Sunday 17 May 2020

भाग २: "ती कोण होती?"


मी प्रश्नार्थक नजरेनं तिच्याकडे पाहत राहिलो पण ती मात्र निघून गेली. ती कोण असेल ह्या विचाराच्या तंद्रीत मी दाराकडे नजर लावून होतो. आपल्या अवतीभवती काय घडतंय ह्याचं ही मला भान नव्हतं. कार्यक्रम संपला होता. लोकं निघायला सुरूवात झाली होती. मी मात्र तिथेच उभा होतो. त्याच तंद्रीत, त्याच प्रश्नार्थक नजरेनं पाहत.

"चला रूम लॉक करायची आहे. प्लीज बाहेर जाऊन थांबा" असं म्हणत कुणीतरी माझ्या पाठीवर हात ठेवल्याचं मला जाणवलं आणि मी भानावर आलो.

"सॉरी..सॉरी.."

मी तिथून तर निघालो पण मनात मात्र ते विचार घोळत होते. सगळं आश्चर्यचकित करणारं होतं. सारखा एकच प्रश्न,"कोण असेल ती?"

आता दुपार उलटली होती. मी चालत घरी जात होतो पण माझी नजर मात्र सारखी तिलाच शोधत होती की कुठेतरी अकस्मात ती दिसेल ह्या एका आशेवर. दुर्दैवाने तसं काहीही घडलं नाही.

मी हताशपणे घरी आलो. दिवसभरात घडलेल्या घडामोडींमुळे थोडा थकवा जाणवत होता. इतका की सोफ्यावर बसल्या बसल्या कधी डोळा लागला हेच कळलं नाही. जेव्हा जाग आली तेव्हा बघतो तर रात्रीचे वाजले होते.

किचनमधे जाऊन मी स्वतःसाठी गरम कॉफी बनवली आणि कॉफीचा मग घेऊन खिडकीत जाऊन बसलो. खिडकीतून सगळं जग गजबजलेलं पण तरीही शांत सुंदर दिसत होतं. मनात आलं म्हणून यू ट्युबवर किशोर कुमारची छान रोमँटिक गाणी लावली.

तसं खिडकीत बसून कॉफी प्यायची ही काही माझी पहिलीच वेळ नव्हती. अनेकदा असं बसलोय पण आज सगळंच वेगळं वाटत होतं. छान वाटत होतं.

ढगांमागे लपलेला तो चंद्र, नभात पसरलेलं ते टिपूर चांदणं, हातात गरम कॉफी आणि बॕकग्राऊंडला किशोर दा.. अहाहा..

मी त्या वातावरणात रमलो होतो. अजूनही तिचा तो सुंदर चेहरा डोळ्यांसमोर होताच. तिचं ते गोड हसणं, बोलण्यातली ती आर्तता, तो सहज संवाद, त्यातला आपलेपणा..कोण म्हणेल की ती पहिली भेट होती..

असं अचानक कुणीतरी यावं,
नजरेनं खूप काही बोलून जावं,
आपल्या त्या गोड शब्दांनी
अगदी हृदयाला साद घालावी अन्
मनात स्थान निर्माण करावं
पहिल्या भेटीत खरंच असं घडू शकतं का?

"ती कोण असेल?" हा प्रश्न सारखा मनाला अस्वस्थ करत होता. उत्तर काही सापडत नव्हतं. सगळंच रहस्यमय वाटत होतं. होतं ते फक्त एक मोठं प्रश्नचिन्ह. काय करावं कळत नव्हतं. असं शांत बसून चालणार नव्हतं. शेवटी मी स्वतःशीच एक निश्चय केला. त्या अनामिक अस्तित्वाचा शोध घ्यायचा ठरवलं.

निश्चय केला खरा मात्र शोधणार कसं ते समजत नव्हतं आणि आयुष्यात जेव्हा फक्त प्रश्न उरतात तेव्हा आपोआप आपले हात त्या परमात्म्यापुढे जोडले जातात. मी सुद्धा तेच केलं.

"देवा..आता तूच काय तो मार्ग दाखव.."

देवाला साकडं घातलं आणि तितक्यात दाराची बेल वाजली. मी पटकन दार उघडला अन् बघतो तर...



to be continued..

- निनाद वाघ ©

8 comments:

Unknown said...

भाग २ सुद्धा खूपच छान,मस्त.

Vighnesh Khale said...

Mast

Unknown said...

Nice

Jyotsna Samant said...

खूपच छान...

Unknown said...

Khup chhan

Unknown said...

Khup chhan

Unknown said...

खूप भावूक

Unknown said...

Khup chhan