Sunday 25 September 2016

रजनीचं नेमकं काय झालं?



सकाळपासून हाच विचार करतोय की रजनीची सुटका झाली असेल का..ती सुखरूप घरी पोहोचली असेल का?
आज सकाळी बसमध्ये बसलो होतो. दोन माणसं मागच्या सीटवर बसून बोलत होती. त्यांचं बोलणं कानावर पडत होतं. त्यातला एकजण म्हणाला की त्यानं रजनीला फोन केला होता तेव्हा ती खूप टेंशनमध्ये होती. बॕग भरत होती. तिचा जीव घुसमटत होता. घरातून पळून जायच्या तयारीत होती. फक्त संधी शोधत होती. बस मधला माणूस बहुधा तिचा भाऊ असावा. घरातून पळून ती त्याच्या घरीच येणार होती.
रजनीची घुसमट का होत असावी? तिला पळून जायची संधी मिळाली असेल का? पळून जाणं हे तिच्यासाठी योग्य होतं का? असेल तर मग ती सुखरूप घरी पोहोचली असेल का? कुठल्याच प्रश्नांची उत्तरं नाहीत आत्ता. कशाचीही कल्पना नाही.
कधीकधी कसलाही आगा-पिछा नसताना एखादी गोष्ट कानी पडते आणि मग विचार चक्र सुरू होतं.
काय झालं असेल रजनीचं हे माझ्या नजरेतनं बघा..

पाच वर्षांपूर्वी पराग मुंबईला नोकरीसाठी आला तेव्हा रजनी कॉलेजात शिकत होती. परागचा आपल्या बहिणीवर खूप जीव होता. आईवडील गेल्यानंतर परागनं नोकरी करत रजनीला सांभाळलं. वर्षभरात आपलं शिक्षण पूर्ण करून रजनीसुद्धा मुंबईला आली.
रजनी आणि पराग ह्या दोघांचं आयुष्य कधीच सरळ सोपं नव्हतं. आईवडील अचानक अपघातात गेले. पराग तेव्हा दहा वर्षांचा होता आणि रजनी जेमतेम चार वर्षांची. सगळी जबाबदारी परागच्या इवल्याशा खांद्यावर आली. दुःख बाजूला सारून त्यानं ती जबाबदारी पेलली. वयाच्या बाराव्या वर्षी त्याला नोकरी करावी लागली. शिक्षणाची आवड असून देखील आपलं शिक्षण पूर्ण करू शकला नाही. कष्टापरी कष्ट केले त्याचा देह चंदनापरी झिजला. तरीही तो खचला नाही. रडला नाही. रजनीचं शिक्षण पूर्ण केलं. तिलाही मुंबईत घेऊन आला.
रजनीनं सुध्दा भावाला खूप मदत केली. बारा वर्षाचा पराग जेव्हा नोकरी करत होता तेव्हा शाळेत जाणारी रजनी घरोघरी जाऊन धुणी-भांडी करायची. दोघांचं बालपण कष्ट करण्यात गेलं. जेव्हा त्यांच्या वयाची मुलं खेळात रमायची तेव्हा हे दोघे जगण्यासाठी झगडत होते.
आता दोघे मुंबईत सेटल झाले होते. भाड्याने एक छोटी रूम घेतली होती. बघता बघता रजनीचं लग्न ठरलं. मुलगा मुंबईचाच होता. लग्न अगदी साधेपणानं पार पडलं. एका मोठ्या जबाबदारीतून मुक्त झाल्यानं परागलाही हलकं वाटलं. आनंद तर होताच.
रजनीचा संसार सुरू झाला. सहा महिने सगळं सुरळीत सुरू होतं. रजनी खूप आनंदात होती. रजनीचा नवरा नोकरी निमित्त फिरतीवर असायचा. दिल्ली मुंबई प्रवास तर नेहमीच व्हायचा.असाच तो एकदा दिल्लीला गेला होता. तिथून मुंबईला परतताना विमानाचा अपघात झाला. सर्व प्रवासी जागीच ठार झाले.
रजनीला हा धक्का पचवणे फार कठीण होते. ती पार कोलमडून गेली होती. पुन्हा एकदा आयुष्यानं तिला एका अनवट वळणावर आणून ठेवले होते. जिथून पुढं सगळं धुसर दिसत होतं पण चालणं अनिवार्य होतं.
तिला आता सासरी जगणं फार कठीण होत होतं. रजनीची काहीच चूक नसताना तिचे सासू सासरे आपल्या मुलाच्या मृत्यूला तिलाच जबाबदार धरत होते. तिच्यातच काहीतरी दोष असणार म्हणून तर आधी स्वतःच्या आईवडीलांना गिळलं आणि आता आमच्या मुलाला, असं तिचे सासू सासरे म्हणायचे. चार चौघात सारखा तिचा अपमान करायचे. हे सगळं रजनीच्या सहनशक्तीच्या बाहेर जात होतं.
एकीकडे सासू सासऱ्यांचा जाच तर दुसरीकडे नवऱ्याच्या आठवणी. तिचा जीव घुसमटत होता. तिला हे घर सोडून जायचं होतं पण फक्त एका संधीची वाट पाहत होती. तिने तिच्या भावाला तसं कळवलं. त्यालाही तिची घुसमट समजली. तो तिच्या पाठीशी अगदी खंबीरपणे उभा राहिला. त्यानं तिला माहेरी यायला सांगितलं. माहिती नाही का पण आपल्या सासू सासऱ्यांना सांगून जायची तिच्यात हिम्मत नव्हती. तिने बॅग भरली आणि घरी कुणी नसताना तिथून निघाली ते कायमची. माहेरी आल्यावर पुन्हा एकदा स्वतःच्या पायावर उभी राहिली. नोकरी पुन्हा सुरू केली. काही काळ ती जरा खचली होती पण त्यात अडकून राहिली नाही. दुःख कुरवाळत बसली नाही. पुन्हा उभारी घेतली अन् स्वतःचं अस्तित्व निर्माण केलं. 
दुःख कमी जास्त प्रमाणात सर्वांना असतं म्हणून नशिबाला दोष देऊन किंवा खचून जाऊन प्रश्न सुटत नाही. रजनीच्या जागी दुसरं कुणी असतं तर जीव दिला असता कदाचित. नशिबाची साथ तिला कधीच नव्हती पण तरीही नशिबाला दोष देण्यापेक्षा ती त्याला सामोरी गेली आणि स्वतःचा मार्ग निवडला.



-निनाद वाघ
www.shabdatmandatomi.blogspot.in




No comments: