या टप्प्यावर प्रत्येक जण गोंधळेलाच असतो. माझं काही वेगळं नव्हतं. मी एका फर्ममधे इंटर्नशिप सुरू केली पण का कोण जाणे तिथे मन रमत नव्हतं. शरीर जरी ऑफीसमधे असलं तरी मन तिथे नसायचं.
हे सगळं एकीकडे सुरू असताना दुसरीकडे इतक्या वर्षांनी देखील त्या मुलीचा विचार अगदी स्पष्टपणे डोक्यात रेंगाळत होता. ती ओढ तशीच होती. ती आस तितकीच होती. एकीकडे स्वप्नांना भरारी देण्याचा प्रयत्न तर दुसरीकडे तिला शोधायची धडपड. 
आयुष्य असंच सुरू होतं आणि एकेदिवशी पुन्हा दाराची बेल वाजली. मी दार उघडला तर दारात कुणी नव्हतं पण एक पत्र मात्र ठेवलं होतं, अगदी तसंच जसं काही वर्षांपूर्वी झालं होतं.
मी लगेचच पत्र वाचायला घेतलं. 

"हाय..कसा आहेस? मला माहित आहे की तुला प्रश्न पडला असेल ना की मी कोण आहे? माझं नाव काय? माझ्या बद्दल असंख्य प्रश्न मनात असतील..पण कधीकधी काही प्रश्नांची उत्तरं न शोधलेली बरी..आपली भेट पुन्हा होईल की नाही माहित नाही पण माझ्या आयुष्यात तू नेहमीच स्पेशल असशील. हवंतर मला तुझी पहिली फॕन समझ..आणि तुझ्या ह्या पहिल्या फॕन साठी एखादी कविता सादर कर की.."

पत्र वाचलं आणि मन भरून आलं. आपलं कुणीतरी कौतुक करतंय..आपल्या कविता आवडतात. एका व्यक्तीसाठी का होईना पण आयुष्यात मात्र मला काय करायचं आहे ते समजलं होतं. जे सुचलं ते लिहून काढलं. ही कविता तिच्या पर्यंत नक्की पोहोचेल ह्याची खात्री होती.. 


एक गुपीत आयुष्यचं..


समोर रस्ते चार होते
मार्ग कुठला निवडू कळेना.. 
निवडला एक मार्ग शेवटी
पण पावलं तिथे वळेना.. 


निवडताना तो रस्ता
सल्ले घेतले इतरांचे.. 
ऐकले नाही तेव्हा
आतून येणाऱ्या स्वरांचे.. 


प्रवास खडतर वाटू लागला
कायम संकटानी ग्रासलेला.. 
चहू बाजूने अंधार पसरला
कायम दुःखाने त्रासलेला.. 


एके दिवशी मग मी
एक दृढ निश्चय केला.. 
चार पावलं मागे वळत
प्रवास नव्यानं सुरू केला.. 


आता प्रवास सुकर झाला
जीवनात माझ्या आनंद आला.. 
दुःख सारे विरुन गेले
आयुष्य नव्याने उदयास आले.. 


आनंदी आयुष्याचं तुम्हाला गुपीत
सांगतो नीट ऐका जरा.. 
सल्ला देणारे भेटतील खूप
पण मनाला आवडेल तेच करा.. 


- निनाद वाघ ©




to be continued..

No comments: